Solapur News : सोलापूर शहर व अक्कलकोट तालुक्याला आज (शनिवारी) दुपारी ते सायंकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आंबा, द्राक्ष, खरबूज व कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुपारी व सायंकाळच्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसानंतर रात्री उशिरापर्यंत ढगाळ वातावरण व विजांचे चमकणे, बारीक पाऊस सुरूच होता.
सोलापूर शहर व परिसरात दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान पावसाने हजेरी लावण्यास सुरवात केली. या पावसासोबत विजांचा प्रचंड कडकडाट होत होता. जवळपास आर्धा तास हा पाऊस सुरू होता. सायंकाळी साडेपाचपर्यंत सोलापूर शहर व परिसरात ८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच वातावरणात उकाडा, उष्ण झळा होत्या. सकाळपासून उन्हाचा चटका आणि उकाडा जाणवत होता. अवकाळी पावसाने वातावरणात गारवा पसरला होता. पावसाच्या हजेरीनंतर सोलापुरात पावसाळी वातावरण झाले होते.
अक्कलकोट ओढे, नाले तुडुंब, पिकांचे मोठे नुकसान
अक्कलकोट शहर व तालुक्यात मोठ्या वाऱ्यासह आज (शनिवारी) अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. अनेक ठिकाणी ओढ्याला पाणी आले आहे तर रस्त्याच्या दुतर्फा शेतात पाणी साचलेले आहे. जेऊर, मैंदर्गी, करजगी, शेगाव, आळगे वागदरी, चपळगाव, कर्जाळ, सलगर आदी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. गरोळगी-बासलेगाव ओढा तुडुंब भरल्याने येथील रस्ता बंद झाला होता. शासकीय विभागाकडून नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे.
अक्कलकोट तालुक्यातील गरोळगी-बासलेगाव या भागात पडलेल्या प्रचंड पावसामुळे बासलेगाव-गरोळगी ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी येऊन हा रस्ता बंद झाला. सकाळपासून प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारनंतर अचानक मोठ्या वाऱ्यासह पावसाला प्रारंभ झाला. अवकाळी पावसाने दमदार बॅटिंग करीत सगळीकडे पाणीच पाणी केले. रस्त्याच्या कडेचे काही सिमेंटचे खांब वाऱ्यामुळे तुटून पडले. उडगी येथे वीज पडून दोन म्हशी, हालहळी येथे एक म्हैस तर मैंदर्गी येथील सिद्धप्पा केसूर यांचे दोन बैल वीज पडल्यामुळे मयत झाल्याची माहिती तहसीलदार विनायक मगर यांनी दिली.
केळी, पपई, टोमॅटो, कलिंगड, खरबूज, फळबागा यांना नुकसान झाले आहे. अक्कलकोट शहरात दुपारी दीड वाजल्यापासून पावसाला जोरदार सुरवात झाली. सुमारे ताज दीड तास पावसाने दमदार बॅटिंग केली. त्यामुळे अनेक सखल भागात खड्ड्यात पाणी साचले. संगोगी, तोरणी, नागोर, इब्रामपूर, जकापूर, उडगी, गरोळगी, सातनदुधनी या परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे ओढेनाल्यांना पाणी आले.
सांगोल्यात अवकाळीमुळे घरांचे नुकसान
दोन दिवस वादळी वाऱ्यामुळे सांगोला तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात वीज पडून जर्सी गाय तर झाड पडून एक शेळी मरण पावली. दोन घरांची मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात गुरुवारी (ता. १८) व शुक्रवारी (ता. १९) या दोन दिवसात अनेक भागात वादळी वारे झाले. या वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी हलका पाऊसही झाला. वादळी वाऱ्यामुळे आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.
वादळी वाऱ्यामध्ये वीज पडून सावे येथील आनंदा मारुती शेजाळ यांची गाभण जर्सी गाई वीज पडून मृत्युमुखी पडली. जवळा येथील अशोक मारुती गावडे व मारुती अण्णा गावडे या दोन जणांचे घराची पडझड होऊन कवले उडून गेल्याने नुकसान झाले आहे.
जवळा येथे काका संदीपान गावडे, अशोक गावडे, सत्यवान गावडे, कुमार आगलावे, भगवान करणवर, लाला मेटकरी, अजय शेख, बिरा बर्वे आदींच्या घरांची पडझड झाली. डोक्यात कौले पडून संस्कृती अंकुश गावडे ही चिमुकली जखमी झाली तर अंगावर पत्रे पडल्याने सत्यवान शिवाजी गावडे हेही जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी तत्काळ नुकसानग्रस्त परिवारास भेट दिली. तत्काळ शासकीय मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्याची प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.