Crop Management : पिकांना द्या संवेदनशील काळात पाणी

Article by Dr. Adinath Takte : पिकांच्या शाश्वत उत्पादनासाठी वाढीच्या संवेदनशील काळात सिंचन अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करावे.
Crop Management
Crop ManagementAgrowon

डॉ. आदिनाथ ताकटे

Water Planning of Crop :

रब्बी ज्वारी

लागवडीनंतर साधारणपणे ७० ते ७५ दिवसांत ज्वारी पीक फुलोऱ्यात येते. या अवस्थेत सिंचन केल्यास कणसात दाणे भरण्यास मदत होते, तसेच कणसाचे वजन वाढून एकूण उत्पादनात भर पडते. पाण्याची उपलब्धता असल्यास या अवस्थेत अवश्य सिंचन करावे.

पाणी देण्याच्या अवस्था

जोमदार वाढीचा काळ

(पेरणीनंतर २८ ते ३० दिवस)

पीक पोटरीत असताना

(पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी )

पीक फुलोऱ्यात असताना

(पेरणीनंतर ७० ते ७५ दिवसांनी)

कणसात दाणे भरण्याचा काळ

(पेरणीनंतर ९० ते ९५ दिवस)

ज्वारीची पेरणी झाल्यानंतर ९० ते ९५ दिवसांत दाणे चिकाच्या अवस्थेत असतात. या काळात पिकाची पाण्याची गरज पाहून चौथे पाणी द्यावे.

हलक्या व मध्यम जमिनीत लागवड केलेल्या पिकास या अवस्थेत पाण्याची अत्यंत गरज असते.

भारी जमिनीत ओल धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते. तसेच या अवस्थेत काळ्या भारी जमिनीस भेगा पडलेल्या असतात. भेगाळलेल्या जमिनीत पिकाला पाणी देणे मुश्कील होते आणि गरजेपेक्षा जास्त पाणी द्यावे लागते. तसेच ज्वारी लोळण्याचे प्रमाण वाढते. अशावेळी भारी जमिनीत तीन पाणी दिल्यास मिळणारे उत्पादन हे चार पाण्याच्या उत्पादनाच्या जवळपास मिळते.

Crop Management
Crop Management : नियोजन उन्हाळी हंगामातील पिकांचे...

गहू

भारी जमिनीकरिता १८ दिवसांच्या अंतराने ६ पाणी, मध्यम जमिनीसाठी १५ दिवसांच्या अंतराने ७ तर हलक्या जमिनीस १० ते १२ दिवसांच्या अंतराने ८ ते १० पाळ्या द्याव्यात. पीक वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थेत पिकास पाण्याचा ताण पडल्यास एकूण उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे सिंचनाच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊन सिंचनाचे नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. पाणी कमी असल्यास आणि एक ते पाच पाण्याच्या पाळ्या देणे शक्य असल्यास पुढील प्रमाणे पाणी द्यावे.

एकच पाणी देणे शक्य असल्यास पेरणीनंतर २१-२५ दिवसांनी द्यावे.

दोन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी पेरणीनंतर २१ ते २५ दिवसांनी व दुसरे ५५ ते ६० दिवसांनी द्यावे.

तीन पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी, दुसरे ५५ ते ६० दिवसांनी तर तिसरे ७० ते ८० दिवसांनी द्यावे.

चार पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी, दुसरे ५५ ते ६० दिवसांनी, तिसरे ७० ते ८० दिवसांनी तर चौथे पाणी ९० ते १०० दिवसांनी द्यावे.

पाच पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी २१ ते २५ दिवसांनी, दुसरे ४० ते ४५ दिवसांनी, तिसरे ५५ ते ६०दिवसांनी, चौथे पाणी ७० ते ८० दिवसांनी तर पाचवे ९० ते १०० दिवसांनी द्यावे.

हरभरा

जिरायती हरभरा क्षेत्रात ओलावा खूप कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर फुले येऊ लागताच पाणी द्यावे.

मध्यम जमिनीत २० ते २५ दिवसांनी पहिले, ४५ ते ५० दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे.

भारी जमिनीस पाण्याच्या दोनच पाळ्या पुरेशा होतात. त्यासाठी पहिले पाणी ३० ते ३५ दिवसांनी व दुसरे पाणी ६५-७० दिवसांनी द्यावे.

स्थानिक परिस्थिती व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीला फार मोठ्या भेगा पडण्याच्या आत पिकास पाणी द्यावे.

हरभरा पिकास प्रमाणशीर पाणी देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, जास्त पाणी दिले तर पीक उभळण्याचा धोका असतो.

सिंचन केल्यानंतर शेतात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. अन्यथा मूळ कुजव्या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

हरभरा पिकांमध्ये सिंचनासाठी तुषार सिंचन पद्धत अत्यंत फायदेशीर ठरते. तुषार सिंचन पद्धतीने हरभरा पिकास पाणी दिल्यास उत्पादनात भरीव वाढ होते.

Crop Management
Fruit Crop Management : जास्त थंडीचा फळबागेवर होणारा परिणाम

सूर्यफूल

पिकास संवेदनशील अवस्थेत पाणी देणे अत्यंत गरजेचे आहे. रोपावस्था, फुलकळी, फुलोरा, दाणे भरण्याची अवस्था या संवेदनशील अवस्थेत पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. फुलकळी ते दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास दाणे पोकळ राहून उत्पादनात घट येते.

करडई

करडई हे पीक अवर्षण प्रतिकारक असल्यामुळे या पिकाच्या वाढीस कमी पाणी लागते.

मध्यम ते भारी जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास करडई पिकास पेरणीनंतर पाणी देण्याची गरज भासत नाही. कालांतराने ओलावा कमी झाला आणि पाणी देण्याची सोय असेल तर पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी जमिनीला तडे जाण्यापूर्वी एक संरक्षित पाणी द्यावे. दुसरे पाणी पीक फुलोऱ्यात येताना ५५ ते ६० दिवसांनी द्यावे.

पिकास पाण्याचा जास्त ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. जमिनीला भेगा पडल्यानंतर पाणी दिल्यास पाणी जास्त प्रमाणात जमिनीत मुरते. आणि पीक मर रोगास बळी पडण्याची शक्यता वाढते. त्यासाठी करडई पिकास हलके पाणी द्यावे.

डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९, (मृद् शास्रज्ञ, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com