Beekeeping Update Agrowon
ॲग्रो विशेष

Beekeeping Update : मधुमक्षिका पालनासाठी विविध योजना

Honey Bee : भौगोलिकदृष्ट्या मधुमक्षिका पालनासाठी महाराष्ट्रातील वातावरण उपयुक्त आहे. जंगल, फळबागा, वनक्षेत्र, तेलबिया लागवडीच्या ठिकाणी मधमाश्‍यांच्या वसाहती उत्तमरीत्या वाढू शकतात.

Team Agrowon

डॉ. के. पी. मोते

Beekeeping : ग्रामीण भागात मधमाशीपालानातून रोजगाराच्या संधी तयार होत आहेत. मधुमक्षिकापालन हा कृषिपूरक व्यवसाय असून, त्यापासून शाश्‍वत उत्पन्न मिळू शकते. विविध वृक्ष आणि पिकांच्या परागीभवनामध्ये मधमाश्‍यांचा मोठा वाटा आहे.

पीक उत्पादन वाढविण्यासाठी देखील मधुमक्षिकापालन अत्यंत आवश्यक आहे. अन्न साखळीमध्ये मधमाश्‍यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भौगोलिकदृष्ट्या मधुमक्षिका पालनासाठी महाराष्ट्रातील वातावरण उपयुक्त आहे.

जंगल, फळबागा, वनक्षेत्र, तेलबिया लागवडीच्या ठिकाणी मधमाश्‍यांच्या वसाहती उत्तमरीत्या वाढू शकतात. मधमाशीपासून मध, मेण, परागकण, रॉयल जेली, विष आणि प्रोपोलिस हे पदार्थ मिळतात.

आग्या माश्यांपासून सर्वांत जास्त मध मिळतो. सातेरी मधमाश्यांपासून प्रति वसाहत ६ ते ८ किलो मध मिळतो. फुलोरी माशी लहान असते. त्यांच्यापासून कमी मध मिळतो. त्यांच्या प्रत्येक वसाहतींमागे अंदाजे २०० ते ९०० ग्रॅम मध उत्पादन होते. मधमाशीपालनासाठी सातेरी व मेलीफेरा या जातीच्या मधमाश्‍यांचे संगोपन केले जाते.

मधमाशीपालनाचे फायदे :

१. शुद्ध मध, परागकण, मेणाचे उत्पादन मिळते.

२. शेतालगत/बांधालगत मधुमक्षिकापालन केल्यास पिकांच्या उत्पादनात सव्वा ते दीड पटीने वाढ होते.

३. शेतीपूरक व्यवसायातून आर्थिक उत्पन्न वाढते, रोजगाराची संधी वाढते.

मधाचे फायदे

१. शरीरास ऊर्जा देणारा, प्रतिकार शक्ती देणारा नैसर्गिक अन्नघटक.

२. स्नायूंना बळकटी मिळते. सर्दी, खोकला, कफ, दमा या विकारांवर उपयुक्त.

३. मध हा उत्तम अँन्टीबायोटिक आणि ॲन्टिसेप्टिक म्हणून काम करतो.

मधमाशीपालनासाठी विविध शासकीय योजना

भारत सरकारच्या कृषी मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय मधुमक्षिका मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून राज्यात राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मध अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये लघू अभियान I, लघू अभियान II व लघू अभियान III चा समावेश आहे.

लघू अभियान

१) यामध्ये शास्त्रोक्त मधुमक्षिका पालनाचा अंगीकार करून त्याद्वारे परागीकरण करून विविध पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता यांच्यात सुधारणा घडवून आणण्यावर भर देण्यात येत आहे. मधुमक्षिका पालनकर्त्यांची नाव नोंदणी, ट्रेसेबिलिटी प्रणाली, ब्लॉक चेन स्थापित करण्यात येत आहे.

२) प्रशिक्षित शेतकरी, मधुमक्षिका पालनकर्ते, उद्योजक यांच्याकडून शास्‍त्रोक्त मधुमक्षिकापालनाचा सुलभतेने अंगीकार, यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा पुरस्कार करण्यावर भर देण्यात येत आहे.

लघू अभियान I अंतर्गत बाबींचा समावेश

- दर्जेदार केंद्रक साठा विकास केंद्रे

- मधुमक्षिका प्रजनकांचा विकास

- एकीकृत मधुमक्षिकापालन विकास केंद्रे आणि मधुमक्षिका पालनातील उत्कृष्टता केंद्र

- मध आणि इतर पोळे उत्पादन, दर्जा नियंत्रण, परीक्षण प्रयोगशाळा आणि फिरत्या प्रयोगशाळा.

- मधुमक्षिका रोग निदान व उपचार प्रयोगशाळा, फिरती प्रयोगशाळा.

- मधुमक्षिका पालनासाठी लागणाऱ्या उपकरणांचे उत्पादन करणाऱ्या युनिट्सची स्थापना.

- मधुमक्षिका पालनासाठी लागणाऱ्या उपकरणांचे मानकीकरण.

- गरजेनुसार भाड्याने वस्तू /सेवा देणारी केंद्रे

- मधुमक्षिका उपचार केंद्रे स्थापित करणे

- मधुमक्षिका पालनाद्वारे महिलांचे सक्षमीकरण करणे

- कृषी व फलोत्पादनातील (बियाणे / फळे) उत्पन्न वाढ व दर्जा सुधारणेवर मधुमक्षिकांच्या पडणाऱ्या प्रभावांची तांत्रिक प्रात्यक्षिके.

- शास्त्रोक्त मधुमक्षिका पालनाच्या विकासासाठी नवीन जागतिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन.

- रॉयल जेली, मधुमक्षिका दंशविष, मधुमक्षिका परागकण, प्रोपोलिस, कोम्ब मध.

- उच्चमुल्य असलेल्या मधमाश्‍यांच्या पोळ्यातून निघणाऱ्या पदार्थांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या विशेष उपकरणांचे वितरण.

- मधुमक्षिका स्नेही वनस्पती, फुलझाडे, मधुमक्षिकावाटिका लागवड.

- परिषदा, कार्यशाळा, संमेलने

- प्रशिक्षण, अनुभव भेटी

लघू अभियान II

या अंतर्गत पीक काढणीनंतरच्या मधुमक्षिकापालन / पोळी यांच्या व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले जाईल. यामध्ये खालील घटकांचा समावेश आहे.

- मध व इतर पोळे उत्पादनांचे संकलन, व्यापार, चिन्ह, विपणन इत्यादीसाठी केंद्र.

- मध व इतर पोळे उत्पादनांचे पॅकेजिंग व साठवणूक, शीतगृहे.

- मध व इतर पोळे उत्पादनांवरील प्रक्रियांसाठी युनिट, कारखाने.

- मध व इतर पोळे उत्पादनांवर प्रक्रिया करणाऱ्या युनिट्स, कारखान्यांचे नूतनीकरण, विस्तार.

- मध व इतर पोळे उत्पादनांवर प्रक्रिया करणाऱ्या युनिट्समध्ये अंतर्गत चाचणी प्रयोगशाळा उभारणे.

लघू अभियान III

या अंतर्गत विविध प्रदेश, राज्ये, कृषीविषयक हवामान आणि सामाजिक आर्थिक परिस्थितीसाठी योग्य संशोधन व विकास करण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. मधुमक्षिका पालक,शेतकरी, संस्था, शेतकरी गटांनी लघू अभियान I,II,III अंतर्गत नमूद घटकांचे सविस्तर प्रस्ताव संबंधित जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी या कार्यालयास सादर करावेत.

या अभियानांतर्गत राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मध अभियानांतर्गत मधुमक्षिकापालक यांचे राज्यांतर्गत व राज्याबाहेरील प्रशिक्षण हे घटक देखील राबविण्यात येणार आहेत.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

- या अभियानांतर्गत मधुमक्षिका संचाकरिता २००० रुपये प्रति संच प्रकल्प खर्च ग्राह्य धरून ४० टक्के प्रमाणे ८०० रुपये प्रति संच अनुदान याप्रमाणे जास्तीत जास्त ५० संचापर्यंत अनुदान देय आहे.

- मधुमक्षिका वसाहतीकरिता २००० रुपये प्रति वसाहत प्रकल्प खर्च धरून ४० टक्के अनुदान देय आहे. यामध्ये जास्तीत जास्त ५० वसाहतीसाठी अनुदान देय राहील.

- मध काढणी यंत्राकरिता एकूण मापदंड २०,००० रुपये प्रति संच खर्चाच्या ४० टक्के प्रमाणे जास्तीत जास्त ८,००० रुपये मर्यादेत अर्थसाह्य देय आहे.

- सन २०२३-२४ मध्ये या घटकांकरीता एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत रक्कम १५.५८ लाख निधीची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

- कृषी विभागाच्या आत्मा, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा), खादी ग्रामोद्योग विकास महामंडळ, राष्ट्रीय मधुमक्षिका संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र यांचेमार्फंतही मधुमक्षिकापालनाशी निगडित विविध योजना राबविण्यात येतात.

(लेखक राज्याचे फलोत्पादन संचालक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Banana Export : करमाळ्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियाला रवाना

SCROLL FOR NEXT