Agriculture Water Management : निसर्ग ग्रंथातील पहिलाच महत्त्वपूर्ण धडा असतो, तो म्हणजे ‘पाण्याची ओळख’. पाणी (Water) हे निसर्गाचे अतिशय देखणे रूप आहे. ते सर्व सजीव आणि निर्जीवांचा आत्मा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण बहुतेक सजीवाच्या शरीरात (Water In Human Body) ६० ते ९९ टक्के पाणी असते. पाण्याशिवाय त्यांचे जीवन केवळ अशक्यच!
अगदी निर्जीवसुद्धा त्यास अपवाद नाहीत. मग तो महाकाय पर्वत असो अथवा प्रचंड मोठा दगड. त्यांची एकसंघीय अवस्था ही पाण्याच्या रेणूमुळेच असते. पाणी ही निसर्गाची देणगी आहे.
रासायनिक भाषेत पाणी म्हणजे दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन अशी संरचना असते. अगदी प्रयोगशाळेत त्यांच्या एकत्रीकरणातून काही प्रमाणात पाणी तयार करता येत असले तरी आपल्याला जितक्या मुबलक पाण्याची आवश्यकता (Water Need) आहे, तितके आपण नक्कीच बनवू शकत नाही.
म्हणूनच पाणी हे निसर्गाची किमया आहे असे समजून जपले पाहिजे. या अमृतरूपी पाण्याचा अपव्यय (Water Wastage) टाळला पाहिजे. त्याचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे.
पाणी हे दोन प्रकारचे असते. दृश्य आणि अदृश्य. डोळ्यांना पृथ्वीवर नदी, नाले, तलाव, समुद्र अशा वेगवेगळ्या स्वरूपात दिसते ते दृश्य पाणी. भूगर्भामधील आपल्या डोळ्यांआड असलेले पाणी जे अदृश्य. हे अदृश्य असलेले पाणी गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात जाऊन भूगर्भामधून खेचून वर घेतो.
ते बनते पुन्हा दृश्य पाणी. हजारो वर्षापासून भूगर्भामध्ये साठले गेलेले बहुमोल पाणी आज आपण वेगाने खेचून घेत आहोत. हा पाण्याचा उपसा पिण्याच्या पाण्यासाठी झाला असता तरी नैतिक असते. मात्र आपण या पाण्याचा उपसा करत आहोत, ते उसासारख्या पिकाला पोसण्यासाठी, रासायनिक शेती करण्यासाठी.
वसुंधरेला पाचशे ते हजार फुटांपर्यंत खोल छिद्रे पाडली जातात. इतक्या खोलीवरून खेचल्या जाणाऱ्या पाण्यात आर्सेनिक, फ्लुराईड सारखे शरीराला घातक ठरणारे द्रव्ये विरघळलेली असू शकतात. म्हणजे अशी घातक रसायने पाण्यासोबत भूपृष्ठावर आणतो. असे पाणी गहू, भाताला दिल्यास अन्नाद्वारे मानवी शरीरात शिरतात.
त्यांचे मानवी शरीरावर झालेले विद्रूप परिणाम पाहण्यासाठी तुम्हाला बंगाल, पंजाबमध्ये जावे लागेल. माझ्या शेतातील पाणी माझ्या मालकीचे आहे. ते वापरण्यासाठी ‘‘कोण मज अडवतो ते मी पाहे’’ असा अतिरेकी प्रकार सध्या सुरू आहे.
त्यातूनच पाणी व्यवस्थापनाचे गणित सपशेल चुकते. यातूनच सुरू होतो तो विविध आजारांचा गुणाकार. पाण्याचे व्यवस्थापन कसे करावयाचे हे आपण वनस्पतीकडून शिकावयास हवे.
वनस्पतींचे पाणी नियोजन
वनस्पतीची मुळे दोन प्रकारची असतात. एक सोट मूळ आणि त्याची उपमुळे जे आधाराचे काम करतात, तर दुसरा प्रकार वनस्पतीच्या पृष्ठभागावरील शरीराला भूगर्भामधील पाणी देऊन जगवणारी मुळे. त्यांना श्वेतमुळे असे म्हणतात.
द्विदल वनस्पतीमध्ये हे चित्र असते तर एकदलमध्ये सर्व तंतुमय मुळे असतात. केश मुळांनी शोषलेल्या पाण्यात विविध प्रकारची मूलद्रव्ये विरघळलेली असतात. त्यातून वनस्पतींचे पोषण होते. केशमुळाकडून शोषलेले हे पाणी मुळाद्वारे वर खोड, फांद्या, पाने, फुले, फळे, बिया पर्यंत प्रवास करते.
त्यामागे कार्यरत असते ती केशाकर्षण शक्ती. दोन सारख्या रेणूमधील आपापसांमधील आकर्षणास एकसंघ शक्ती (cohesive force) म्हणतात. बादली, घागर, विहिरी, नदी, सागर यांतील पाणी हे याच शक्तीमुळे एकत्र व द्रवरूपात राहते.
रासायनिक भाषेत बोलायचे तर दोन हायड्रोजन अणू आणि एक ऑक्सिजन अणू एकमेकांस चिटकून रासायनिक बंध तयार होतो. नारळासारख्या उंच वृक्षामध्ये जमिनीमधून त्याच्या टोकापर्यंत चढणारे पाणी नेहमी गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध प्रवास करते ते याच केशाकर्षण शक्तीमुळे.
जमिनीत पिकाच्या मुळाजवळ पाणी कमी पडते, तेव्हा वनस्पतीमध्ये वरच्या दिशेने प्रवास करणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावर नकारात्मक परिणाम होतो.
त्याचा परिणाम दिसतो तो पिकांच्या शेंड्याकडे. ते प्रथम माना खाली टाकतात. पूर्ण माना खाली टाकण्याआधी वेळेवर पाणी मिळाल्यास तो शेंडा पुन्हा जोम धरू शकतो. मात्र त्यात अधिक काळ गेला तर ते पीक पुन्हा उभारी धरू शकत नाही. पावसाचा मोठा खंड पडलेल्या ठिकाणी शेतातील असे उभे पीक मान टाकताना दिसते.
वर वर पाहता आपल्याला हा दोष निसर्गाचा वाटत असला तरी तो दोष आहे आपल्याला चुकलेल्या पाणी व्यवस्थापनाचा. हे परिणाम रासायनिक शेतीमध्ये लवकर दिसतात.
म्हणूनच रासायनिक शेतीमध्ये अशाश्वत पावसावर पाण्याचे व्यवस्थापन करायचे ठरवल्यास व्यवस्थापनाचे गणित पूर्णपणे बिघडून जाते. दुबार, तिबार पेरणी करावी लागते. शेतकरी कर्जबाजारी अन् उद्ध्वस्त होतो. अशा वेळी काय करावे, असा शेतकऱ्यांचा हताश प्रश्न असतो.
पाण्याला गृहीत धरू नका...
एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. आपण पाण्याला, पावसाला गृहीत धरतो, कारण ते निसर्गाकडून मोफत मिळते. एखादी गोष्ट मोफत मिळते, तेव्हा त्याची किंमत आपल्या लक्षात येत नाही. तीच बाब वरदान असलेल्या पाण्याबाबत घडत आली आहे. याचे उत्तर सहज आणि सोपे आहे ते म्हणजे सेंद्रिय आणि निसर्ग शेती.
अशा जमिनीत सेंद्रिय कर्ब जास्त असतो. म्हणजेच त्यामध्ये ‘ह्युमस’ जास्त असतो. मातीचे वजन कमी, आकार जास्त आणि पाणी धारण करण्याची क्षमताही उत्तम असते. मातींच्या कणांची रचना मध्यभागी मातीचा मोठा कण, त्यांच्या भोवताली अनेक छोटे कण वर्तुळाकार जोडलेले असतात. या प्रत्येक कणाभोवती उपयुक्त जिवाणूंचा थर असतो.
तसेच मोकळ्या असलेल्या भागात पाणी धरून ठेवलेले असते. उपयुक्त जिवाणूंमुळे मातीच्या कणामधील मूलद्रव्ये मोकळी होतात. ती या पाण्यात मिसळतात. या साठलेले संरक्षित पाण्यापर्यंत वनस्पतीची पांढरी मुळे पोहचतात आणि हे अमृत स्वीकारतात.
एका सुईच्या लहान टोकाएवढ्या मातीच्या कणांनी केलेले हे पाणी व्यवस्थापन आणि मुळांनी त्याचा केलेला सन्मान हे निसर्गाचे खरे शुद्ध रूप आहे. म्हणूनच पाण्याने थोडीबहुत ओढ दिली तरी सेंद्रिय शेतामधील पिके जमिनीवर ताठ उभी असतात. रासायनिक शेतीत दुर्दैवाने आपले पीक लगेच माना टाकताना दिसते. बाहेरून पाणी आवश्यक असेल तेव्हाच दिले पाहिजे.
आपल्या हवामानानुसार पाऊस, पाणी कमी आहे, हे माहिती असताना विहिरीवर विहिरी आणि बोअरवेल पाडत छिद्रांनी जमिनीची चाळण करून भूगर्भामधील पाणी उपसत राहण्याला पाणी व्यवस्थापन म्हणत नाहीत.
पाण्याचे चक्र समजून न घेता केवळ पाण्याचा उपसा करणाऱ्यांनी एक बाब लक्षात घेतली पाहिजे. भूगर्भातील हे पाणी कधीच शाश्वत नसते. आज बोअरला आठ इंची पाणी असले तरी ते कधीही एका इंचावर येऊ शकते अथवा कोरडे पडू शकते.
इथे तरी आपण थांबतो का, तर नाही. आपला यावर पर्याय काय? तर आहे त्यापेक्षा अधिक खोल बोअर घेणे, कर्ज काढून अजून दोन तीन बोअर घेणे इ. पण तुम्हीच थोडा विचार करून पाहा.
हा शाश्वत मार्ग आहे का? तर नाही. त्यापेक्षा पीक पद्धतीमध्ये बदल करून कमी पाण्यावरील पिके घेणे, शक्य तितकी शेती सेंद्रियखाली आणणे. सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीमध्ये पिकांचे अवशेष शेतातच पसरून ठेवले जातात.
त्यामुळे मातीमधील आर्द्रतेचे संरक्षण होते. शेवटी निसर्गाला निसर्गच साथ देतो. मोजक्या आणि उपलब्ध पाण्याचा वापर योग्य रीतीने केल्यास कोणत्याही शेतीतून मानवाची भूक नक्कीच भागू शकते.
nstekale@gmail.com (लेखक शेतीप्रश्नांचे अभ्यासक आहेत.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.