Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Sustainable Agriculture : शाश्‍वत शेतीसाठी जैविक खतांचा वापर

Team Agrowon

डॉ. अशोक डंबाळे, नवनाथ वाढेकर, भगवान गाडेकर

Indian Agriculture : आजच्या शेती पद्धतीमध्ये अधिक उत्पादनक्षम वाणांचा वापर वाढत आहे. त्यामुळे ही पिके मोठ्या प्रमाणात जमिनीतून अन्नद्रव्ये उचलून घेत आहे. मात्र खतांचा असंतुलित वापर, केवळ रासायनिक खतांवर भर देऊन सेंद्रिय खताच्या वापराचा अभाव, पाण्याचा अयोग्य वापर इ. मुळे जमिनीचे आरोग्य खालावत चाललेले दिसून येते. जमिनीमध्ये उपयुक्त सूक्ष्मजीवांचे प्रमाणच कमी होत गेल्यामुळे खतांचे पिकांकडून शोषण होण्याचे प्रमाण कमी होत चालले आहे. परिणामी, पिकाची उत्पादकता कमी झाली आहे. जमिनीमध्ये जिवाणू, बुरशीसारखे असंख्य उपयुक्त सूक्ष्मजीव आढळून येतात. अशा स्थितीमध्ये जैविक घटकांचा शेतीमध्ये वापर हीच अनेक अडचणींसाठी गुरुकिल्ली ठरू शकते.

जैविक खते (जिवाणू खते)

प्रयोगशाळेत उपयुक्त आणि कार्यक्षम जिवाणूची स्वतंत्ररीत्या वाढ करून त्यात योग्य वाहक घटक मिसळून तयार होणाऱ्या मिश्रणाला जिवाणू खत किवा जिवाणू संवर्धक असे म्हणतात. हे जिवाणू जमिनीमधील विशिष्ट अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून देतात.

जैविक खताचे प्रकार

नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू.

स्फुरद विरघळवणारे जिवाणू (पी.एस.बी.)

पालाश विरघळवणारे जिवाणू (के.एस.बी.)

सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणारे जिवाणू.

सूक्ष्म अन्नद्रव्ये उपलब्ध करणारे जिवाणू.

नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू

वातावरणात सुमारे ७८ टक्के नत्रमुक्त वायुरूपात अस्तित्वात आहे. या मुक्त नत्राचा उपयोग पिकांच्या मुळामध्ये, मुळावर व मुळाच्या सभोवती राहणारे काही जिवाणू करत असतात. ते या नत्राचे स्थिरीकरण करून पिकांना उपलब्ध करून देतात. नत्र हे पिकाच्या वाढीसाठी महत्त्वाचे मूलद्रव्य असून, त्याची उपलब्धता झाल्यामुळे पिकाची वाढ चांगली होते. पाने हिरवीगार राहतात.

नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू पुढीलप्रमाणे :

अ) रायझोबिअम : या जिवाणूचे कार्य सहजीवी पद्धतीने चालते. हे जिवाणू कडधान्यवर्गीय पिकांच्या मुळामध्ये स्थिर होऊन गाठी बनवतात. नत्राचे स्थिरीकरण करून पिकांना उपलब्ध करून देतात.

ब) ॲझोटोबॅक्टर : या जिवाणूचे कार्य असहजीवी पद्धतीने चालते. हे जिवाणू तृणधान्ये व गळीतधान्ये पिकाच्या मुळावर गाठी न बनवता नत्राचे स्थिरीकरण करतात. हे नत्र पिकांना उपलब्ध होते.

क) अझोस्पिरिलम : अझोस्पिरिलम हे जिवाणू चारावर्गीय (तृणधान्ये) पिके उदा. ज्वारी, बाजरी, मका व भाजीपाला पिके इ. च्या मुळाच्या भोवताली वास्तव्य करतात. ते वातावरणातील नत्र स्थिर करण्याचे कार्य करतात.

ड) ॲसिटोबॅक्टर : हे जिवाणू तृणधान्ये आणि शर्करायुक्त पिकांसाठी वापरले जातात.

इ) निळे-हिरवे शेवाळ : निळे-हिरवे शेवाळ ही तंतुमय शरीररचना असलेली पाणवनस्पती आहे. ती हवेतील वायुरूप नत्र शोषून तो ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवून ठेवते. भातासारख्या पाण्यामध्ये वाढणाऱ्या पिकांना हे शेवाळ नत्र उपलब्ध करते.

स्फुरद विरघळणारे जिवाणू (पी.एस.बी.)

स्फुरद हे अन्नद्रव्य पिकांच्या मुळांच्या वाढीसाठी आणि पुढे फुले आणि फळवाढीच्या कालावधीमध्ये गरजेचा असतो. स्फुरदामुळे प्रकाश संश्‍लेषणाची क्रिया उत्तमप्रकारे होत असते. आपण पिकांना सामान्यतः सुपर फॉस्फेटच्या स्वरूपात स्फुरद देतो. तो संपूर्णपणे पिकांना उपलब्ध होतोच असे नाही. त्यामुळे पिकांना अनुपलब्ध स्वरूपामध्ये जमिनीमध्ये पडून राहतो. तो पिकांना उपलब्ध करण्याचे काम हे जिवाणू करतात.

पालाश विरघळविणारे जिवाणू (के.एस.बी.)

राज्यातील काही जमिनीमध्ये पालाश हे अन्नद्रव्य अधिक प्रमाणात आढळून येते. पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा या भागातील बहुतांश जमिनी या मध्यम ते भारी स्वरूपातील असून, त्यात पालाशयुक्त खनिजे जास्त प्रमाणात आढळून येतात. मात्र ते पिकांना उपलब्ध स्वरूपामध्ये नसल्यामुळे पिकांना घेता येत नाही. त्याच प्रमाणे आपण खत म्हणून दिलेल्या पालाशयुक्त रासायनिक खतांतील साधारण ३० टक्के पालाश हा पिकासाठी उपलब्ध होतो. उर्वरित ७० टक्के पालाश हा जमिनीमध्ये स्थिर होत जातो. हा स्थिर झालेल्या पालाश विरघळविणाऱ्या जिवाणू संवर्धकांचा वापर केल्यास ते पिकांना उपलब्ध स्वरूपामध्ये येतात. हे पालाश विरघळविणारे व एकत्रित करणारे जिवाणू हे स्थिर झालेल्या पालाशवर जैव रासायनिक क्रिया करून, त्यातील पालाशचे घन आयन्स वेगळे करतात. जमिनीतील पाण्यामध्ये मिसळल्यानंतर हे आयन्स मुळाद्वारे पिकांना उपलब्ध होतात. पालाशचे स्वतः वहन होत नाही. हे जिवाणू या पालाशचे पिकांच्या मुळाच्या कार्यक्षेत्रात वहन करून पिकांना उपलब्ध करून देतात. या जिवाणूंमुळे हा स्थिर स्वरूपाचा पालाश पिकांना उपलब्ध होतो. म्हणूनच या जिवाणूंचा वापर केल्यास रासायनिक पालाशयुक्त खतांची मात्रा २५ टक्क्यांपर्यंत कमी करणे शक्य आहे.

वापरण्याची पद्धत

केएसबी जिवाणू खतांची बीजप्रक्रिया २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे या प्रमाणे करावी.

द्रव स्वरूपात असल्यास १०० मि.ली प्रति १० किलो बियाणे या प्रमाणे प्रक्रिया करावी.

एक बैलगाडी शेणखतामध्ये ३ ते ४ किलो पालाश जिवाणूखत मिसळून जमिनीमध्ये ओलावा असताना सरीमध्ये वापरावे.

दोन लिटर द्रव स्वरूपातील पालाश जिवाणू संवर्धक प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून एक एकरासाठी ठिबक सिंचनाद्वारे वापरता येते. गहू व सोयाबीन पिकामध्ये उत्तम निष्कर्ष दिसले आहेत.

पिकांसाठी जैविक खताचे व्यवस्थापन

जैविक खते जैविक खताचा गट पिके जैविक खताचे प्रमाण (बीजप्रक्रीयेसाठी)

रायझोबिअम

सोयाबीन गट सोयाबीन

१०० मिलि / १० किलो बियाणे

चवळी गट चवळी, भुईमूग, तूर, उडीद, मूग, वाल, मटकी, गवार, ताग इ.

हरभरा गट हरभरा

वाटाणा गट वाटाणा, मसूर

अल्फा-अल्फा गट लसूनघास, मेथी

घेवडा गट श्रावण घेवडा

बरसीम गट बरसीम घास

पी.एस.बी. -- सर्व पिके १०० मिलि / १० किलो बियाणे

के.एस.बी. -- सर्व पिके १०० मिलि / १० किलो बियाणे

अॅझोटोबॅक्टर -- तृणधान्ये व गळीतधान्ये पिके उदा. मका, बाजरी, कापूस इ. १०० मिलि / १० किलो बियाणे

अझोस्पिरीलम -- चारावर्गीय व भाजीपाला पिके उदा. ज्वारी, बाजरी, मका इ. १०० मिलि / १० किलो बियाणे

झेड. एस.बी. -- भात, मका, कापूस, भाजीपाला आणि फळे. १०-२० मिलि / १० किलो बियाणे

ॲसिटोबॅक्टर -- ऊस व शर्करायुक्त पिके १०० मिलि / १० लिटर पाणी

निळे हिरवे शेवाळ -- भात २० किलो / हेक्टर (लागवडीनंतर १० दिवसांनी टाकावे.

डॉ. अशोक डंबाळे, ८७८८०२७४७४, सहायक प्राध्यापक- कृषिविद्या विभाग, डॉ. गंगाधरराव पाथ्रीकर कृषी महाविद्यालय, पाथ्री, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Anudan : दूध अनुदानात २ रुपयांची वाढ पण शेतकऱ्यांऐवजी दूध संघांचा फायदा

Crop Damage : तासगाव तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा

Onion Seed : रब्बी कांदा बियाण्याची चढ्या दराने विक्री

Rain Update : सांगली जिल्ह्यात सरासरीच्या १७३.८ टक्के पाऊस

Satara Rain : सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात जोरदार पाऊस

SCROLL FOR NEXT