
Wedding Season : सोळा संस्कारांपैकी एक सुंदर आणि पवित्र संस्कार लग्न आहे. मानवी जैविक गरजा समाज संमत करण्यासाठी हा सोहळा महत्त्वाचा असतो. कुटुंबव्यवस्था आणि नाती अबाधित ठेवण्यासाठी हे 'अगत्याचे कार्य' पार पाडावेच लागते.
मात्र आपापल्या ऐपतीच्या पातळ्या ठरलेल्या असून सुद्धा अवाजवी खर्चाचा ताळमेळ लग्न करताना बहुधा दिसत नाही. आजही बोटावर मोजण्याएवढ्या सोयरिकी सोडल्या तर, पोरीच्या बापाला बघायला येणारे अनेक पाहुणे आणि नवरदेव मुलांची उठबस करता-करता नाकीनऊ येतात.
यातही मुले आणि पाहुणे सकाळी ११.०० च्यानंतर येऊनही आल्या आल्या चहापाणी, परत नाश्ता, फलाहार, दुपारचे जेवण आणि परत जाताना चहापाणी, सरबत, फळांचे रस पाजू घालूनच वाटं लावावी लागतात.
आता तर घरच्या काही बायका मुलासोबत सुरुवातीलाच मुलीला बघायला जातात. त्यांनाही खाऊन-पिऊन साड्यांचा आहेर करावाच लागतो. 'पाहुणचार' एकदा सुखकारक आणि समाधानकारक ठीक वाटतो, पण परत-परत 'बघायचे' रतीब नवरीकडच्याचे टप्पर वाजवतात.
नंतर असेच 'ये-जा' सुरू होते. सगळे काही जुळून आल्यानंतर 'एकदाचे' लग्न करायचे निश्चित होते. आता तर 'शुभमंगल' ठरल्या-ठरल्या मुलगा मुलीला महागडा मोबाईल घेऊन देतो.
नंतरच्या बैठकीत भावकी आणि सोयरे जमा करून, कायद्याने देणे-घेणे गुन्हा असूनही 'हुंडा' बोली बोलल्या जातात. सोने-चांदी, कपडे-लत्ते, भांडे-कुंडे, फर्निचर, गाड्या-घोड्या, मानाच्या साडी-चोळी आणि आणखी काय-काय मागण्या संमत करून त्यांची पूर्तता करण्यासाठी कसरती सुरू होतात.
आज कुठलेही मंगल कार्यालय घ्या किंवा दारापुढे मांडव टाका, लाख सोडा लाखो रुपये मोजावे लागतात. पत्रिका म्हणजे लग्नाचा पक्का निरोप, पण त्यासाठीही आता खर्चाची उधळण होते. बस्ता बांधण्याची लगबग सुरू होते.
नवरदेव-नवरी, नातेवाईकांचे 'मानपान' कपडे आहेर किमान पाच लाखापासून २५ लाख ते आपल्या हौसेखातर किती होतात, हे न विचारलेले बरे! घोडेवाला शेवंतीसाठी कमीत कमी १० हजार रुपयांच्या पुढेच भाडे द्या म्हणतो. बँड वाले, डीजेवाले 'लाख मोलाचे' झालेले आहेत.
५०० रुपयांपासून ५००० रुपयांपर्यंत एका ताटाचे मोजले जातात. खायचे कमी आणि बघायचे, ताटात टाकून द्यायचे जास्त पदार्थ दिसतात. नाही म्हणायला आस्वाद घेणारे अपवादही आहेत, पण ताटात तसेच ठेवलेले मनस्वी वऱ्हाड्याला हे दिसते.
पाहुणे सन्माननीय असल्यामुळे तोंड दाबून बुक्क्याचा मार कोणीही न देताही यजमानांना स्वतः खावा लागतो. पंगती किती आणि कोणाच्या? विचारायची सोय नाही. आइस्क्रीम, कुल्फी चोकोबार चाखायला आणि मठ्ठा प्यायला, पान सुपारी खायला तोबा गर्दी एकाच वेळी दिसते.
चपाती, वरण, भात, भाजी आणि एखादा गोड पदार्थ, मठ्ठा किंवा सलाद इतके रुचकर, पौष्टिक आणि सुटसुटीत अन्नपदार्थ असले तरी भागते पण 'होऊन जाऊ द्या' या दणक्यात पोटात कमी आणि ताटात जास्त पदार्थ वाया जातात. लाखो रुपये चुराडा होतात.
थंड पाण्याची सोय म्हणून पाण्याचे जार असतात. दुसऱ्या दिवशी अति थंड पाणी पिल्यामुळे अनेकांचे गळे चुरचुर करतात. परत दवाखान्यात प्रत्येकजण ५०० ते १०००/ रुपये औषधोपचारावर खर्च करतो.
लग्नात आता ५०० ते १००० मुळं वाटून साडी-चोळी, टॉवेल-टोपी किंवा वस्तू किंवा पुस्तके भेट देण्याचे खूळ निघालेले आहे. लग्नातल्या आहेराच्या साड्या अनेकांनी शेतात भुईमुगाच्या किंवा केळीच्या पिकांचे शेतातील वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी उपयोगात आणलेल्या असतात. त्यावरचा ५० हजार रुपये (जेमतेम सांगितलं) एका लग्नात वाया जातात.
गावात जर एका वर्षी किमान २५ लग्नं लागली तर १२ लाख ५० हजार रुपये फक्त फरकुटात वाया जातात. वीजबिल हजारो रुपये येते. प्रवासासाठी वाहने लाखो रुपये भाडे घेतात. फुलांची सजावट आकडे पाहून सुकून जाते. ध्वनिव्यवस्था, गायक व वाद्यवृंद, निवेदक , वाढपी, गाद्या-उशा, खुर्च्या आणि इतर साहित्य यावर लाखो रुपये पुरत नाहीत.
दक्षिणाही हात भरून दिली जाते. जे वऱ्हाडी लग्नाला येतात, ते प्लॅस्टिक किंवा काचेच्या तकलादू वस्तू भेट देण्यासाठी आणतात. त्याचा काहीही जास्त काळ टिकाऊपणा नसतो. प्लॅस्टिक जर इस्तत: टाकून दिले तर लवकर विघटन होत नाही. पर्यावरणाचे प्रश्न, स्वच्छतेचे काम वाढते. त्यासाठीची यंत्रणा पुन्हा खर्चीक असते.
कागदी पत्रावळ्या, द्रोण, ग्लास आरोग्यदृष्ट्या उपयोगाचे नाहीत. हानिकारक असलेल्या या गोष्टीकडे माहीत असूनही दुर्लक्ष होते. सफाईवर हजारो रुपये द्यावेच लागतात. आयुष्यभर जमा केलेली पै-पई खर्च होते. कर्ज काढावे लागते. बँकेचे हप्ते फेडता फेडता जिंदगी पणाला लागते.
माझ्या भावाचा लग्नाचा अनुभव
माझे वडील अकाली वारले. धाकटा भाऊ लग्नाचा होता. जवळचे नातलग आणि सुलतान हाश्मी, बुजूर्ग स्नेही अशी मोजून पंधरा माणसांची एक जीप घेऊन आम्ही लग्नाला गेलो. ती संख्या पाहिल्यावर चुलत्याने शिव्यांनी माझा उद्धार केला.
लई अवघडपण मी सोसले. कोरोनात वऱ्हाडाच्या मर्यादा पाळल्या गेल्या. भावाचे लग्न मर्यादित केले, तसेच मुलाचे-मुलीचे लग्न करण्याचा माझा प्रयत्न आहे.
पण घरची लक्ष्मी म्हणाली, सुनाच्या बापाचा आणि जावयाच्या बापाचा तुम्हांला पाठिंबा मिळाला तरच तुम्ही तसे करणार ना? या प्रश्नाने मी तर बुचकाळ्यातच पडलो. सामाजिक दाब म्हणतात तो हाच का?
माती आणि मोती
खेड्यातील शेतकऱ्यांच्या पोरी नवरी म्हणून शहरवासीयांना देताना शेताचे 'गुंठे' विकून धूमधडाक्यात लग्न होत आहेत. बेरोजगार आणि अवास्तव अपेक्षा यामुळे खेड्यातील लग्नाळू पोरांना मुलगी मिळाली तर 'मोती' नाहीतर हातात फक्त 'माती' आहे.
ग्रामीण भागातील नवरदेव पोरांची जीवनदिशा बदलून दशेकडे जात आहे. सामुदायिक विवाह सोहळे महत्त्वाचे आहेत पण हा अंतिम पर्याय नाही. `शुभमंगल’ करताना खर्चाच्या मर्यादेची सीमा ओलांडू नये, ‘सावधान’!
अरूण चव्हाळ, परभणी ७७७५८४१४२
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.