Coarse Grain Agrowon
ॲग्रो विशेष

Coarse Grain : मेळघाटातील भरडधान्यांची विविधता

शिधापत्रिकेवर गहू, तांदूळाच्या बरोबरीने भरडधान्य दिल्यास, गरिबांच्या पोषण सुरक्षेत मदत होणार आहे. हा फार महत्त्वाचा धडा ओडिशा मिलेट्स मिशन कार्यक्रमातून मिळाला आहे.

Team Agrowon

डॉ. तारक काटे

भरडधान्यांच्या (Coarse Grain ) वाढीचा कमी कालावधी, हलक्या जमिनीतही (Land) वाढण्याची शक्यता, कमी वा जास्त पावसाच्या परिस्थितीत तगून राहण्याची क्षमता आणि बाह्य खर्चिक निविष्ठांऐवजी स्थानिक संसाधनांच्या आधारे हमखास हाती येणारे पीक या कारणामुळे भरडधान्ये देशातील छोट्या व गरीब शेतकऱ्यांसाठी (Farmer) महत्त्वाची ठरू शकतात.

आपल्या देशात ६० टक्के शेती केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यातून भारतातील एकूण गरजेपैकी ४४ टक्के अन्नधान्य घेतले जाते; यात ७५ टक्के कडधान्ये आणि ९० टक्के ज्वारी, बाजरी तसेच इतर भरडधान्ये आणि तेलबियाणे पिकांचा समावेश आहे. ही पिके बहुतांशी देशातील पावसाचे प्रमाण कमी परंतु तापमान जास्त अशा शुष्क आणि अर्ध शुष्क प्रदेशांमध्ये घेतली जातात.

देशातील एकूण शेतजमीनधारकांपैकी ८५ टक्क्यांकडे २ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे, तर त्यातील ७५ टक्के लाभधारकांकडे ती १ हेक्टर पेक्षाही कमी असून एकूण जमीनधारकांपैकी ६७ टक्के धारकांकडे ती केवळ ०.३९ हेक्टर म्हणजे जवळपास एक एकर आहे. या सर्व अल्प व अत्यल्प भूधारकांसाठी सध्याची शेती महागडी, जिकिरीची व बेभरवशाची झाली आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांसाठी भरडधान्ये लागवड हा एक चांगला पर्याय होऊ शकतो.

भरडधान्यांची लागवड

भरडधान्यांचा अंतर्भाव अतिप्राचीन धान्यप्रकारांमध्ये होतो. पूर्व आफ्रिकेत साधारण दहा हजार वर्षांपासून तर भारतात इसवी सन ४५०० वर्षांपासून भरडधान्याची लागवड होत आहे. १९७० पर्यंत भारतात पिकविल्या जाणाऱ्या एकूण धान्यापैकी भरडधान्यांचे प्रमाण जवळपास ४० टक्के होते. मात्र हरितक्रांतीनंतर भाताचे उत्पादन दुपटीने तर गव्हाचे तिपटीने वाढले. सामान्य लोकांच्या आहारात जास्त करून गव्हा-तांदळाची वाढ झाल्यामुळे लोकांच्या आहारातूनही भरडधान्ये घटू लागली आणि त्याखालील क्षेत्रही कमी होऊ लागले.

१९६० ते २०१० या कालावधीत वरई, कुटकी/सावा, राळा, भगर यासारख्या गौण समजल्या जाणाऱ्या भरडधान्यांचे लागवड क्षेत्र ८० टक्क्याने, तर ज्वारी, नाचणी व बाजरी यासारख्या मुख्य भरडधान्यांखालील लागवड क्षेत्र अनुक्रमे ५९ टक्के, ४६ टक्के व २३ टक्क्याने घटले.

भारतातील एकूण लागवड क्षेत्रांपैकी केवळ ११ टक्के क्षेत्र आता भरडधान्यांच्या लागवडीखाली आहे. गरिबांचे अन्न म्हणून हिणवल्या गेलेल्या या पिकांकडे शासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले. त्यामुळे गहू, तांदूळ यासारख्या पिकांना संशोधन, किमान हमीभाव, शासनातर्फे खरेदी व्यवस्था, सिंचन सुविधा व बाजार प्रसार या योजनांचा धोरणात्मक लाभ जसा मिळाला तसा या पिकांना मिळाला नाही आणि त्यामुळे ही पिके कायम दुर्लक्षितच राहिली.

रेशनच्या दुकानांमधून स्वस्त किमतीत गहू व तांदूळ उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे लोकांचे या आरोग्यदायक धान्यप्रकारांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे ग्रामीण भागातही आता रक्तक्षय (अॅनेमिया), सांधेदुखी, दमा यासाखे विकार वाढू लागलेले दिसतात.

भरडधान्ये पिकविणाऱ्या जगातील पहिल्या दहा देशांपैकी (मुख्यत: आशिया व आफ्रिका खंडातील) सर्वाधिक उत्पादन भारतात होते. भारतात मॉन्सूनची वाटचाल नेहमीच लहरी असते आणि आताशा मॉन्सून जास्तच बेभरवशाचा झाला आहे. त्यामुळे दुष्काळी काळातही टिकून राहण्याचा भरडधान्याचा गुण महत्त्वाचा ठरतो.

अन्नाशिवाय जनावरांसाठी वैरण म्हणून या धान्यप्रकारांचे महत्त्व आहे. ही पिके मिश्रपद्धतीने इतर पिकांमध्ये घेता येत असल्यामुळे स्थानिक पातळीवर उपलब्ध संसाधनांचे कार्यक्षम नियोजन होते. धान्य व वैरण या अंगाने यांचा उपयोग झाल्यास ग्रामीण अर्थकारणाला चांगला हातभार लागू शकतो.

पन्नास, साठ वर्षांपूर्वी सार्वत्रिक असलेली भरडधान्यांची लागवड जरी पुढे घटत गेली तरी दुर्गम आदिवासी क्षेत्रांमध्ये मात्र ती बऱ्याच प्रमाणात कायम राहिली आणि ही पिके आदिवासी जीवनाचा अविभाज्य बनली. त्यामुळे आजही भरडधान्यांच्या स्थानिक जाती व त्यांची मिश्र पद्धतीतील लागवड यांचा शोध घेताना पुन्हा आदिवासींकडेच जावे लागले. भरडधान्यांचीच नव्हे तर त्यासोबतच इतर धान्यप्रकारांची जैवविविधताही आदिवासींनी जपली आहे.

भरडधान्यांचे पोषणमूल्य

भरडधान्यांमध्ये पिष्टमयपदार्थ, प्रथिने आणि स्निग्धपदार्थ यांचे सरासरी प्रमाण अनुकमे ७३ टक्के, ११ टक्के आणि ४ टक्के असे आढळून येते.

या धान्यांमध्ये नियासिन, रायबोफ्व्हीलेन, फोलिक अॅसिड, जीवनसत्त्व बी६ , जीवनसत्त्व सी, जीवनसत्त्व ई आणि जीवनसत्त्व के यासारखी जीवनसत्वे; कॅल्शिअम, तांबे, लोह, मॅग्नेशिअम, मॅंगनीज, सेलेसियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस हे खनिज पदार्थ, तर शरीराला आजारापासून सुरक्षित राखणारी फिनॉल्स आणि अॅन्टीऑक्सिडन्स यासारखी द्रव्ये लक्षणीय प्रमाणात आढळतात.

या विशेष पोषणमूल्यांमुळेच या धान्यांचे सेवन आधुनिक जीवनशैलीमुळे आढळून येणाऱ्या उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉल, दमा, अॅनेमिया यासारख्या विकारांवर गुणकारी आहे. नियमित सेवनामुळे कर्करोग, पित्ताशयातील खडे यासारखे विकार दूर राखले जातात, पचनात सुधारणा होणे, शरीरातील पेशींची झीज होणे, हृदय निरोगी ठेवणे इत्यादी फायदे दिसतात.

मेळघाटातील मिश्र पीक पद्धती

महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेकडील मध्यप्रदेशाच्या सीमेवरील सातपुडा पर्वतीय प्रदेश म्हणजे मेळघाट. समुद्रसपाटीपासून हा भाग ११०० ते १२०० मीटर उंचीवर असून येथील वार्षिक पर्जन्यमान ९०० ते १२०० मिमीच्या दरम्यान असते. या जंगलबहुल प्रदेशात चिखलदरा आणि धारणी या दोन तालुक्यांचा समावेश असून त्यात कोरकू या आदिवासी जमातींचे प्राधान्याने वास्तव्य आहे.

जंगलाच्या शेजारील जमिनीवर ते शेती करतात. ही जमीन बहुतांशी चढउताराची असल्यामुळे हलक्या प्रतीची आहे. बव्हंशी पावसाच्या पाण्यावरच इथे शेती केली जाते. कोरकू कुटुंबांकडे शेळ्या, कोंबड्या आणि अल्पप्रमाणात गायी असे पशुधन असते. येथे पिकांच्या विविधतेचा अतिशय समृद्ध वारसा आहे. लोकांशी चर्चा करताना जवळपास ४० पिकांच्या ५५ वाणांची लागवड येथील शेतकऱ्यांच्या शेतात होते. त्यापैकी ११ परंपरागत पिके आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत; त्यापैकी जवळपास ८ प्रकारची पिके केवळ याच भागात होतात. त्यात भाताच्या ११ वाणांचा समावेश आहे.

मेळघाटात पिकांच्या मिश्र लागवडीचे प्रकारही खूप आहेत. काही पिकांची बियाणे एकत्र मिसळून पेरली जातात, तर इतर काहींची बियाणे वेगवेगळ्या सरीमध्ये पेरली जातात. काही ठिकाणी या दोन्ही प्रकारांचा अवलंब एकाच शेतात केला जातो. एकाच प्रकारची पद्धत जरी अनेक शेतांमध्ये वापरात असली तरी प्रत्येक पद्धतीत पिकांचे प्रकार आणि त्यांच्या सरींची संख्या वेगवेगळी असू शकते. येथे मिश्रपीक पद्धतीचे १४ प्रकार आढळून आले. यात विविध प्रकारची तृणधान्ये, कडधान्ये, तेलवर्गीय पिके, धागावर्गीय पिके असतात. आमच्या अभ्यासात खरिपाच्या काळात एकाच शेतात अशी जवळपास १६ पिके, तर रब्बीमध्ये ३ ते ५ प्रकारची पिके दिसली.

मिश्रपीक पद्धतींमध्ये भरडधान्यांना महत्त्वाचे स्थान आहे. ज्वारी, बाजरी, कोदो, कुटकी, भादली (भगर) सावऱ्या, लाडगा अशी भरडपिके घेतली जातात. यापैकी सावऱ्या व लाडगा ही स्थानिक नावे आहेत आणि त्यांची शास्त्रीय ओळख व्हायची आहे. कोरकू लोकांच्या आहारात भरड धान्यांचा नेहमीच समावेश असतो. या धान्यांमधून शरीराला खरी ताकद मिळते, असा त्यांचा अऩुभव आहे. त्यामुळेच गावातील रेशनच्या दुकानात स्वस्तात मिळालेले धान्य विकून त्या बदल्यात इतर ठिकाणाहून त्यांना आवडणारी भरडधान्ये घेणे ते पसंत करतात.

भरडधान्यांची बियाणे आकाराने खूप लहान असतात. त्यामुळे त्यांनी टरफलापासून बी वेगळे करण्यासाठी मातीचेच परंपरागत पद्धतीने विकसित झालेल्या मातीच्या जात्याचा वापर होतो. तसेच ही धान्ये साठविण्यासाठी मातीच्या कणग्यांचा ते वापर करतात.

येथे मिश्रपीक पद्धतीचा वापर होत असल्यामुळे शेतीची कुटुंबांची अन्नसुरक्षितता साधली जाते. स्थानिक बियाणामुळे शेतकरी स्वावलंबी आहेत. येथे उताराच्या जमिनीवरून होणारी मातीची धूप थांबविणे व जंगलाच्या निकट असणारा पालापाचोळा वापरून मातीची उत्पादनक्षमता वाढविणे असे उपाय करणे शक्य आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT