Agriculture Warehouse Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Warehouse : गोदामाची रचना आणि सुरक्षिततेचे उपाय

Team Agrowon

मंगेश तिटकारे, हेमंत जगताप

प्राथमिक कृषी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गट आणि त्यांचे समूह अशा विविध प्रकारच्या समुदाय आधारित संस्था व्यवसाय उभारणीच्या दृष्टीने आणि विविध पिकांच्या पुरवठा साखळीत सहभागी होऊन आर्थिक उत्पन्न मिळविण्याच्या उद्देशाने प्रयत्न करीत आहेत. गोदाम उभारणीच्या विविध उद्देशाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने गोदामाची रचना करणे आवश्यक आहे. त्यानुसार व्यवस्थित नियोजन करून गोदामाची उभारणी करावी.

प्राथमिक कृषी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, महिला बचत गट आणि त्यांचे समूह अशा विविध प्रकारच्या समुदाय आधारित संस्था व्यवसाय उभारणीच्या दृष्टीने आणि विविध पिकांच्या पुरवठा साखळीत सहभागी होऊन आर्थिक उत्पन्न मिळविण्याच्या उद्देशाने प्रयत्न करीत आहेत. गोदाम उभारणीच्या विविध उद्देशाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने गोदामाची रचना करणे आवश्यक आहे. त्यानुसार व्यवस्थित नियोजन करून गोदामाची उभारणी करावी.

गोदामाची रचना

गोदामाचे प्रकार (मालाची थप्पी, साठवणुकीचे साहित्य किंवा साठवणूक करण्यात येणाऱ्या उत्पादनानुसार)

गोदामाचा आकार किती मोठा असावा हे खालील काही घटकांवर अवलंबून असते.

जागेची उपलब्धता.

निधीची तरतूद.

गोदामात साठवणूक करण्यात येणारे उत्पादन.

गोदाम बांधण्याचा हेतू.

शासकीय योजना.

बँकेमार्फत करण्यात येणारे निधीचे सहकार्य.

गोदाम उभारून करण्यात येणाऱ्या व्यवसायाचा प्रकार.

गोदाम उभारणीसाठी उपलब्ध जागेच्या परिसरातील शेतीची परिस्थिती, शेतीमाल साठवणुकीची आवश्यकता व गरज.

गोदाम उभारणीसाठी उपलब्ध जागेच्या परिसरातील औद्योगिक परिस्थिती, जवळचे रेल्वे स्थानक, विमानतळ व निर्यातसुविधा इत्यादी व्यवसाय पूरक घटक.

गोदामाचा आकार आणि अंतर्गत रचना

गोदामात साठवणूक करण्यात येणाऱ्या उत्पादनाच्या भौतिक व रासायनिक गुणधर्मानुसार गोदामाची उंची, रुंदी व लांबी गृहीत धरून त्याचा आकार ठरविला जातो.

साखर

साखर वातावरणातील ओलावा शोषून घेते आणि विरघळून त्याचे पाण्यात रूपांतर होते. यापासून नुकसान टाळण्यासाठी गोदामाच्या भिंती मजबूत दगडापासून बनविणे आवश्यक आहे.

ओलावा निर्माण होण्यापासून टाळण्यासाठी अशा गोदामास खिडक्या नसाव्यात. गोदामातील जमिनीवर ताडपत्री अंथरून त्यावर साखरेच्या गोण्या ठेवाव्यात.

गोदामाची भिंत आणि साखरेच्या गोण्यांमध्ये अंतर ठेवावे. भिंत किंवा गोण्यांमध्ये अडथळा येईल अशी रचना करावी. जेणेकरून साखरेतून येणारा ओलावा गोदामाच्या जमिनीत अथवा भिंतीत मुरणार नाही किंवा गोदामाच्या भिंतीमधील अथवा जमिनीतील ओलावा साखरेच्या गोण्यांमध्ये मुरणार नाही.

सिमेंट

सिमेंट वातावरणातून ओलावा शोषून घेते. त्यामुळे गुठळ्या तयार होतात.

सिमेंटच्या गोण्यांची थप्पी १२ थरांपेक्षा जास्त असेल तरीही पायातील थरात असणाऱ्या सिमेंटच्या गोण्यातील सिमेंटच्या गुठळ्या बनून सिमेंटची ताकद कमी होऊन त्याचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी सिमेंटच्या गोण्या ताडपत्री किंवा लाकूड किंवा प्लॅस्टिकच्या पॅलेट्सवर ठेवाव्यात. सिमेंटच्या गोण्यांची थप्पी गोदामाच्या भिंतीला चिकटून ठेऊ नये. एका थप्पीत १० ते १२ पेक्षा जास्त गोण्या ठेवू नयेत.

दूध पावडर

दूध पावडर भरलेल्या पोत्यांची हाताळणी करताना ही पावडर गोदामातील सिमेंट काँक्रीटच्या जमिनीवर पसरते. दूध पावडरमधील दुग्धशर्करा आम्ल (लॅक्टिक अॅसिड) आणि गोदामातील काँक्रीटच्या जमिनीतील सिमेंट यांची रासायनिक प्रक्रिया होते. त्यामुळे गोदामातील भिंती व जमिनीला लहान लहान खड्डे पडून नुकसान होते.

नुकसान टाळण्यासाठी प्लॅस्टिकचा कागद वापरावा. हा कागद दूध पावडर पोती, गोदामाच्या भिंती यामध्ये ठेवावा. हा कागद गोदामातील जमिनीवर अंथरून त्यावर दूध पावडर पोत्यांची थप्पी रचावी.

दुधाचे अॅल्युमिनियम किंवा स्टीलचे कॅन

दुधाने भरलेले किंवा रिकाम्या दूध कॅनची हाताळणी करताना गोदामातील सिमेंट काँक्रीटच्या जमिनीचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी गोदामाच्या जमिनीवर लोखंडी कास्टिंगच्या फरशांचा वापर करावा. यासाठी पदार्थाच्या रासायनिक प्रक्रियेमुळे गोदामाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी गोदामाच्या भिंती व जमीन यांची विशिष्ट पद्धतीने उभारणी करावी. तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

कमी वजनाच्या उत्पादनांची साठवणूक

वाळविलेली मिरची

वाळविलेल्या मिरचीचे वजन कमी असल्याने त्याच्या पोत्यांची उंच थप्पी तयार करणे

अवघड असते. अशा उत्पादनांची थप्पी सिमेंटचे अंतर्गत मजले किंवा स्टीलचे मजले अशा प्रकारची रचना गोदामातील आतल्या भागात करावी लागते.

औषधी उत्पादने

औषधी उत्पादने शक्यतो कोरूगेटेड बॉक्समध्ये साठवून त्याची थप्पी लावली जाते. परंतु अशा बॉक्सची थप्पी लावण्यास मर्यादा असतात. जास्तीत जास्त ३ मीटरपर्यंत अशा उत्पादनांच्या बॉक्सची थप्पी लावता येते.

गूळ

गुळाच्या ढेपांची थप्पी जास्त उंचीपर्यंत लावण्यास मर्यादा असतात. त्यामुळे गोदामातील जागेचा जास्तीत जास्त वापर होण्यासाठी सिमेंटचे अंतर्गत मजले किंवा स्टीलचे मजले अशा प्रकारची रचना गोदामातील आतल्या भागात करावी लागते.

खते, औषधे, बियाणे

गोदामांमध्ये खते, औषधे व बियाणे अशा प्रकारच्या कृषी निविष्ठा साठविण्यात येतात. कृषी निविष्ठामध्ये प्रामुख्याने खत उत्पादन करणाऱ्या शासकीय, खासगी व सहकारी उत्पादक संस्था व कंपन्यांमार्फत खतांची गोदामात साठवणूक करण्यात येते.

युरिया खताच्या ओलाव्यामुळे गोदामाच्या भिंती व आतील सिमेंट काँक्रीटच्या जमिनीला खड्डे पडू लागतात. सिमेंटसोबत रासायनिक प्रक्रिया झाल्यामुळे भिंत, जमीन यांचे हळूहळू नुकसान होते. खते हवेच्या संपर्कात आल्यामुळे हवेबरोबर रासायनिक प्रक्रिया झाल्याने खते ठेवलेल्या गोदामात आम्लधर्मीय वातावरणाची निर्मिती होते.

आम्लधर्मीय वातावरणामुळे गोदामातील खते ठेवलेली जमीन, भिंती, खिडक्या, आतील लोखंडी खांब, खिडक्यांची लोखंडी तावदाने, गोदामाचे लोखंडी रोलिंग शटर, गोदामाचे पत्रे यांना गंज लागण्यास सुरुवात होते. गंज लागल्याने गोदामातील सर्व लोखंडी भाग कमकुवत होऊन त्याचे तुकडे पडतात. गोदामाच्या छतावरील पत्र्यांना गंजामुळे बिळे पडतात. त्यातून पावसाचे पाणी आत शिरून साठवणूक केलेल्या मालाचे नुकसान होते.

सहकारी संस्थांच्या गोदामांची दुरुस्ती

सहकार क्षेत्राचे खत निर्मिती आणि वितरणात मोठे योगदान आहे. खतांची साठवणूक करताना मोठे उत्पादक आणि कंपन्यांना वैज्ञानिक पद्धतीने खते साठवणुकीची माहिती असल्याने त्याच्या मार्फत खते साठवणुकीबाबत काळजी घेतली जाते. देशभरात सहकारी संस्थांमार्फत मोठ्या प्रमाणावर खतांची साठवणूक व हाताळणी केली जाते.

सहकारी संस्थांमध्ये प्रामुख्याने प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांमार्फत खताचा मोठ्या प्रमाणावर व्यवसाय व साठवणूक केली जाते. परंतु खते विक्रीचा व्यवसाय करताना गोदामात खतांची वैज्ञानिक पद्धतीने साठवणूक या प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांना जमलेली नसल्याचे राज्यातील विविध जिल्ह्यांतील प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांना दिलेल्या भेटीत निदर्शनास येत आहे. खतांचा व्यवसाय करताना काही निवडक संस्था सोडल्या तर इतर सहकारी संस्था गोदामाची काळजी घ्यायची जाणीवपूर्वक विसरल्या.

१९८३-८४ मध्ये खतांची साठवणूक व वितरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांना शासनामार्फत गोदामे उभारणीसाठी अर्थसाह्य करण्यात आले. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत थेट खते पुरविण्याची यंत्रणा निर्माण केली गेली. २००८-२००९ या आर्थिक वर्षात राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून अर्थसाह्य देऊन राज्यातील गोदामधारक प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या गोदामांची दुरुस्ती करण्यात आली. प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या गोदामांची दुरुस्ती करण्याची गरज खालील काही कारणांमुळे भासली.

वर्षानुवर्षे सहकारी संस्थांमार्फत वैज्ञानिक पद्धतीने खतांचा साठा न करणे.

गोदामाची वेळोवेळी देखभाल व दुरुस्ती न करणे.

गोदाम दुरुस्तीकरिता शासनाच्या अनुदानाची वाट पाहणे. त्यातल्या त्यात गोदामदुरुस्तीसाठी १०० टक्के अनुदान असेल तर उत्तमच अन्यथा गोदाम दुरुस्ती न करणे.

गोदामात खते साठविताना जमिनीवर प्लॅस्टिक कागद (डनेज) न अंथरणे. प्लॅस्टिक किंवा लाकडाचे पॅलेट्स न ठेवणे किंवा इतर पर्यायी व्यवस्था न करणे.

गोदामाच्या भिंतीच्या आधारे आतील बाजूस खतांची पोती रचून ठेवण्यात येतात. यामुळे खतातील आम्ल भिंतीत मुरल्याने भिंतीचा रंग, त्यावरील प्लास्टर याचे नुकसान होते. भिंतीला टेकून खताची पोती रचून ठेवण्यापूर्वी भिंतीला शहाबादी फरशी दोन फुटांपर्यंत न बसविल्याने (डिडो) खतातील अॅसिडचा वर्षानुवर्षे थेट गोदामाच्या भिंतीशी संपर्क आल्याने गोदामाच्या भिंती कमकुवत होतात. अशा कमकुवत भिंती तत्काळ कोसळतात. अशा कमकुवत भिंतीची गोदामे राज्यात काही संस्था वगळता बऱ्याच ठिकाणी पाहावयास मिळतील.

प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांमार्फत गोदाम व्यवसाय करताना कोणतीही स्वच्छता पाळली जात नाही.

अशा अस्वच्छतेमुळे उंदीर, घुशी निर्माण होऊन बऱ्याच संस्थांची गोदामे पोखरली आहेत.

गोदामाच्या छतावर पडणारे पावसाचे पाणी गोदामाच्या चारही बाजूस व्यवस्थित गटार व्यवस्था नसल्याने पावसाच्या पाण्यासोबतच इतर कारणांमुळे निर्माण झालेल्या पाण्यामुळे व त्याच्या अयोग्य व्यवस्थापनामुळे गोदामाच्या भिंती कमकुवत झाल्या आहेत.

(माहिती स्रोत ः भारतीय अन्न महामंडळाची माहिती पुस्तिका आणि ‘एमसीडीसी‘ सनदी अभियंता यांची गोदाम विषयी मार्गदर्शक पुस्तिका)

- प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०

(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट, साखर संकुल, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Anudan : दूध अनुदानात २ रुपयांची वाढ पण शेतकऱ्यांऐवजी दूध संघांचा फायदा

Crop Damage : तासगाव तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा

Onion Seed : रब्बी कांदा बियाण्याची चढ्या दराने विक्री

Rain Update : सांगली जिल्ह्यात सरासरीच्या १७३.८ टक्के पाऊस

Satara Rain : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT