ज्योती आधाट/तुपे
Rural Wedding : आपल्या भारतीय संस्कृतीत विवाह हा एक संस्कार आहे. इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशातील कुटुंब व्यवस्था ही खूप महान आहे. परिवाराचं रूप विवाहानंतर आणखी बहरत जातं. दोन कुटुंब या निमित्ताने एकत्र येतात आणि या निमित्ताने वैचारिक बैठकही घडून येते.
मनाने, विचाराने दोन कुटुंब जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपल्या संस्कृतीचा वारसा अधिकरित्या जपण्यास मदत होते. या लेखाच्या निमित्तानं काही गोष्टी मला सर्व कुटुंबीयांशी बोलायच्या आहेत. कदाचित काहींना हे विचार पटतील तर काहींना पटणारही नाहीत.
हे विचार पटावेत हा आग्रह नाही पण या विचारांवर सारासार विचार करून आपण जरूर निर्णय घ्यायला हवा. आणि या विचारांप्रमाणे काही कुटुंब अंमलबजावणीही करतील, असा माझा १०० टक्के विश्वास आहे.
विवाह ठरवताना आपली मुलगी सरकारी नोकरी करणाऱ्यास, संपत्ती, घर, गाडी, जमीन-जुमला असणाऱ्या मुलास देण्याची इच्छा सर्वच आई-वडिलांची असते.
सरकारी नोकरी नसेल तर चांगल्या कंपनीत, चांगल्या हुद्द्यावर असणारा आणि शहरात बंगला-गाडी असणारा, एकुलता एक मुलगा असेल तर सोन्याहून पिवळं असं मुलीकडच्यांना वाटणं साहजिक आहे.
काही मुलींच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांना राजकुमारच हवा असतो. आणि मुलांना सुंदर दिसणारी मुलगी हवी असते.
एखादा शेती करणारा, कष्टाळू, प्रामाणिक, लग्न झाल्यावर दोघांच्या हिमतीवर घर बांधणारा, चांगल्या विचारांच्या मुलास होकार देणारी कुटुंब दुर्मीळ आहेत. ते फक्त मुलाचा आचार-विचार पाहतात.
नसेल तो श्रीमंत पण त्याच्या मनगटात धमक असेल, स्वभावाने प्रेमळ असेल तर मुलींनी होकार द्यायला हवा. कष्टाळू, प्रेमळ मुलगा जीवनसाथीदार म्हणून मुलींनी स्वीकारायला हवं. कारण घर, गाडी, जमीन जुमला हे दोघांच्या कष्टानेही कमावता येईल. पण अशी सुसंस्कृत मुलं मिळणं दुर्मीळ झाले आहे.
समाजात आपण काही उदाहरणे अशीही पाहतो की, मुलींनी जर श्रीमंत घरच्या मुलाला होकार दिला अन् त्यांचे लग्न झाले. पुढे तो मुलगा तिला सुखी, आनंदी ठेवेलच कशावरुन? अपवादात्मक काही श्रीमंत मुले श्रीमंत मनाचीही असतात. पण त्यांचे प्रमाण खूप कमी आहे. म्हणून जीवनसाथीदार निवडताना दोघांनीही काळजी घेणं खूप गरजेचे आहे.
शेतकरी मुलांना होकार द्या. कारण ते काळ्या भूमीची सेवा करतात. त्यांच्यात ऊन, वारा, पाऊस झेलण्याची क्षमता असते. कणखर वृत्तीची ही मुलं असतात. पहाडासारखं मोठ मन या मुलांचे असते. आणि आई-वडिलां इतका जीव ते मुलींना लावतात. म्हणून थोडा विचार करुया.
भौतिक सुविधा कधीही कमावता येतील परंतु चांगला जीवनसाथीदार मिळाल्यावर आयुष्य सुखात-समाधानात जगण्याची १०० टक्के शाश्वती असते.
शहरात एवढं काय आहे की, बरीचशी कुटुंबे शहरात मुलगी देणे खूप मोठ्या श्रीमंतीचं लक्षण समजतात. खेड्यात जी माया, ममत्व, आपुलकी आहे त्या तुलनेत शहरात त्याचे कमी प्रमाण आहे. शहरात वागण्यात, बोलण्यात औपचारिकता असते.
खेड्यातल जगणं हे अनौपचारिक असतं. कोरोनामध्ये आपण सर्वांनी अनुभवलं की, खेड्यात राहणारी, शेतात कष्टणारी मंडळी सर्वांत सुखी - समाधानी जीवन जगत होते. आणि महत्त्वाचे म्हणजे आरोग्यसंपन्नता ही खेड्यात अधिक आहे.
कारण शुद्ध हवा, शेतातला ताजा भाजीपाला, एकमेकांशी असणारे सलोख्याचे संबंध यामुळे जीवन सुखकर होते. मुलींनी सारासार विचार करून आपल्या घरच्यांचे या बाबतीत प्रबोधन केले पाहिजे.
निर्व्यसनी, हुंडा न घेणारा मुलगा स्वीकारायला हवा. मुलांनीही मुलींमधली कला, विचार जाणून घेऊन त्याप्रमाणे होकार द्यायला हवा.
कारण आपणा सर्वांना मिळून आपली भारतीय संस्कृती टिकवायची आहे. भारतीय संस्कृतीचा आत्मा कुटुंब व्यवस्था आहे. हल्ली विवाहानंतर आपण पाहतो की, एकमेकांचा विचार समजून न घेतल्याने कुटुंब मोडकळीस येतात. अशा परिस्थितीत आपण स्वतःचेच नुकसान करून घेत आहोत, हे लक्षातही येत नाही.
माझं चुकत हेच आज कुणी मान्य करायला तयार नाही. खूप क्षुल्लक कारणे असतात. जी चर्चेतून सोडवता येतात. परंतु तसं होत नाही. आई-वडिलांनी आपल्या मुलां-मुलींवर जर सुयोग्य संस्कार केले असतील, समाजानेही सकारात्मक वातावरण ठेवले तर आजची युवापिढी निश्चितच योग्य वळणावर मार्गक्रमण करताना आपल्याला दिसेल.
विवाहप्रसंगी दोन्ही कुटुंबीयांनी संपत्ती, घर, गाडी, जमीन, गोरा रंग, दिसणं हे थोडं बाजूला ठेवून विचारांनी समृद्ध, निर्व्यसनी, कष्टाळू, सुसंस्कारित सून तसेच जावई शोधले तर निश्चितच कुटुंब व्यवस्था टिकून राहील. पाश्चात्त्य संस्कृतीचं अंधानुकरण थांबवणे तितकेच महत्त्वाचे आहे.
एक सुयोग्य निर्णय आपलं जीवन बदलवतं आणि आपलं आयुष्य चहूबाजूंनी फुलवतं. म्हणून विचारांची, मनाची श्रीमंती निवडुया आणि भारतभूचा आदर्श जगासमोर ठेवुया.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.