Thought Update Agrowon
ॲग्रो विशेष

Dr. Anand Nadkarni : विचारांचा स्वीकार म्हणजे काय?

Women Psychology : मागील लेखामध्ये विचार म्हणजे काय, विचारांचं भान, विचारांची जाण आणि ती कशी वाढवावी हे पाहिले. विचार ओळखता आले, त्यांच्याबद्दल सजगपणा आला. पण विचारांची ही जाण नक्की उपयोगात कशी येईल? त्या विचारांकडे कसं पाहायचं? बदल कसा घडवायचा? याबद्दलची माहिती जाणून घेऊया आजच्या या लेखात.

Team Agrowon

डॉ. आनंद नाडकर्णी

Thought Update : ‘कर्ता शेतकरी’ बनण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा पैलू म्हणजे उद्योजकता वाढवणं, तसा दृष्टिकोन निर्माण करणं. उद्योजक शेतकरी अष्टावधानी असणार. प्रत्येक अवधानाचे अनेक कोन आहेत हे लक्षात घेऊन एकाच वेळी त्या वेगवेगळ्या कोनांतून काम करायला त्याला जमायला हवं. त्यासाठी खालील पायऱ्या लक्षात घेऊया.

- एखाद्या प्रसंगात किंवा विषयावर आपले विचार ओळखणे. (म्हणजेच स्वगताची जाण.)

- विचारांचा स्वीकार करणे.

- हे विचार तपासून बघणे आणि त्यांचे वर्गीकरण करणे.

- नियंत्रणातले आणि नियंत्रणाबाहेरचे घटक ओळखणे.

यातील पहिल्या टप्प्याबद्दल आपण समजून घेतलं आहे. आता विचारांचा स्वीकार म्हणजे काय आणि तो का महत्वाचा आहे हे पाहूया.

विचारांचे भान आणि जाण वाढली की आपला बराचसा स्वसंवाद किंवा स्वगत आपल्या लक्षात यायला लागतं. आणि सुरुवातीला जरा गडबडच उडून जाते. आपलेच विचार न्याहाळताना आपल्या लक्षात येतं की –

- आपल्या मनात येणारे सगळेच विचार चांगले/ भले नाहीत. काही दुष्ट विचारपण आहेत की.

- काही विचार तर अगदी नकोसे वाटणारे, कल्पनाही करवत नाही असे आहेत.

- माझे मलाच न आवडणारे, लाज किंवा वाईट वाटेल असे काही विचार आहेत.

- कधी अगदी अनोळखी लोकांबद्दल तर कधी अगदी जवळच्या व्यक्तींबद्दलचे आहेत.

- काही बंडखोरीचे, नियम मोडावे वाटणारे आहेत.

आपण वागताना योग्य-अयोग्य, चांगले-वाईट हे पडताळून वागतो, वर्तन चांगले ठेवतो. पण विचारांमध्ये मात्र अयोग्य विचार, चुकीच्या किंवा न पटणाऱ्या कृती करायची उर्मी येऊन जातात. आपण हे लक्षात ठेवूया, की विचार आपोआप, ऑटोमॅटिकली येतात. कुठले विचार मनाच्या पटलावर उमटावे यावर आपला काहीच ताबा नसतो.

त्यामुळे येणारे सगळे विचार आपण स्वीकारू. नकोसे वाटणारे किंवा चुकीचे वाटणारे विचारदेखील न्याहाळू, त्यांची नोंद घेऊ. त्यांना विरोध किंवा प्रतिकार नको करायला. पण विचारांचा स्वीकार म्हणजे त्याबरहुकूम कृती नव्हे!

माझ्या विचारांतले कुठले विचार फायद्याचे, उचलून धरायचे, पुढे न्यायचे आणि कुठले विचार फक्त आले तसे जाऊ द्यायचे, हे ओळखता आले पाहिजे. उपयुक्त आणि उपद्रवी विचारांचे वर्गीकरण करण्यासाठीचे निकष पाहूया. पुढील गोष्टींवरून ते ठरवता येईल.

- आता माझ्यासमोर असणारे प्रश्‍न सोडवायला कुठल्या विचारांची मदत होते आहे?

- मला माझ्या विचारांत आता कुठल्या विषयाला प्राधान्य द्यायला हवे? कुठल्या मुद्द्यांवर विचार करायचा आहे?

- विकासाकडे, प्रगतीकडे नेणारा विचार कोणता?

- शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणारा विचार कुठला? (शारीरिक आरोग्य वाढवणारा विचार म्हणजे व्यसनांपासून दूर राहणारा, उत्तम आहार आणि व्यायाम यासाठी प्रोत्साहित करणारा विचार. मानसिक आरोग्य वाढविणारा विचार म्हणजे भावनांचे संतुलन करायला फायद्याचा.)

- आपले प्रिय लोक किंवा व्यवसाय-कामासंबंधातील लोक यांच्याशी चांगले संबंध वाढवायला मदत करणारा, नात्यांना बळकटी देणारा विचार. या कसोट्या वापरून आपल्यासाठी उपयुक्त आणि उपद्रवी विचार आपण तपासून बघू शकतो.

एक उदाहरण घेऊन हा मुद्दा समजून घेऊ.

समजा माझ्या मुलाचा, रोहनचा, शाळेचा वार्षिक निकाल फारसा चांगला नाही. त्यासंबंधी खालील विचार मनात येत आहेत. त्यांचं वर्गीकरण त्यापुढे कंसात आहे, ते पडताळून पाहा.

- एवढे पैसे घालून शाळेत पाठवायचं, शिकवायचं पण याला त्याची अजिबात किंमत नाही! (अजिबात किंमत नाही हे काही वास्तवाला धरून नाही, हा विचार सरसकट मुलाला दूषण देणारा आहे.)

- पुढच्या वर्षी दहावीला बसेल आणि तरी अजून अजिबात अभ्यास नको करायला! (अजिबात अभ्यास नको करायला हे वास्तवाला धरून नाही.)

- म्हणेल ते पुरवलं, आणून दिलं; आता काय अडचण आहे ते तरी सांग म्हणावं. (समस्या सोडविणारा)

- चांगला फटकावला पाहिजे. उपाशीच ठेवतो दोन दिवस. (समस्या सोडवायला काहीच उपयोगाचा नाही, नात्यांत बाधा आणणारा.)

- नाही तर सरळ शाळा बंद करून शेतात कामाला लावतो या गधड्याला. (मुलाने शिकावे या ध्येयापासून दूर नेणारा.)

- नाही तसं नको, शिकायला तर पाहिजेच. ट्यूशन लावली तर काही फायदा होईल का? (समस्या सोडविणारा.)

- उपाशी ठेऊन काय व्हायचंय, आपलंच आतडं तुटणार. त्यापेक्षा समोर बसवून बोलावं एकदा. (नातं बळकट करणारा, उपाय शोधायला उपयुक्त.)

- दहावी झालास की तुला जमेल असा एखादा कोर्स शोधू. पण दहावी तर व्हावं लागेल ना बाबा. (ध्येयाकडे नेणारा.)

- सखारामशी बोलून घ्यावं, त्याचा लेक काही मदत करेल का अभ्यासात. (उपाय शोधणारा.)

- त्याच्या शाळेतल्या बाईंना पण एकदा विचारून घेऊ. (उपाय शोधणारा.)

- सकाळी गोठ्यात वेळ जातो त्याचा खूप. परीक्षा आली की ते काम चंद्राला सांगावं, चार पैसे जातील पण पोराला अभ्यासाला वेळ मिळेल. (उपाय शोधणारा.)

हे वर्गीकरण लक्षात आलं की आपल्या पटकन कळेल की विचार आला असला तरी कुठल्या विचारावर पुढे काही कृती करायची आणि कुठला विचार पुढे न्यायचा नाही.

आता अष्टावधानी विचार म्हणजे काय हे समजून घेऊया. एकाच वेळी अनेक विषयांचे विचार मनात गर्दी करत असतात. म्हणजे बघा हं-“ट्रॅक्टरची दुरुस्ती करायची आहे, पंपाचे सर्व्हिसिंग करायचे आहे, सणासुदीला पाहुण्यांना बोलवायचं आहे, यंदा वारीला जायचं म्हणजे जायचंच, लेकीसाठी पुढच्या वर्षी सोयरिक बघायला सुरुवात करायला हवी, अजून पावसाचा पत्ता नाही... ”

अशा वेळी आता प्राधान्य कुठल्या विचाराला द्यायचे आहे? तोवर इतर विचार कसे ‘वेटिंग लिस्ट'वर ठेवायचे? एकाच वेळी वेगवेगळे उपाय, कृती कसे सुचतील? हळूहळू हे सगळं जमायला लागेल आणि त्यालाच आपण म्हणतो अष्टावधानी होणे.

अष्टावधानी व्यक्ती म्हणजे मल्टिटास्किंग करणारी व्यक्ती, जिला शब्दश: एकाच वेळी आठ गोष्टींवर (आठ अवधाने) काम करता येते.

अष्टावधानी उद्योजक शेतकरी बनायचे तर विचारांची, विचारांच्या वर्गीकरणाची सवय लावून घ्यायला हवी. त्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे -

- सगळ्या विचारांचा स्वीकार

- अवधानांची निवड

- त्याकडे पाहायचे निरनिराळे दृष्टिकोन

- प्रत्येक गोष्टींचा अनेक अंगांनी विचार

- नियंत्रणातले आणि नियंत्रणाबाहेरचे घटक ओळखणे

नियंत्रणातले आणि नियंत्रणाबाहेरचे घटक म्हणजे नक्की काय ते बघूया. शेतीविषयक समस्या आणि घटकांचा विचार केला तर –

नियंत्रणाबाहेरचे घटक कुठले? हवामान, वीज, पाणी, बाजारभाव, कर्ज, कर्जमाफी, अनुदान इ.

नियंत्रणातले घटक कुठले? जमीन, कष्ट, अनुभव, कुटुंबाची साथ इ.

याव्यतिरिक्त आणखीन नियंत्रणातले घटक कुठले? विज्ञान, तंत्रज्ञान, समूहशक्ती आणि माझी अष्टवधानी विचारक्षमता. हे सर्व वापरलं तर नियंत्रणाबाहेरचे घटक हळूहळू आवाक्यात यायला मदत होईल.

नियंत्रणातले आणि नियंत्रणाबाहेरचे घटक वेळ-काळानुसार बदलत राहणार. त्यामुळे हे घटक सतत तपासून पाहायला हवेत. हा विचारांचा व्यायाम सतत करायला हवा. त्यासाठी रोज आवर्जून म्हणता येईल अशी एखादी प्रार्थना शिकूया.

दिवसातून निदान एकदा, लक्षपूर्वक आपले विचार ओळखायचा सराव करूया आणि विचारांचे वर्गीकरण करायची सवय लावूया. त्याला चाचण्या लावून तपासून पाहूया. उद्योजक शेतकरी आणि अष्टावधानी होण्यासाठी हा विचारांचा व्यायाम आवश्यकच!

(संशोधन आणि शब्दांकन : डॉ. सुवर्णा बोबडे व शिल्पा जोशी)

ई-मेल - kartashetkari@gmail.com

आजच्या लेखाशी संबंधित भाग बघण्यासाठी लिंक –

https://www.youtube.com/watch?v=nvvDdHhArJ0&t=13s

कर्ता शेतकरी मालिकेचे सर्व भाग बघण्यासाठी यू-ट्यूबवर सह्याद्री फार्म्स किंवा आवाहन आय.पी.एच. या चॅनेलना सबस्क्राइब करा आणि “कर्ता शेतकरी” ही प्लेलिस्ट बघा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Crop Cultivation : कळंबा गटाअंतर्गत फळबाग लागवड सुरू

Voter Registration : नव्या २३,४७५ मतदारांची अहिल्यानगर जिल्ह्यात नोंद

Mango Cashew Damage : आंबा, काजू लागवडीची गवा-रेड्यांकडून नासधूस

Maharashtra Election 2024 : मतदारांतील ‘सुप्त’लाटेची उमेदवारांना धास्ती

Fertilizer Shortage : जळगावात खतांची लिंकिंग, टंचाई; खतबाजारात शेतकऱ्यांची लूट

SCROLL FOR NEXT