Pune News : राज्यात हवामान आधारित फळ पिक विमा योजना आंबिया बहार २०२४-२५ साठी विमा अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक जवळ आला. राज्यात आतापर्यंत १ लाख ७३ हजार १२९ विमा अर्ज दाखल झाले आहेत. गेल्यावर्षी आंबिया बहारसाठी २ लाख ३१ हजार २२२ विमा अर्ज आले होते. काही पिकांचे विमा अर्ज जास्त आल्याने त्याची पडताळणी केली जाणार आहे, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.
राज्यात हवामान आधारित फळ पिक विमा योजना आंबिया बहार २०२४-२५ मध्ये केळी पिकासाठी ८२ हजार ५८ विमा अर्ज दाखल झाले आहेत. मागील हंगामात केळीसाठी ६२ हजार ५५९ अर्ज होते. म्हणजे यंदा जवळपास २० हजार अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्याची क्षेत्रीय पडताळणी सुरू आहे. द्राक्ष विम्यासाठी ९ हजार १५९ अर्ज प्राप्त झाले आहेत. मागील हंगामात ४ हजार ५२२ अर्ज आले होते. तर स्ट्रॉबेरी पिकामध्ये एकही अर्ज प्राप्त झालेला नाही.
मोसंबी पीक विम्यासाठी यंदा केवळ ८ हजार २०० विमा अर्ज दाखल झाले आहेत. गतवर्षी शेतकऱ्यांनी मोसंबी विम्यासाठी १५ हजार ९७० अर्ज दाखल केले होते. म्हणजेच यंदा अर्जांची संख्या जवळपास निम्मी झाली. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे पाण्याच्या कमतरतेमुळे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी बाग काढल्या आहेत. त्यामुळे अर्ज कमी आल्याचे दिसते, असे कृषी विभागाने स्पष्ट केले.
अंतिम दिनांक
हवामान आधारित फळ पिक विमा योजना आंबिया बहार अंतर्गत काजू, संत्रा आणि कोकणातील आंबा पिकासाठी विमा काढण्याचा अंतिम दिनांक ३० नोव्हेंबर आहे. म्हणजेच केवळ एकच दिवस शिल्लक आहे. तर कोकण व्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रातील आंबा पिकासाठी ३१ डिसेंबरपर्यंत विमा काढता येईल. डाळिंब पिकासाठी १४ जानेवारी २०२५ पर्यंत विमा अर्ज भरता येईल. उर्वरित पिकांचा भाग घेण्याचा कालावधी संपला आहे.
चुका टाळण्याचे आवाहन
मागील हंगामात फळपीक विमा योजनेत गैरप्रकार आढळून आले होते. त्यात फळबाग लागवड केली नसताना, फळबाग उत्पादनक्षम वयाची नसताना, कमी क्षेत्रावर फळबाग लागवड असताना जास्त क्षेत्रावर विमा घेतल्याने आणि इतर शेतकऱ्याच्या शेतावर विमा घेणे यासारखे प्रकार निदर्शनास आले होते. अशा विमाधारकांचे विमा प्रस्ताव रद्द करण्यात आले असून त्यांचा विमा हप्ता जप्त केला आहे. कार्यवाही देखील होऊ शकते. त्यामुळे अशा पध्दीने विमा घेऊ नये.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.