Fruit Crop Management : फळबागेमध्ये आच्छादन,ठिबक सिंचन महत्त्वाचे...

Orchard Management : कमी पावसाच्या परिस्थतीत फळबागा जगविणे हे प्रामुख्याने अत्यावश्यक आहे. त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या किंवा स्थायी स्वरूपाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील उद्यानविद्या विभागातील तज्ज्ञांनी सुचविलेल्या उपाययोजना...
Fruit Crop Management
Fruit Crop ManagementAgrowon

Fruit Crop Mulching : कमी पावसाच्या परिस्थतीत फळबागा जगविणे हे प्रामुख्याने अत्यावश्यक आहे. त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या किंवा स्थायी स्वरूपाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील उद्यानविद्या विभागातील तज्ज्ञांनी सुचविलेल्या उपाययोजना...

पेरू ः
सध्या पावसाअभावी पाण्याची कमतरता असल्याने ज्या शेतकऱ्यांनी मृग बहार धरला आहे तो धोक्यात येण्याची शक्यता आहे. पाण्याअभावी काही बागेत फूलगळ दिसून येत आहे. फळे पिवळी पडून गळत आहेत. झाडांची पाने करपून वाळत आहेत.

उपाययोजना ः
१. जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा. त्यासाठी वाळलेला पालापाचोळा, काडी कचरा, गवत, गव्हाचे काड किंवा प्लॅस्टिकच्या कागदाचा वापर करावा.
२. प्रकाश परावर्तकांचा वापर करावा. केओलिन ८ टक्के द्रावणाची फवारणी केल्यास बाष्पीभवनाचा वेग कमी होईल.
३. बागेत भरपूर सूर्यप्रकाश व हवा खेळती राहण्यासाठी तसेच यंत्राने मशागत करण्यासाठी झाडांची हलकी छाटणी करून झाडांचा आकार मर्यादित ठेवावा.
४. सध्याच्या आपत्कालीन परिस्थीतीत झाडे तग धरून ठेवण्यासाठी १ टक्के पोटॅशची ( ०:०:५०) फवारणी करावी.
५. पाऊस लांबल्याने चांगला पाऊस पडेपर्यंत नवीन फळझाडांची लागवड करू नये.
६. पूर्ण वाढ झालेल्या झाडांना शक्यतो संरक्षित पाणी द्यावे.
७. झाडांच्या आळ्यातील मातीची खोदणी (चाळणी) करावी.
८. बागेत तण नियंत्रण करावे.
९. पाऊस पडल्यावर नवीन फुलकळी येण्यास सुरवात होईल तेव्हा शिफारशी प्रमाणे खते द्यावीत.
१०. अर्ध पक्व फळांवर फळमाशीच्या नियंत्रणासाठी एकरी दहा कामगंध (मिथिल युजेनॉल) सापळे लावावेत.

Fruit Crop Management
Fruit crop Mulching : फळबागेत आच्छादन करण्याचे फायदे काय आहेत?

लिंबूवर्गीय पिके ः
१. मोसंबी, कागदी लिंबू, संत्रा फळझाडांना ठिबकसिंचन पद्धतीने पाणी द्यावे.
२. नवीन लागवडीसाठी मडका सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.
३. दुहेरी आळे पद्धतीने पाणी द्यावे किंवा पाण्याची कमतरता असेल तर झाडाचे वय व आकारमान विचारात घेऊन आळयाचे समान दोन भाग करावे आणि प्रत्येक वेळी निम्या आळयास आलटून पालटून पाणी द्यावे.
४. उसाचे पाचट, वाळलेले गवत, गव्हाचे व साळीचे काड, पालापाचोळा व लाकडी भुस्सा यांचा २ ते ३ इंच जाडीचा थर आळ्यात पसरावा.
५. ४० ते १०० मायक्रॉन जाडीच्या प्लॅस्टिक कागदाचे आच्छादन करावे.
६. केओलीन या बाष्पीरोधकाचा ५ ते ८ टक्के (५०० ते ८०० ग्रॅम / १० लिटर पाणी) तीव्रतेच्या द्रावणाची १५ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
७. झाडांच्या खोडास जमिनी पासून २.५ ते ३ फूट उंची पर्यंत बोर्डोपेस्ट लावावी (१ किलो मोरचूद, १ किलो चुना प्रति १० लिटर पाणी)
८. जमिनीतील भेगा आंतरमशागतकरून बुजवाव्यात, फळझाडांचे आळे ताणविरहित ठेवावे.
९. फळे, अनावश्यक फांद्या आणि पानांची संख्या कमी करावी.
१०. नवीन लागवड केलेल्या कलमांना सावली करावी.
११. पाऊस लांबल्याने चांगला पाऊस पडेपर्यंत नवीन फळझाडांची लागवड करू नये.

Fruit Crop Management
Fruit Crop Water Management : कमी पाण्यात फळबागेचे नियोजन कसे कराल?

आंबा ः
दोन पावसात मोठा खंड पडल्यास पाणी देणे गरजेचे असते. फळ काढणी नंतर कलम अशक्त झालेले असते. त्यामुळे पाण्याचा ताण वाढला तर नुकसान होऊ शकते.
उपाययोजना ः

१. वाळलेल्या, सुकलेल्या, वाकलेल्या फांद्या छाटून टाकाव्यात.
२. कलमाची छाटणी करून आकार मर्यादित ठेवावा.
३. एक टक्के पोटॅशची फवारणी केल्यास पावसाच्या ताणाच्या परिस्थितीत कलमे तग धरू शकतात.
४. प्रकाश परावर्तक, आच्छादनाचा वापर करावा.
५. चांगला पाऊस पडेपर्यंत नवीन लागवड करू नये. नवीन लागवडीसाठी मडका सिंचन पध्दतीचा अवलंब करावा.

केळी ः
१. लागवड गादी वाफ्यावर करावी. रोप लागवडीपूर्वी कमीत कमी तीन आठवडे अगोदर दक्षिण आणि पूर्व बाजूने ताग लागवड करावी.
२. लागवड करण्यापूर्वी गादीवाफे चांगले भिजवून घ्यावेत.
३. लागवडी बरोबरच बागेच्या चारही बाजूने ओळीत शेवरी लागवड करावी.
४. उतिसंवर्धीत रोपांची लागवड केल्यानंतर रोपांवर 'क्रॉप कव्हर' लावून घ्यावे. काही दिवसांनी क्रॉप कव्हर काढून घ्यावे.
५. ऑक्टोबर आणि फेब्रुवारीमध्ये लागवड केलेल्या बागांवर ८ टक्के तीव्रतेचे केओलीन फवारावे (८०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी). ही फवारणी दर १५ दिवसाच्या अंतराने पाऊस पडेपर्यंत करत राहावी.
६. ज्या बागेत घडांची निसवण सुरु आहे अशा बागेत घडावर ०.५ टक्के पोटॅशियम डायहायड्रोजन फॉस्फेट + ९ टक्के युरिया स्टिकर सह शेवटी फणी काढल्यानंतर करावी. दुसरी फवारणी १५ दिवसांनी करावी. फवारणी केल्यानंतर ६ टक्के सच्छिद्रता असलेल्या पॉलिथिन पिशवीने झाकून घ्यावेत.

डाळिंब ः
१. आंबे बहार धरलेल्या बागेत पाणी कमी पडल्यास फळे तडकण्याची शक्यता लक्षात घेऊन ठिबक सिंचनाच्या साहाय्याने दिवसाआड प्रति झाडास संरक्षित पाणी द्यावे. पाणी सकाळी किंवा संध्याकाळचे वेळी द्यावे.
२. झाडावरील फळांची संख्या कमी करावी. तसेच झाडावर ८ टक्के तीव्रतेच्या केओलिन (८०० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी) या बाष्परोधकाची फवारणी करावी.
३. वाळलेल्या पाचटाचे किंवा गव्हाच्या भुश्याचे आच्छादन करावे.
४. पाण्याची उपलब्धता पाहूनच मृगबहाराचे नियोजन करावे.
५. सध्या नवीन बागेची लागवड शक्यतो टाळावी.
६. तीव्र उन्हापासून फळांचे संरक्षण करण्यासाठी शेडनेट किंवा जुन्या साड्यांच्या साहाय्याने झाडांवर सावली करावी.
७. बागेभोवती शेवरी सारख्या पिकाचे दाट कुंपण करावे.
८. झाडाला पाणी देण्यासाठी मडका सिंचन आणि वापरलेल्या सलाईन बाटल्यांचा उपयोग बागेत करावा.

सीताफळ ः
१. फुलोरा निघण्याचा कालावधी सुरु झाला असल्याने बागेतील तापमान कमी करण्यासाठी, आर्द्रता वाढविण्यासाठी तुषार सिंचनाची सोय करावी.
२. आळ्यात वाळलेले पाचट किंवा गव्हाच्या भुश्याचे आच्छादन करावे.
३. झाडावर ८ टक्के तीव्रतेच्या केओलिन या बाष्परोधकाची फवारणी करावी.
४. सध्या नवीन लागवड शक्यतो टाळावी.
५. ठिबक सिंचनाच्या लॅटरल एका आड एक दिवसाआड चालवाव्यात.
६. पाणी देण्यासाठी मडका सिंचन आणि वापरलेल्या सलाईन बाटल्यांचा उपयोग बागेत करावा.

बोर ः
१. बागेमध्ये उताराच्या दिशेने पाणी अडविण्यासाठी बांध घालावेत.
२. आळ्यात पाचट किंवा गव्हाच्या भुश्याचे आच्छादन करावे.
३. छाटणीनंतर फुटलेल्या पानांची संख्या कमी करावी.
४. पाणी बचतीसाठी मडका सिंचन व वापरलेल्या सलाईन बाटल्यांचा उपयोग बागेत करावा.

आवळा ः
१. आवळ्याचा फुलोरा निघण्याचा कालावधी सुरु झाल्याने बागेतील तापमान कमी करण्यासाठी दिवसाआड तुषार सिंचनाचा वापर करावा.
२. बागेत उभी-आडवी नांगरट करून उताराच्या दिशेने पाणी अडविण्यासाठी बांध घालावेत.
३. आळ्यात वाळलेले पाचट किंवा गव्हाच्या भुश्याचे आच्छादन करावे.
४. पाणी बचतीसाठी मडका सिंचन व वापरलेल्या सलाईन बाटल्यांचा उपयोग बागेत करावा.

अंजीर ः
१. मिठ्ठा बहराची फळांची तोडणी पूर्ण करावी.
२. झाडांवरील पानांची संख्या कमी करावी.
३. झाडावर ८ टक्के तीव्रतेच्या केओलीन या बाष्परोधकाची फवारणी करावी.
४. पाणी बचतीसाठी मडका सिंचन व वापरलेल्या सलाईन बाटल्यांचा उपयोग करावा.

जांभूळ ः
१. फळांची तोडणी पूर्ण करावी.
२. आळ्यात वाळलेले पाचट किंवा गव्हाच्या भुश्याचे आच्छादन करावे.
३. पाणी बचतीसाठी मडका सिंचन व वापरलेल्या सलाईन बाटल्यांचा उपयोग करावा.

फळबागांचे व्यवस्थापन ः

बाष्परोधकांचा वापर ः

१) सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचे उत्सर्जन होते. ते कमी करण्यासाठी पाच टक्के केओलिनची पंधरा दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. यामुळे पानांव्दारे होणारे बाष्पीभवन १५ ते ३० टक्के कमी होऊन जमिनीतील ओलावा फळबागेत टिकून राहतो.

ठिबक सिंचनाचा वापर ः
बाष्पीभवनाव्दारे पाण्याचा ऱ्हास होऊ नये म्हणून पाणी झाडाच्या थेट मुळाजवळ दिल्यास उपयोग होतो. ठिबक सिंचनाव्दारे ते साध्य होते. सूक्ष्म तुषार सिंचनाचा अवलंब करावा.

मडका सिंचन ः
१) ही कमी खर्चिक आणि पाण्याचा कार्यक्षम वापर होणारी पध्दत फळझाडांसाठी उपयुक्त आहे. कमी वयाच्या फळझाडांसाठी पाच ते सात लिटर क्षमतेचे तर मोठ्या फळझाडांसाठी १५ लिटर क्षमतेचे मडके निवडावे. त्यांच्या तळाजवळ छिद्रे पाडावे. त्या ठिकाणी कापडाची एक चिंधी बसवावी. ते मडके ज्या रोपाला पाणी द्यायचे आहे त्याच्या जवळ मातीत पुरावे.
२) मडक्याचे तोंड जमिनीच्या वर राहील अशा प्रकारे पुरून ते पाण्याने भरावे. तोंडावर झाकणी ठेवावी. मडक्याच्या सच्छिद्र रचनेमुळे त्यातील पाणी जमिनीत हळूहळू पसरते. त्यामुळे जमिनीत ओलावा निर्माण होतो. मडक्याच्या तळाशी असलेल्या चिंधीमुळे जमिनीत पाणी लवकर जाण्यास मदत होते. त्यामुळे झाडांच्या मुळांना थेट पाणी उपलब्ध होते. मडके रिकामे झाल्यानंतर पुन्हा भरावे, असे केल्याने झाडांना सातत्याने आवश्यकते एवढा पाण्याचा पुरवठा होऊ शकतो.

भूमिगत पाणीपुरवठा ः
१) ही पध्दत मोठ्या तसेच छोट्या फळझाडांना फारच उपयुक्त आहे. प्रत्येक झाडाच्या आळ्यामध्ये एक चार ते सहा इंच व्यासाचा पीव्हीसी पाइप घेऊन पाइपच्या तळाशी खालच्या बाजूने चार ते पाच छिद्रे पाडावीत.
२) पाइपचे फक्त तोंड जमिनीवर दिसेल अशारीतीने गाडावा. त्या पाइपमध्ये पाणी दिल्यास जमिनीचा वरचा पृष्ठभाग कोरडा दिसतो, मात्र पाणी थेट झाडाच्या मुळाशी जाते. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा कार्यक्षम वापर होतो. पाणीही कमी लागते.

अर्ध्या आळ्यास पाणी देणे ः
१) पाण्याची उपलब्धता कमी असल्यास प्रवाही पद्धतीने पाणी देण्यासाठी वाफ्याची चौकोनी बांधणी करून घ्यावी. चौकोनातून कर्णाच्या पध्दतीचा आडवा वरंबा टाकून वाफ्याचे दोन समभाग करावेत. प्रत्येक वेळी अर्ध्या वाफ्यास / भागास पोहोच पाणी द्यावे. त्यामुळे पाण्याची बचत करता येते. शक्यतो बागेला सायंकाळी पाणी द्यावे.
२) अर्धवर्तुळाकार वरंबा किंवा ‘v‘ आकाराचा बांध झाडाच्या बुंध्यापासून खालच्या बाजूने एक ते दोन मीटर अंतरावर तयार करावा. वरंब्यामुळे पावसामुळे पावसाचे पाणी वरंब्याच्या उंची पर्यंत अडविले जाऊन हळूहळू जागेवरच मुरते. त्याचा दीर्घकाळ फायदा झाडांना मिळतो. विविध आकाराचे वाफे फळझाडासाठी उपयुक्त ठरतात.

सलाईन बाटल्यांचा वापर ः
१) काचेच्या बाटल्या किंवा प्लॅस्टिक पाऊच धुऊन त्यामध्ये पाणी भरावे. झाडाच्या आळ्यांमध्ये काठीच्या आधाराने किंवा फांदीला बाटली / पाऊच टांगावे. त्यांची नळी झाडाच्या मुळाजवळ जमिनीच्या एकदम जवळ ठेवावी. त्यातून ठिबक सिंचनाप्रमाणे थोडे थोडे पाणी द्यावे. पाणी पडताना वेग सलाइनप्रमाणेच कमी जास्त करता येतो. या पद्धतीमध्येही पाण्याचा कार्यक्षम वापर केला जातो.

फवारणीद्वारे खतांचा वापरः
१) दुष्काळी परिस्थीतीत फळझाडांची तग धरून राहण्याची शक्ती किंवा ताण सहन करण्याची क्षमता वाढविण्यासाठी पानांवर एक ते दीड टक्के पोटॅशिअम नायट्रेटची फवारणी करावी.

शक्य असल्यास बहर बदल ः
१) पाण्याची खात्रीशीर सोय नसल्यास पाण्याच्या उपलब्धतेनुसार बहर घ्यावा.
२) झाडांवरील पानाफुलांची, फळांची संख्या कमी करावी. हलकीशी छाटणी करावी, खोडावरती चुना / बोर्डो पेस्ट लावावी. लहान कलमांना सावली करावी. जलशक्तीचा वापर करणे (५० ते ५०० ग्रॅम प्रति झाड) अशा पद्धतीने व्यवस्थापन केल्यास पाणी टंचाईतही फळबागा जगविता येणे शक्य होईल.
---------------------------------------------
संपर्क ः
डॉ.विनायक जोशी, ९४२०६३९५२०
डॉ.एम.बी.शेटे ः ९४०३४८९२२९
( उद्यान विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी,जि.नगर)


Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com