Beekeeping In Maharashtra : मधमाशी पालनासाठी महाराष्ट्रात मोठी संधी

मधाचा वापर फक्त औषधापुरताच न राहता दैनंदिन आहारातही त्याचा वापर वाढत आहे. मागील वर्षी भारतातील मधाचे एकूण उत्पादन साधारण सव्वा लाख मेट्रिक टन होते.
Beekeeping In Maharashtra
Beekeeping In MaharashtraAgrowon

Beekeeping Agriculture : महाराष्ट्राने कृषी क्षेत्रात भरपूर प्रगती केली, मात्र आता शाश्वत शेतीची जोड द्यावी लागणार आहे. आज आपण भाजीपाला व फळे यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करत आहोत.

मात्र त्यावर दोन टक्क्यांपेक्षा जास्त प्रक्रिया होत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची बिकट परिस्थिती निर्माण झाली की नुकसान सर्वप्रथम शेतीमालाचे होते. आता मात्र समतोल व शाश्वत शेतीकडे शेतकऱ्यांना वळावेच लागेल.

आपण सर्वांनीच मधमाशीचे महत्त्व जाणून संवर्धनासाठी प्रयत्न करायला हवेत. महाराष्ट्रात तीनही हंगामात येऊ शकणाऱ्या आणि मधमाशीपालनासाठी उपयुक्त असलेल्या सूर्यफूल, बाजरी, मका, तूर, शेवगा आणि आवळा या सहा पिकांवर लक्ष केंद्रित केले तर त्याचे फलदायी परिणाम समोर येणार आहेत.

प्रत्येक विभागात घेतल्या जाणाऱ्या प्रचलित पिकांसोबतच या पिकांचे योग्य नियोजन करून लागवड केली तर मधमाशी पालन यशस्वी होईल. मधमाशीमुळे होणाऱ्या परागीभवनामुळे इतर पिकांच्या उत्पादनात मोठी वाढ होणार आहे.

या सहा पिकांवर कीटकनाशकांच्या जास्त फवारण्या होत नाहीत, ही बाब मधमाशांसाठी पूरकच ठरते.

Beekeeping In Maharashtra
Beekeeping Training : हिमाचल मधील अधिकाऱ्यांनी घेतले मधमाशीपालनाचे प्रशिक्षण

सूर्यफुलापासून तयार होणाऱ्या मधाला परदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे कारण या मधाचे लवकर स्फटिकीभवन होते. अशा मधाला पाश्चिमात्य देशांत ‘स्प्रेड हनी’ म्हणून मोठी मागणी असते. महाराष्ट्रात सुद्धा मधाला मोठी मागणी आहे.

मधाचा वापर फक्त औषधापुरताच न राहता दैनंदिन आहारातही त्याचा वापर वाढत आहे. मागील वर्षी भारतातील मधाचे एकूण उत्पादन साधारण सव्वा लाख मेट्रिक टन होते.

त्यात महाराष्ट्राचा वाटा एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. म्हणजेच महाराष्ट्रात मध उत्पादनाला (Honey Production) मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत.

मध उत्पादनाला वाव

मधमाशा बाजरी, मका या पिकापासून मोठ्या प्रमाणावर पराग गोळा करतात. या परागांमुळे मधमाशांची प्रतिकारक्षमता वाढते. मधमाश्यांच्या वसाहती सुदृढ होतात. या दरम्यानच्या कालावधीत मधमाश्यांच्या वसाहतीचे विभाजन चांगले होऊ शकते.

बाजरीपासून जितके उत्पन्न मिळते त्यापेक्षा जास्त उत्पन्न बाजरीच्या परागांपासून मिळू शकते. पराग म्हणजेच पोलन हे प्रथिनांचा मोठा स्रोत असतात.

गावागावात तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येत योग्य प्रशिक्षण घेऊन वरील सहा पिकांची लागवड केली आणि मधमाशी पालन सुरू केले तर ग्रामीण भागाचा कायापालट होऊ शकतो.

Beekeeping In Maharashtra
Beekeeping : मधमाशी पालन कार्यशाळा

या जोडीला मधाच्या उत्पादनासोबतच सूर्यफूल तेल, तूरडाळ प्रक्रिया, आवळा प्रक्रिया, मका प्रक्रिया असे छोटे पूरक उद्योग सुरू केले तर गावाचे अर्थकारण बदलू शकेल. विशेष म्हणजे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना मोठी संधी उपलब्ध होईल.

या प्रकारचे पीक व्यवस्थापन केल्यामुळे धान्य, कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनात समप्रमाणात वाढ होते. सूर्यफुलाच्या शेतात मधमाशी वसाहती ठेवल्यानंतर सूर्यफुलाचे उत्पादन दुप्पट होऊ शकते.

शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गटशेती केली तर सामुदायिक उत्पादनात वाढ होईल. मधाचे उत्पादनही मिळेल. चांगल्या गुणवत्तेच्या सूर्यफुलामुळे तेलाचे उत्पादन व गुणवत्ता सुधारेल. मार्केट काबीज करणे शक्य होईल.

मधमाशीपालन प्रशिक्षणासाठी आम्ही पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) येथे ‘बसवंत मधमाशी उद्यानामध्ये ‘मधमाशी पालन प्रशिक्षण केंद्र’ सुरू केले आहे.

कृषी क्षेत्रात मधमाशांच्या उपयुक्ततेविषयी जाणीव- जागृती वाढावी, शास्त्रोक्त प्रशिक्षण मिळावे, मधमाशी पालनाचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने हे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

या केंद्रात महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी गरजू विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येते. तसेच केंद्रात व्यावसायिक प्रशिक्षण सुद्धा दिले जाते.

संजय पवार, कार्यकारी संचालक,(पूर्वा केमटेक प्रा.लि.,अंबड, जि. नाशिक)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com