Crop Management Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Management : पीक व्यवस्थापनात आच्छादनाचा वापर आवश्यक

Team Agrowon

डॉ. रवींद्र जाधव, डॉ. रमेश चौधरी

Agriculture : या वर्षी पावसाचे प्रमाण मुळातच कमी असून, धरणे कोरडी पडत आहेत. भूजलही खाली गेल्यामुळे विहीरी किंवा बोअर यांनी तळ गाठलेला आहे. अशा स्थितीमध्ये वाढलेल्या तापमानामध्ये पाण्याची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे.

शेतातील हाताशी आलेली पिके वाचविण्याची धडपड शेतकरी करताना दिसत आहेत. आपली पिके, फळबागा जपण्यासाठी आच्छादन (मल्चिंग) तंत्राचा अवलंब अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो.

हे तंत्र मातीतील ओलावा टिकवून ठेवणे, जमिनीची सुपीकता वाढविणे, तणांचे नियंत्रण आणि जमिनीचे तापमान नियंत्रणात ठेवणे अशा अनेक प्रकारे शेतकऱ्यांना उपयोगी ठरू शकते. जमिनीचा पृष्ठभाग झाकण्यासाठी केलेला विविध सेंद्रिय घटकांचा वापर म्हणजेच आच्छादन होय.

आच्छादनाचा वापर का करावा?

जमिनीच्या दिवस व रात्र यातील तापमानाची तफावत कमी राहते.

आच्छादनामुळे जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होतो.

सक्रिय मुळांच्या कार्यक्षेत्रातील तापमानाचा समतोल राखला जातो.

अनावश्यक आणि हानिकारक तणांची वाढ कमी होते.

जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होते.

बाह्य तापमान खाली गेले तरी जमिनीचे तापमान गोठण बिंदूखाली जात नाही. परिणामी भूपृष्ठालगत खोडास, कोवळ्या पानांस किंवा नवीन कोंबास इजा होत नाही.

अतिथंडीच्या किंवा उष्णतेच्या लाटेपासून झाडाचे व त्यांच्या पानांचे तापमान नियंत्रणास मदत मिळते.

मजुरीच्या खर्चात बचत होते.

जमिनीतील अन्नद्रव्यांचे झिरपून (लिचिंग) होणारे नुकसान कमी होते.

आच्छादनासाठी सेंद्रिय घटकांचा विशेषतः पिकांच्या उर्वरित अंशाचा वापर केल्यास त्याचे अनेक फायदे दिसून येतात. हंगामामध्ये किंवा हंगाम पूर्ण होत असताना सेंद्रिय पदार्थ कुजण्याची प्रक्रिया सुरू राहते. कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये काही प्रमाणात उष्णता बाहेर पडते. या उष्णतेमुळे सक्रिय मुळांच्या भागातील तापमान हिवाळ्यात वाढते.

तर साधारणपणे उन्हाळ्यापर्यंत कुजण्याची प्रक्रिया पूर्ण होत आलेली असते. त्याच्या आच्छादनामुळे उन्हे सरळ जमिनीवर पडत नाहीत. एक प्रकारचा थंडावा मुळांच्या भागास आणि खोडास मिळतो. यामुळे कार्यक्षम मुळांच्या क्षेत्रात उन्हाळ्यात कमी, तर हिवाळ्यात जास्त तापमान राहते. वातावरणातील तापमानात आणि मुळांच्या कार्यक्षेत्रातील तापमान यात फार फरक राहत नाही.

आच्छादनाखाली ओलावा जास्त काळ टिकून राहतो. सेंद्रिय कर्बामध्ये वाढ झाल्याने जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमताही वाढते. उपलब्ध पाण्याचे प्रमाण वाढते. या सर्व घटकांमुळे मुळांच्या संख्येत वाढ होते. त्यांचा विकास चांगला होतो. मुळांच्या वृद्धीमुळे जमिनीतील अन्नद्रव्य आणि पाणी यांचे वहन योग्यरीतीने होते. साहजिकच यामुळे झाडाच्या वाढीवरही सकारात्मक परिणाम दिसून येतो. त्यामुळे पीक उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते.

आच्छादनाची निवड कशाप्रकारे करावी?

पिकासाठी वापरावयाचे आच्छादन हे कमी खर्चाचे असावे.

शक्यतो स्थानिक ठिकाणी आणि नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणारे असावे.

पिकाचे आच्छादन म्हणून वापरताना शक्यतो त्याच पिकाचे नसावे. यामुळे किडी व रोगांचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता असते.

जर प्लॅस्टिक आच्छादन वापरणार असल्यास, उन्हाळ्यात पारदर्शक (रंगहीन) किंवा करड्या रंगाचे तर कडक हिवाळ्यात काळ्या रंगाचे वापरावे.

आच्छादनांचा वापर कशाप्रकारे करावा?

पूर्वमशागत झालेल्या, तणविरहीत असलेल्या आणि पीक पेरणी झालेल्या जमिनीवर किंवा भाजीपाला व फळ लागवड करण्यासाठी पुरेशी जागा सोडून इतर जमिनीवर आच्छादन करावे.

सेंद्रिय आच्छादन असेल तर तीन इंच आच्छादन असावे. अन्य पदार्थांचे आच्छादन सहा इंच जाडीचे असावे.

परदेशामध्ये कागद किंवा वर्तमानपत्राचेही आच्छादन केले जाते. आपल्या महाराष्ट्रात याचा फारसा वापर होत नाही. पण वर्तमानपत्रांचे एकावर एक असे तीन थर देऊन बाजूने मातीने टाकावी. म्हणजे कागद वाऱ्याने उडून जाणार नाही.

आच्छादनाचे प्रमुख प्रकार

हवामान, पिकांचा प्रकार, पिकांचा हंगाम, भौगोलिक स्थान व वातावरण याचा विचार करून आपल्या भागामध्ये उपलब्ध अशा कोणत्याही जैविक, सेंद्रिय, असेंद्रिय, प्लॅस्टिक आणि कापड उद्योगातील टाकाऊ भाग यांचे आच्छादन करावे.

सेंद्रिय आच्छादन (ऑरगॅनिक मल्च),

जैविक आच्छादन (लिव्हिंग मल्च),

असेंद्रिय आच्छादन (इनऑरगॅनिक मल्च),

प्लॅस्टिक आच्छादन (प्लॅस्टिक मल्च) आणि

कापड उद्योगातील टाकाऊ भाग (जिओटेक्स्टाईल्स मल्च) इत्यादी प्रकार आहेत.

जैविक आच्छादन (लिव्हिंग मल्च) संकल्पना काय आहे?

परदेशामध्ये जैविक आच्छादन करण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यांच्याकडे खास कव्हर क्रॉप म्हणून अनेक पिके व त्यांच्या जाती विकसित केल्या गेल्या आहेत. आपल्याकडे तुलनेने शेतकरी या पद्धतीचा अवलंब फारच कमी करतात. खरेतर जमिनीवर सतत सावली, ओलावा टिकवून ठेवण्यासाठी गवत किंवा झुडूपवर्गीय वनस्पतींची लागवड केली जाते.

यांची मुळे माती घट्ट धरून ठेवत असल्यामुळे मातीची धूप कमी होते. तसेच जमिनीवर सावली राहून बाष्पीभवन कमी होते. यात नत्र स्थिरीकरण करणाऱ्या जिवाणूंच्या गाठी मुळावर असलेल्या वनस्पती वापरल्या असल्यास त्याचा नत्राच्या स्थिरीकरणासाठी फायदा होतो. परिणामी मूळ पिकांमध्ये नत्रयुक्त खतांचा वापर कमी होतो.

आच्छादन पीक म्हणून खरिपातील पीक काढणीच्या आधी (परिपक्व अवस्थेत) असतानाच आच्छादन पिकाची लागवड केली जाते. ते वाढून कडक हिवाळ्यात जमिनीचे तापमान स्थिर ठेवण्यास मदत करतात.

त्यानंतर रब्बी हंगामामध्ये योग्य त्या पिकाची लागवड केली जाते. हे रब्बीचे पीक उगवून आल्यानंतर त्याची थोडी छाटणी किंवा काढणी करतात. मात्र अनेकवेळा आच्छादन तसेच राहू दिले जाते. सामान्यतः आच्छादन पीक म्हणून ओट, बार्ली, मोहरी अशा पिकांचा वापर करतात. कारण थंडीच्या दिवसांत ही पिके लवकर वाढणारी व धुके सहन करणारी आहे. कधी मुख्य पिकाबरोबरच आच्छादन पिकांची लागवड करतात.

सद्य:स्थितीत फळबागेत आच्छादन पिकांची लागवड उपयुक्त ठरत आहेत. द्राक्षबागेमध्ये अनेक ठिकाणी मोहरी, मुळा, पालक, मेथी किंवा हिवाळ्यात घेतली जाणारी अन्य भाजीपाला पिके आच्छादन पीक म्हणून घेतली जातात. कोरडवाहू फळबागेसाठी खुरटी गवत, पवना गवत, गोकर्ण गवत किंवा इतर गवतांचा वापर आच्छादन पीक म्हणून लागवड करता येते. काही गवतवर्गीय पिके ही बहूवर्षायू असल्यामुळे आच्छादन पीक कायम ठेऊन मुख्य पिकांमध्ये बदल केला जातो.

आंबा, पेरू, चिकू, नारळ, मोसंबी, संत्रा इ. बागेत पाण्याची उपलब्धता, लागवडीची पद्धत, जमिनीचा प्रकार यानुसार विविध प्रकारचे आच्छादन पीक घेता येते.

जैविक आच्छादनाचे फायदे :

मातीची धूप कमी होते.

जमिनीतून वाहणारा पाण्याचा अपधाव आणि निचरा कमी होण्यास मदत होते. अन्नद्रव्य, रासायनिक घटक व कीटकनाशके यांचे झिरपणे कमी होत असल्यामुळे परिसरातील जलस्रोतांचे (भूजलासह) प्रदूषण टळण्यास मदत होते.

जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थांची उपलब्धता, सावली आणि योग्य तापमान सतत राहिल्यामुळे उपयुक्त सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढते. जमिनीचा पोत व प्रत सुधारते.

डॉ. रवींद्र जाधव, ९४०३०१६१०१

(सहाय्यक प्राध्यापक, मृदाशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर, जि. जळगाव.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT