Agriculture Warehouse : शास्त्रशुद्ध पद्धतीने गोदाम उभारणीचे नियोजन

Warehouse Management : गोदाम उभारणीपूर्वी मास्टर लेआऊट तयार करणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. गोदाम उभारणी हा खर्चिक विषय असल्याने सूक्ष्म नियोजन करावे. गोदामाची वास्तू मजबूत आणि पर्यावरणदृष्ट्या योग्य तसेच गोदामाचे आयुर्मान जास्तीत जास्त वर्ष टिकावे यासाठी योग्य काळजी घ्यावी.
Agriculture Warehouse
Agriculture Warehouse Agrowon
Published on
Updated on

मंगेश तिटकारे, हेमंत जगताप

Agriculture Warehouse Construction : केंद्रशासनामार्फत गोदाम व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी गोदाम उभारणीच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांमार्फत गोदाम उभारणी करताना तांत्रिक माहिती व योग्य मार्गदर्शन नसल्याने विविध शंका विचारल्या जातात. तसेच याअभावी बांधलेली गोदामे कमी खर्चात, अवैज्ञानिक असल्याने भविष्यात अशा गोदामांना प्रचंड व्यवस्थापन खर्च होतो. मागील लेखात आपण गोदाम उभारणी करताना जमिनीची निवड, मातीचे परीक्षण, रस्ते, वीज, पाणी व वजन काट्याचे गोदाम उभारणीत महत्त्व, गोदाम उभारणी निगडित इतर खर्च याबाबत माहिती घेतली. परंतु गोदाम उभारणी हा अत्यंत खर्चिक विषय असल्याने सूक्ष्म नियोजन करून मजबूत व वैज्ञानिक पद्धतीने गोदाम उभारणी करणे अत्यंत गरजेचे आहे.

गोदाम उभारणी करताना :

जमीन सपाटीकरण आणि इतर आनुषंगिक खर्च कमीत कमी असावा. म्हणजेच गोदाम उभारणी करताना निवडलेली जमीन सपाट, मुरूम असलेली, पाण्याचा प्रवाह न गेलेली, रेल्वे, विमानतळ, ट्रक टर्मिनल किंवा निर्यातीकरिता तयार करण्यात आलेल्या बंदरापासून जवळ, जमिनीवर इतर कोणतेही बांधकाम नसलेली, कोणताही कागदपत्राच्या भानगडीत न गुंतलेली असावी.

गोदामात साठवणूक करण्यात येणाऱ्या वस्तूंचा वाहतूक खर्च आर्थिकदृष्ट्या स्वस्त, सुरक्षित व जलद गतीने होण्याच्या दृष्टीने गोदामाच्या जागेची निवड करावी.

गोदाम व्यवसाय कार्यान्वित करताना त्यातील विविध उपक्रम जसे की, हमाली, गोदाम भाडे व इतर कामकाजाचा खर्च आर्थिक व व्यावहारीकदृष्ट्या योग्य असावा.

गोदामाची वास्तू मजबूत आणि पर्यावरणदृष्ट्या योग्य तसेच गोदामाचे आयुर्मान जास्तीत जास्त वर्षे टिकावे यासाठी योग्य काळजी घ्यावी.

जर गोदाम उभारणीसाठी निवडलेली जमीन अति डोंगराळ भागात किंवा पूर येणाऱ्या भागात असेल तर जमीन दुरुस्तीचा खर्च अधिक असल्याने शक्यतो अशा भागात गोदाम उभारणी टाळावी.

Agriculture Warehouse
Agriculture Warehouse : शास्त्रीय पद्धतीने गोदामांची उभारणी

गोदामाच्या प्रकारावर आधारित मास्टर प्लॅनमधील बाबी :

गोदामाच्या वैज्ञानिक पद्धतीने उभारणीच्या दृष्टीने जागेची उपलब्धता (Floor Space Index-FSI) व गोदाम उभारणीचे खालील विविध घटकांचा विचार करून मास्टर प्लॅन तयार करणे गरजेचे आहे.

गोदामाची इमारत

कार्यालय इमारत

उपहारगृह आणि कामगारांना कपडे बदलण्यासाठी खोली (क्लॉक रूम)

ट्रक व दुचाकीसाठी वाहनतळ.

गोदामासाठी कुंपणाची भिंत, प्रवेशद्वार आणि बाहेर जाण्याचे द्वार.

इलेक्ट्रॉनिक वजनकाटा

जमिनखाली आणि जमिनीवरील पाण्याची टाकी आणि आगविरोधक कामकाजासाठी पाण्याची टाकी

विजेची पर्यायी व्यवस्था जसे की इलेक्ट्रिकल ट्रान्स्फॉर्मर, जनरेटर इत्यादीची तरतूद.

अंतर्गत रस्ते व सांडपाण्यासाठी अंतर्गत गटारांचे नियोजन.

पावसाच्या पाण्याची साठवणूक व जमिनीत मुरविणे इत्यादीसाठीचे नियोजन (रेनवॉटर हार्वेस्टिंग)

आगविरोधक यंत्रणा व त्यासाठी आवश्यक पाइपलाइन

सीसीटीव्ही कॅमेरा

वीज, सीसीटीव्ही, सुरक्षा अलार्म, आगविरोधक यंत्रणा व त्यासाठी आवश्यक पाइपलाइन इत्यादींकरिता अंतर्गत वायरिंगचे/ केबलचे नियोजन.

दोन गोदामांमधील अंतर :

गोदामाची साठवणूक क्षमता.

गोदामाच्या एकूण रोलिंग शटरची संख्या (दरवाजे), प्लॅटफॉर्म व त्यांची रुंदी, साठवणूक करण्यात येणाऱ्या व गोदामात चढ-उतार करण्यात येणाऱ्या वस्तूंचा प्रकार.

साठवणूक करण्यात येणाऱ्या वस्तूंसाठी ट्रक सारख्या वाहनाची क्षमता. त्याची लांबी, रुंदी व उंची.

साठवणूक करण्यात येणाऱ्या वस्तूंसाठी आवश्यक वाहनाचा प्रकार जसे की ट्रक, कंटेनर, ट्रेलर इत्यादी.

अंतर्गत गटारांवरील झाकणांची रुंदी.

दोन विरुद्ध दिशेला असणाऱ्या गोदामांमधील अंतर किमान १० मीटर व जास्तीत जास्त १५ ते २० मीटर असावे.

गोदामासाठी निवडण्यात येणाऱ्या जागेचा प्रकार व भूमितीय आकार :

गोदाम बांधकामासाठी निवडण्यात आलेल्या जागेचा आकार जागेचा जास्तीत जास्त वापर होण्याच्या अनुषंगाने शक्यतो आयताकार असावा.

आयताकार जागा असेल तरच जागेचा जास्तीत जास्त वापर शक्य होऊ शकतो. चौकोनी किंवा वेडावाकडा आकार असणाऱ्या जागेत हे शक्य नसते.

गोदाम उभारणीसाठीच्या जागेचे माप शक्यतो ६२ बाय ४२ मीटर किंवा ७४ बाय ४८ मीटर या प्रमाणात असावे.

प्रकार १ ६२ बाय ४२ मीटर (४२+१०+१०) बाय (२२+१०+१०)

प्रकार २ ७४ बाय ४८ मीटर (५४+१०+१०) बाय (२८+१०+१०)

Agriculture Warehouse
Warehouse Management : गोदाम उभारणीचे व्यावसायिक उद्देश

गोदामाच्या प्रकारानुसार वाहनाच्या वाहतुकीसाठी गोदामाच्या चारही बाजूंना सोडण्यात येणाऱ्या जागेची रुंदी

गोदामाच्या चारही बाजूंनी असणाऱ्या जागेचा वापर गोदामातील कामकाजासाठी आणि वस्तूंच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यानुसार मास्टर प्लॅनमध्ये मांडणी करणे आवश्यक असते.

गोदामातील कामकाज जलदगतीने व सुरक्षितरीत्या व्हावे यासाठी गोदामाच्या परिसरात मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांची व्यवस्थितपणे वर्दळ होणे आवश्यक असल्याने गोदामाच्या चारही बाजूंनी योग्य अंतर ठेवावे.

वाहनांच्या वर्दळीसाठीच्या जागेची रुंदी गोदामांच्या खालील प्रकारांवर आणि घटकांवर अवलंबून असते.

१) कव्हर आणि प्लिन्थ (कॅप), २) एकाच ओळीतील गोदाम, ३) एकमेकाच्या विरुद्ध दिशेला असणारी गोदामे, ४) कंटेनर फ्रेट स्टेशन, ५) कंटेनर, ट्रक व ट्रेलर यांची लांबी व रुंदी, ६) साठवणूक व वाहतूक करण्यात येणाऱ्या मालाचा प्रकार.

वाहनांच्या वर्दळीसाठीच्या जागेची रुंदी गोदामांच्या प्लॅटफॉर्मच्या खालील प्रकारांवरसुद्धा अवलंबून असते.

गोदामाच्या दरवाजाच्या अथवा रोलिंग शटरच्या पुढे ठेवण्यात आलेला प्लॅटफॉर्म.

गोदामाच्या रचनेनुसार सलगरीत्या तयार करण्यात आलेला प्लॅटफॉर्म.

जहाज, कंटेनर, विमान यांच्या सोयीकरिता उतरणीनुसार असणारे डॉक लेवलर प्रकारचे प्लॅटफॉर्म.

अंतर्गत गटारांची योग्य तरतूद.

गोदामांच्या प्रकारानुसार प्लॅटफॉर्म जसे की स्वतंत्र गोदाम किंवा एकमेकाविरुद्धची गोदामे.

गोदामाच्या मास्टर प्लॅनमध्ये वाहनतळ उभारणीबाबतचे विविध घटक ः

नागरिकांना होणारा वाहनाच्या वर्दळीचा त्रास व वाहनांची तसेच साठवणूक करण्यात येणाऱ्या मालाची सुरक्षितता या दोन्ही उद्देशांच्या दृष्टीने गोदामाच्या कुंपणाच्या आतील बाजूस शक्यतो वाहनतळाची सोय करण्यात यावी.

मालाने भरलेले व माल उतरविण्यासाठी आलेले ट्रक व माल नसलेले रिकामे ट्रक यांच्यासाठी शक्यतो स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था असावी.

वजन काटा प्रवेशद्वारापाशी असावा.

सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहनतळावर सीसीटीव्हीची सोय असावी.

वाहनतळ व गोदामातील मालाच्या व्यवस्थापनाचे कामकाज यात भिंतीचे कुंपण असावे. वाहनतळातून गोदाम परिसरात जाणाऱ्या आणि येणाऱ्यांसाठी गेटपासचे आयोजन करावे, जेणेकरून मालाची सुरक्षा व मालाचे व्यवस्थापन जलदगतीने करणे सोईस्कर होईल.

इलेक्ट्रॉनिक वजनकाटा उभारणीची जागा अथवा योग्य स्थान :

वजनकाटा शक्यतो गोदामाच्या पुढील बाजूच्या अथवा मागील बाजूच्या प्रवेशद्वाराजवळ असावा.

वजनकाटा उभारण्यात येणाऱ्या जागेची लांबी अथवा रुंदी वजनकाट्याच्या प्रकारावर जसे की १) इलेक्ट्रॉनिक सरफेस वजनकाटा २) पिट माउंटेड वजनकाटा यावर अवलंबून असते.

वजनकाट्याची वजन करण्याची क्षमता १) गोदामात येणाऱ्या अथवा जाणाऱ्या मालाचे वजन २) माल वाहतूक करणाऱ्या वाहनाची वजन पेलण्याची क्षमता, या बाबींवर अवलंबून असते.

गोदामाची उंची :

गोदामाची आतील भागाची उंची प्लिन्थ स्तर किंवा पूर्ण काम झालेल्या पायापासून ते गोदामाच्या छताच्या दोन्ही बाजूंकडून एकत्रित आलेल्या टोकांपर्यंत मोजली जाते. शक्यतो ही उंची ५.५० मीटर असावी. तसेच बाहेरील भागाची उंची रस्त्यापासून प्लिन्थ व पुढे छतापर्यंत मोजली जाते.

गोदामाच्या उंचीबाबत गोदामधारकाची गरज वेगळी असेल तर गोदामाची उंची गरजेनुसार जास्त ठेवता येते.

गरजेनुसार जास्त उंची ठेवण्याच्यादृष्टीने आणि जागेचा जास्तीत जास्त उपयोग करण्याच्या अनुषंगाने मेजनाईन फ्लोअर म्हणजेच अंतर्गत मजला वाढवून त्यानुसारसुद्धा गोदामाची उंची ठेवता येते.

औद्योगिक वापरासाठी तयार करण्यात येणाऱ्या गोदामांची उंची ५.५० मीटरहून अधिक ठेवताना जड साहित्याची हाताळणी करण्याच्या उद्देशाने कॉलमची उंची सुद्धा त्याप्रमाणात ठेवण्यात येते.

छताच्या वरच्या भागात जोरदार वाऱ्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी उच्च गुणवत्तेचे साहित्य वापरण्यात यावे. त्याची रचना जोरदार वाऱ्यात सुद्धा तग धरून राहील अशी असावी.

(माहिती स्रोत : भारतीय अन्न महामंडळाची माहिती पुस्तिका आणि ‘एमसीडीसी‘

सनदी अभियंता यांची गोदाम विषयी मार्गदर्शक पुस्तिका)

गोदाम उभारणीसाठी मास्टर लेआउट :

गोदाम उभारणीपूर्वी काही घटक गृहीत धरून नियोजन करणे अत्यंत आवश्यक असते. मास्टर लेआउट तयार करणे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मास्टर लेआउट बनविण्यासाठी गोदाम व्यवसायात कार्यरत सनदी आर्किटेक्ट, सनदी चार्टर्ड अभियंता, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाकडील बांधकाम अभियंता इत्यादींची मदत घेण्यात यावी. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ देखील गोदाम उभारणीशी निगडित साह्य करते. शक्यतो मास्टर प्लॅन बनविणारे अभियंता हे गोदाम व्यवसायात कार्यरत असल्यास त्यांना प्राधान्य द्यावे. मास्टर प्लॅन बनविताना खालील मुद्दे लक्षात घ्यावेत.

मास्टर प्लॅनमधील विविध बाबी गोदामाच्या प्रकारावर आधारित असाव्यात.

दोन गोदामांमधील अंतर.

गोदामाची दिशा आणि मांडणी.

गोदामासाठी निवडण्यात येणाऱ्या जागेचा प्रकार व भूमितीय आकार.

गोदामाच्या प्रकारानुसार वाहनाच्या वाहतुकीसाठी गोदामाच्या चारही बाजूंना सोडण्यात येणाऱ्या जागेची रुंदी.

गोदामाच्या मास्टर प्लॅनमध्ये वाहनतळ उभारणीबाबतचे विविध घटक.

इलेक्ट्रॉनिक वजनकाटा उभारणीची जागा.

गोदामाची उंची.

- प्रशांत चासकर, ९९७०३६४१३०

(शेतीमाल तारण व्यवस्थापन सेवा तज्ज्ञ, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ मर्या. स्मार्ट, साखर संकुल, पुणे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com