Chhatrapati Sambhajinagar News: उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे मराठवाड्यात फळबागांसमोरील जल संकटाचीही तीव्रता वाढत चालली आहे. शेतकरी उपलब्ध पाणी जमेल तसे वापरून बागा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत असले तरी अनेक ठिकाणी काही पर्यायच नसल्याने बागा काढण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. याचा सर्वाधिक फटका मोसंबीच्या बागांना बसला आहे.
जालना जिल्ह्यातील घनसावंगी, जालना, अंबड, तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, छत्रपती संभाजीनगर व सोयगाव तालुक्यांत फळबागांसमोरील संकट तीव्र झालेले आहे. भूगर्भातील व भूपृष्ठावरील जलसाठा झपाट्याने आटत चालल्यामुळे विहिरी, बोअरवेल व पाणीसाठे कोरडे पडले आहेत. उन्हाच्या तीव्रतेने बाष्पीभवनाचा वेगही वाढला आहे. आणखी वीस ते पंचेवीस दिवसांनंतर पाण्याची स्थिती अधिकच गंभीर होण्याची शक्यता आहे.
अशी आहे पीकनिहाय स्थिती
तज्ज्ञांच्या माहितीनुसार आताच्या घडीला मोसंबीच्या आंबिया बहराची फळे साधारणपणे ५० ते ७० ग्रॅमपर्यंत झाली आहेत. डाळिंबाचा मृग बहर काही प्रमाणात काढणीच्या अवस्थेत तर आंबिया बहर फळधारणा अवस्थेत आहे. लिंबू हस्त बहर फळे काढणे सुरू असून साधारणतः ३० टक्क्यांपर्यंत या बहराची फळेही काढली गेली आहेत. यंदा केसर आंब्याला दोन-तीन टप्प्यांत फुलोरा आला. पहिल्या टप्प्यातील फळे पक्वतेच्या अवस्थेत आहेत, तर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांतील फळांना पाण्याची गरज वाढली आहे.
बागा वाचवा मोहीम
मोसंबी संशोधन केंद्रातर्फे ‘बागा वाचवा मोहीम’ हाती घेण्यात आल्याचे केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी सांगितले. त्यानंतर सोयगाव तालुक्यातील कंकराळा, माळेगाव, जरंडी, निंबायती परिसरातील बागांना रविवारी (ता. २०) प्रत्यक्ष भेट देऊन डॉ. पाटील यांनी मार्गदर्शन केले. या वेळी मोसंबी बागायतदार मोतीलाल वाघ, संभाजी पाटील, सचिन पाटील, सुभाष वाघ, जीवनराम वाघ, लच्छू चव्हाण, गणेश काळे, दिलीप पाटील, विजय पाटील आदींची उपस्थिती होती. सोयगाव तालुक्यात सुमारे २ हजार ८६७ हेक्टरवर मोसंबी फळपीक आहे.
...असा दिला सल्ला
मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी सांगितले की, सध्या पाणीटंचाई जाणवत असली तरी शेतकऱ्यांनी धीर सोडू नये व बागा तोडण्याची चूक करू नये. आच्छादन, ठिबक सिंचन, फळांची विरळणी, बाष्पोत्सर्जकाचा वापर, मटका सिंचन, हायड्रोजेल, केओलीन, बोर्डो पेस्ट आदींचा वापर केल्यास बागा जिवंत राहण्यास मदत मिळते. पाण्याची खूपच टंचाई जाणवत असल्यास आंबिया बहराची सर्व फळे तोडून बागा वाचवाव्यात.
आमच्या गाव शिवारातील विहिरी तीन ते चार तासांवर आल्या. तर लगतच्या रावेरी शिवारात केवळ एक ते दोन तास विहिरीतील पाणी पुरते. रात्रीच्या वेळी पाणी देऊन फळबागा जगवण्याचा प्रयत्न सुरू आहे.मोतीलाल वाघ, केळी उत्पादक, कंकराळा ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर
पाणीटंचाई जाणविण्याचा अंदाज दिसल्याने बऱ्यापैकी लगडलेली आंबिया बहराची फळे पाण्याची ताडन देऊन गाळून टाकली. आतापर्यंत सुमारे एक लाख रुपयांचे पाणी टँकरने घेतले. आणखी किमान ४० दिवस पाणी लागेल.आसाराम घुगरे, मोसंबी उत्पादक, अंबड. जि. जालना
माझ्याकडे अडीच एकरांतील ९ वर्षांच्या मोसंबी बागेपैकी अर्धा एकरातील झाडे काढून टाकली. उरलेल्या दोन एकरांतील झाडांना जमेल तसे व जमेल तिथून पाणी देण्याचा प्रयत्न करतो. मोटार पंप पंधरा मिनिटांच्या पुढे चालत नाही.धर्मा नागरे, मोसंबी उत्पादक, आडगाव बु., ता. जि. छत्रपती संभाजीनगर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.