Farmer Producer Company: ज्वारीची बिस्किटे, चकल्या, मसाले असोत की शहरात पोहोचणारा रसायन अवशेषमुक्त भाजीपाला, या व्यवसायात सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी, गुळवंची या ग्रामीण भागातील महिलांनी आपल्या कष्टाला आधुनिक व्यवस्थापनाची जोड देत ‘भरारी सखी फार्मर प्रोड्यूसर कंपनी’ची सुरुवात केली. या कंपनीने अल्पावधीतच शेतीला खऱ्या अर्थाने नफ्याचा व्यवसाय करून दाखवत लौकिक मिळवला आहे..सोलापूर-बार्शी रोडवर गुळवंची (ता. उत्तर सोलापूर) येथे भरारी सखी फार्मर प्रोड्यूसर कंपनीचा स्वतःचा ज्वारी, गहू स्वच्छता, प्रतवारी आणि पॅकिंग प्रकल्प आहे. तसेच बोरामणी (ता.दक्षिण सोलापूर) येथून सोलापूर शहरात भाजीपाला पुरवठा केला जातो. सोलापूर शहराला लागून असलेल्या उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या दोन तालुक्यातील महिलांनी एकत्रित येऊन हा उद्योग सुरू केला आहे..अवघ्या तीन वर्षांपूर्वी सुरू झालेला त्यांचा हा प्रयोग स्टार्टअप असला, तरी तुलनेने त्यांनी कमी कालावधीत मिळवलेले यश नक्कीच दखल घेण्यासारखे आहे. केवळ महिलांनी, महिलांसाठी चालवलेली ही कंपनी वेगळेपण सिद्ध करते. महिला जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्या केवळ नफ्याचा विचार करत नाहीत, तर त्या एकमेकींच्या प्रगतीचा विचार करतात. घरची जबाबदारी सांभाळून, आर्थिक स्वातंत्र्याकडे टाकलेलं हे पाऊल समाजाचं चित्र बदलणारं ठरतं, हेच या महिलांनी दाखवून दिलं आहे..Women Success Story: वडिलांचे शेती प्रेम, तळमळीने डॉक्टर कन्या झाली शेतकरी.कंपनीची मुहूर्तमेढस्वयंम शिक्षण प्रयोग या संस्थेत काम करणाऱ्या शामल गुरव, अश्विनी कोरके यांच्यासह काही महिलांनी पुढाकार घेत साधारण चार वर्षांपूर्वी भरारी सखी फार्मर प्रोड्यूसर कंपनी स्थापना केली. कंपनीच्या अध्यक्ष म्हणून शामल गुरव यांच्याकडे आणि सचिव म्हणून आश्विनी कोरके यांच्याकडे जबाबदारी आहे. त्यांच्यासोबत वैशाली वाले, मंगल धुमाळ, मनिषा स्वामी, शालन गायकवाड, महानंदा शिंदे, सावित्री पाटील, तनुजा जवळे, कल्पना माने यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली. सर्वजणी शेतकरी कुटुंबातील आहेत. शेती करताना या महिला स्वयंम शिक्षण प्रयोग या संस्थेत काम करत होत्या. .अनेकवेळा स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या कामासाठी परिसरातील शेतकरी कुटुंबाकडे जायच्या, त्यामुळे शेतीचे प्रश्न त्यांना चांगले माहिती होते, शिवाय घरच्या शेतीमुळे त्यांना अनुभव होताच, पण शेती फायद्यात नाही, त्यातून नफा कसा मिळवायचा? मध्यस्थांची साखळी कशी तोडायची? हे प्रश्न त्यांना सातत्याने पडायचे, या प्रश्नांतूनच पुढे या महिला एकत्र आल्या आणि भरारी सखी फार्मर प्रोड्युसर कंपनीचा जन्म झाला. सुरुवातीला घरच्यांचा विरोध, भांडवलाची कमतरता अशा अनेक अडचणी आल्या. पण महिलांनी हार मानली नाही..उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या दोन तालुक्यातील बोरामणी, गुळवंची कुंभारी, हगलूर, डोणगाव, मुळेगाव, कासेगाव, कारंबा यासह जवळपास २० गावांतील सुमारे १,२५० महिला शेतकरी या कंपनीच्या सभासद म्हणून जोडल्या गेल्या. या महिलांपैकी अनेकजणी आधीपासूनच व्यवसायात होत्या, तर काहींनी नव्याने व्यवसाय सुरू केला. मुख्यतः या सर्व महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांचे मार्केटिंग कंपनीने सुरु केले. यामध्ये ज्वारी, गव्हाची खरेदी-विक्री, ज्वारी प्रक्रियायुक्त पदार्थांसह रसायन अवशेषमुक्त भाजीपाला पुरवठा करत, मसाले, पापड यांसारख्या छोट्या प्रक्रिया उद्योगातून आपला व्यवसाय फायद्याचा केला..Women Agriculture Success Story: ऊस रोपवाटिकेत एका महिलेचे यश; सारिका लठ्ठे यांचा प्रेरणादायी प्रवास.थेट ग्राहकांना भाजीपाला विक्रीशहरी ग्राहकांची मागणी लक्षात घेत भरारी सखी कंपनीने पहिल्यांदाच रसायन अवशेषमुक्त भाजीपाला उत्पादनावर भर दिला. हा उत्पादित भाजीपाला सोलापूर शहरी ग्राहकांना पुरवण्याचा व्यवसाय करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी रासायनिक खते आणि कीडनाशकांचा वापर टाळून, सेंद्रिय पद्धतीने उत्पादित भाजीपाला शहरात पोहोचवण्याचे त्यांनी नियोजन केले. यातून शहरात दोनशेहून अधिक हक्काचे ग्राहक तयार झाले आहेत. दररोज पहाटे शेतातून ताज्या भाज्या खुडणे, त्यांचे वर्गीकरण करणे आणि ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचवणे, हे कष्टाचे काम या महिला स्वतःच्या नियोजनाने करतात..ज्वारी, गहू स्वच्छता, प्रतवारी प्रकल्पगुळवंची येथे कंपनीच्यावतीने धान्याची स्वच्छता, प्रतवारी आणि पॅकिंगसाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. सभासद शेतकऱ्यांच्याकडून ज्वारी, गव्हाची खरेदी करुन पुढे स्वच्छता, प्रतवारीकरुन १ किलो, ५ किलो किंवा मागणीनुसार ज्वारीची विक्री केली जाते. बाजारपेठेतील दरानुसारच ज्वारी, गहू विक्रीचे दर बदलत राहतात. दरवर्षी या प्रकल्पातून ५ ते ७ लाख रुपयांची उलाढाल होते..‘गावाकडची चव’ ब्रॅण्डआज कंपनीच्या प्रत्येक उत्पादनांची विक्री ‘गावाकडची चव’ या ब्रॅण्ड खाली होते. ज्वारी, गव्हाच्या एक किलो पिशवीपासून ते मसाले, नैसर्गिक व सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला असो, की ज्वारीपासून तयार केलेली उत्पादने सगळ्या उत्पादनांना एकाच ब्रॅण्डखाली त्यांनी आणले आहे. या प्रत्येक उत्पादनांना त्यांनी गावाकडची ज्वारी, गावाकडचे लाल तिखट, गावाकडची शेंगदाणा चटणी, गावाकडची कडक भाकरी या एका ब्रॅण्डखाली सर्व महिलांकडील उत्पादनाचे ब्रॅण्डिंग केले आहे. त्यामुळे बाजारपेठेत ब्रॅण्डची विशिष्ट ओळख तयार झाली आहे..ज्वारीचे मूल्यवर्धन, मसाले, पापड उद्योगकेवळ भाजीपाला विकून महिला थांबल्या नाहीत. त्यांनी धान्यावर प्रक्रिया करून त्यांचे मूल्यवर्धन करण्याचे तंत्र आत्मसात केले. विशेषतः सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादित होणाऱ्या ज्वारीची निवड त्यांनी केली. ज्वारीपासून कुरकुरीत चकली, पौष्टिक बिस्किटे, लाडू आणि इतर प्रक्रिया पदार्थ तयार करण्यास सुरुवात केली. या प्रक्रियेमुळे चांगला भाव मिळू लागला आणि महिलांना वर्षभर रोजगार तयार झाला. काही महिला पापड आणि मसाले उद्योगात आघाडीवर आहेत. त्यांनाही कंपनीच्या मार्केटिंगचा फायदा झाला. आज त्यांचे हे पदार्थ केवळ स्थानिक पातळीवरच नाही, तर प्रदर्शनांच्या माध्यमातून राज्यभरातील ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहेत..ज्वारी, गव्हाचे सेंद्रिय पद्धतीने उत्पादन केले जाते. त्यानंतर प्रक्रिया करून विविध उत्पादने आम्हाला तयार करायची आहेत. याबाबत आम्ही अभ्यास करत आहोत. याशिवाय सोलापूर शहरात भाजीपाला विक्री वाढवण्याचे नियोजन केले आहे.शामल गुरव, (अध्यक्ष).आमची सर्व उत्पादने ग्राहकांच्या पसंतीला उतरली आहेत. गेल्या तीन वर्षात आम्हाला शेतीमाल विक्रीचा चांगला अनुभव आला आहे. भविष्यात प्रक्रिया उद्योगाला मोठ्या प्रमाणामध्ये गती द्यायची आहे.अश्विनी कोरके, (सचिव).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.