
महाराष्ट्रात केळी पिकाला शेतकऱ्यांची वाढती पसंती आहे. देशात केळी लागवड क्षेत्राच्या बाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे; परंतु शास्त्रशुद्ध व्यवस्थापनामुळे उत्पादकतेत पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र नजीकच्या काळात टीआर-४ या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव देशाच्या काही भागात दिसून आला आहे.
योग्य खबरदारी घेतली नाही तर येत्या दहा वर्षांत केळीबागांचे अस्तित्व संपण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात त्रिची (केरळ) येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर. सेल्वराजन यांच्याशी केलेली ही खास बातचीत.
देशात केळी पिकाच्या उत्पादनाचे चित्र काय आहे?
भारतात १० लाख हेक्टर क्षेत्रावर साधारण ३३ ते ३४ दशलक्ष टन केळी उत्पादन होत आहे. महाराष्ट्र लागवड क्षेत्राच्या बाबतीत देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. इथे सुमारे १ लाख १० हजार हेक्टरवर केळी लागवड होते. म्हणजे देशातील एकूण केळी लागवडीच्या तुलनेत जवळपास १० टक्के क्षेत्र इथे आहे. परंतु त्यातून सुमारे ६.५ लाख टन उत्पादन मिळते. म्हणजे ८० टक्के उत्पादकता एकट्या महाराष्ट्राची आहे. त्यामुळे उत्पादकतेच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर आहे. त्यातही राज्याच्या एकूण लागवड क्षेत्रापैकी ५० हजार हेक्टर क्षेत्र एकट्या जळगाव जिल्ह्यात आहे.
महाराष्ट्राची उत्पादकता अधिक असण्याचे कारण काय?
उति संवर्धित रोपे, ठिबकचा वापर, फर्टिगेशन, नियंत्रित खतांची मात्रा, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा संतुलित वापर अशा अनेक कारणांमुळे महाराष्ट्राने केळी उत्पादनात आघाडी घेतली आहे. ग्रॅंड-९ या केळी वाणाचा वापर राज्यात सर्वाधिक होतो. तर तीस वर्षांपूर्वी रोबोस्टा हे वाण अधिक वापरात होते. परंतु त्याची उत्पादकता कमी असल्याने त्याखालील क्षेत्र कमी होत होत ग्रॅंड-९ वाणाखालचे क्षेत्र वाढत गेले. आजच्या घडीला निर्यातीत ग्रॅंड-९ चा वाटा ९५ टक्के आहे. उत्तर अमेरिका, युरोपमध्ये या केळीला सर्वाधिक मागणी आहे.
राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राने केळीसाठी केलेली महत्त्वाची शिफारस कोणती?
एचटीसीआर (सॉइल टेस्ट, क्रॉप रिस्पॉन्स) हे तंत्र केळी संशोधन केंद्राने दिले आहे. त्यानुसार एनपीके निर्धारित करून त्याआधारे खत मात्रा देण्याची आवश्यकता आहे. परंतु महाराष्ट्रात केळी पिकात खतांचा वापर अधिक होत असल्याचे आमचे निरीक्षण आहे. नियोजनानुसार फर्टिगेशन ५२ आठवडे करण्याची गरज आहे. पिकाची गरज ओळखून खत दिले पाहिजे. पहिल्या टप्प्यात नत्राची गरज जास्त राहते. त्यामुळे त्या वेळी २०० ग्रॅम नत्र दिले पाहिजे. पालाश (पोटॅश) सुरुवातीला कमी हवा, त्यानंतर त्याचे प्रमाण वाढवावे. या माध्यमातून २५ टक्के खताची मात्रा वाचविता येणे शक्य आहे. त्याकरिता फर्टिगेशन फायद्याचे ठरते.
केळी उत्पादकतेत पाणी नियोजनाचे महत्त्व काय?
खताप्रमाणेच पिकाच्या निकोप वाढीसाठी पाण्याचे देखील तितकेच महत्त्व आहे. पूर्ण वाढ झालेल्या केळीच्या झाडाला प्रति दिवस १६ ते २० लिटर इतकीच पाण्याची गरज राहते. परंतु शेतकरी प्रति दिवस २५ लिटरपेक्षा अधिक पाणी देतात. त्यासोबतच अतिरिक्त खते दिल्यामुळे त्याचेही दुष्परिणाम समोर येतात. त्याचा उत्पादकतेवर परिणाम होतो. शिफारशीत मात्रेत खत व पाणी दिल्यास पिकाचे नीट पोषण होऊन उत्पादकता चांगली मिळते. परंतु शिफारस ३३ किलो खताची असेल तर त्याऐवजी तीन किलो मात्रा वाढवत ३६ किलो खत शेतकरी देतात. त्याचा पिकाला फायदा होईल, असा त्यांचा समज राहतो. हा समज पूर्णपणे चुकीचा आहे.
संशोधन केंद्राने विकसित केलेले तंत्रज्ञान कोणते आहे?
सेन्सरबेस्ड सिंचन (इरिगेशन) प्रणालीवर संस्थेने भर दिला आहे. पाच किलोमीटर त्रिज्येमधील पीक या प्रणालीत नियंत्रित करता येते. ही यंत्रणा स्वयंचलित असून, जमीन कोरडी होताच पिकाची गरज ओळखून पिकाला पाणी मिळते. या पद्धतीमुळे २५ ते ३० टक्के पाण्याची बचत होते, असे आमचे निरीक्षण आहे. त्यासोबतच २० टक्के उत्पादकता वाढ नोंदविण्यात आली आहे. ही यंत्रणा बसविण्यासाठी एक एकराकरिता एक लाख रुपयाचा खर्च होतो. त्यामध्ये ठिबक खर्च, सेन्सरबेस्ड यंत्रणा आदी बाबींचा समावेश आहे.
कीड-रोगांविषयी काय सांगाल?
केळीमध्ये नजीकच्या काळात ट्रॉपिकल रेस-४ (टीआर-४) या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव काही भागात दिसून आला आहे. याचा उगम प्रादुर्भावग्रस्त मातीमधून होतो आणि प्रसार बाधित केळी (कंद) रोपांद्वारे होत असल्याचे निरीक्षण आहे. त्यामुळे पीक व्यवस्थापन महत्त्वाचे ठरते. ग्रॅंड-९ वाण पनामा विल्टला प्रतिकारक होते. मात्र या वाणात टीआर-४ याचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. सुरुवातीला याचा प्रादुर्भाव बिहारमध्ये दिसून आला. त्यानंतर उत्तरप्रदेश, गुजरातमधील सुरत तसेच भरूच व त्या परिसरात प्रादुर्भाव झाला. नजीकच्या काळात पश्चिम बंगाल व आता जळगावमध्येही प्रादुर्भाव दिसून आला आहे. या संदर्भात योग्य ती खबरदारी घेतली नाही तर दहा वर्षात केळी बागांचे अस्तित्व संपण्याची भीती आहे. उतिसंवर्धित पिकात याचा प्रादुर्भाव दिसून आला नाही.
केळीचे कीड-रोग प्रतिकारक वाण आहेत का?
टीआर-४ या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव पाहता राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राने या बुरशीला प्रतिकारक वाण विकसित करण्यावर भर दिला आहे. निवड पद्धतीचा अवलंब त्याकरिता होतो आहे. रेड बनाना, नेंद्रन हे वाण केळी चिप्सकरिता आहेत. कोकण भागात लाल वेलची हे वाण आहे. लखीमपूर खिरी, महाराजगंज, बुरहानपूर, भरूच या भागात या वाणावर ट्रायल सुरू आहेत. हे वाण टीआर-४ या बुरशीजन्य रोगाला प्रतिकारक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या रोगाच्या नियंत्रणासाठी या वाणाची लागवड करण्यावर केळी उत्पादकांनी काही काळ भर द्यावा. त्याआधारे टीआर-४ नियंत्रणात आल्यानंतर तीन वर्षानी पुन्हा ग्रॅंड-९ या वाणाची लागवड करावी, अशा प्रकारे फेरपालट गरजेचा आहे.
नवीन तंत्रज्ञानाविषयी काय सांगाल?
काळाची पावलं ओळखत तंत्रज्ञान आधारित पीक व्यवस्थापनावर संशोधन केंद्राने भर दिला आहे. त्याकरिता आठ राज्यांत कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इन्टेलिजन्स-ए.आय.) वापर सुरू केला आहे. त्यामध्ये १५ ठिकाणचा डेटा आमच्या संस्थेत पोहोचेल. त्याचे पृथक्करण करून शेतकऱ्यांना मोबाइलच्या माध्यमातून सल्ला देण्याचे प्रस्तावित आहे. केंद्राने डिसिजन सपोर्ट सिस्टीम विकसित केली आहे. त्याआधारे कीड-रोगाचे नियंत्रण किंवा बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पीक व्यवस्थापन कसे करावे याबाबत उपाययोजनांची शिफारस केली जाईल. केळी पिकात ड्रोन वापराला देखील प्रोत्साहन दिले जात आहे. ड्रोनचा वापर करून सात मिनिटांत एक एकर क्षेत्रात फवारणी करणे शक्य आहे. तमिळनाडू राज्यात एक हजार एकर क्षेत्रावर ड्रोनद्वारे फवारणी करण्यात आली.
कोणते नवे वाण देण्याचे प्रस्तावित आहे?
ग्रॅंड-९ हे वाण अनेक कीड-रोगांना प्रतिकारक आहे, तसेच ते जादा उत्पादनक्षम व निर्यातक्षम आहे. त्यामुळे याच वाणापासून नवे वाण विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता गॅमा म्युटेशन तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. प्रायोगिक तत्त्वावर भरूच तसेच सुरत मध्ये हे वाण लावण्यात आले आहे. त्यावर केवळ पाच टक्के कीड-रोगांचा प्रादुर्भाव दिसून आला. टीआर-४ या बुरशीजन्य रोगाला देखील हे वाण प्रतिकारक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळेच ज्या भागात टीआर-४ बुरशीचा प्रादुर्भाव असेल त्या भागात लागवडीकरिता हे वाण दिले जाणार आहे.
केळी पिकाच्या पोषणासाठी सूक्ष्म अन्नद्रव्याची काय भूमिका आहे?
केळी पिकाच्या पोषक वाढीकरिता बनाना शक्ती हे सूक्ष्म अन्नद्रव्य संस्थेने विकसित केले आहे. बोरॉन, झिंक, आयर्न, कॉपर, मॅंगेनीज या घटकांचा यात समावेश आहे. दहा वर्षांच्या अभ्यासाअंती हे उत्पादन विकसित करण्यात आले. त्याच्या व्यावसायिक उत्पादनासाठी दहा कंपन्यांबरोबर करार केला आहे. प्रत्येक कंपनीकडून पाच वर्षांसाठी तीन लाख रुपये आकारण्यात आले. सोबतच काही प्रमाणात रॉयल्टीही आकारली जाते. या उत्पादनाचे परिणाम चांगले मिळत असल्याने त्याला मोठी मागणी आहे.
दरवर्षी एक कोटी रुपये किमतीच्या बनाना शक्ती उत्पादनाची विक्री होते. त्याची फवारणी ड्रोननेही करणे शक्य आहे. केळी पिकात पानाच्या माध्यमातून अन्नद्रव्य शोषणाचे काम होते. त्यामुळे ड्रोनने फवारणी केल्यास थेट पानांना हा घटक मिळतो. त्यामुळे संशोधन केंद्राने ड्रोन फवारणीची शिफारस केली आहे. केंद्राने दोन ड्रोन खरेदी केले आहेत. त्यातील एक ड्रोन हा १२० फुटावर उडणारा असून त्याचा संशोधन क्षेत्रात उपयोग होतो.
- डॉ. आर. सेल्वराजन ९८४३२७८३६४
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.