Latur / Dharashiv News : दोन्ही जिल्ह्यांमध्ये एप्रिल व मे महिन्यांत झालेल्या वादळी वारे व अवकाळी पावसात महावितरणला जबर फटका बसला असून, तीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. विजेचे खांब मोडून पडले असून ताराही तुटल्या आहेत. काही ठिकाणी रोहित्रांचे (डीपी) नुकसान झाले आहे.
या स्थितीत विस्कळीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने वेगाने प्रयत्न सुरू केले असून, कोलमडलेली यंत्रणा पूर्ववत करून खंडित झालेला वीजपुरवठा ७० ते ७५ टक्क्यांपर्यंत पूर्ववत केला आहे.
लातूर जिल्ह्यात पडलेल्या व वाकलेल्या उच्चदाब वाहिनीच्या ४५६ खांबापैकी २३८ उभे केले. यात लातूर विभागातील १०७ पैकी ६१, निलंगातील ११६ पैकी ९२, तर उदगीरमधील २३३ पैकी ८५ खांब पूर्ववत केले आहेत.
लघुदाब वीजवाहिनीचे ७४७ पैकी ३९३ उभे केले. यात लातूरमधील २१८ पैकी १३२, निलंगामधील २७१ पैकी १७१, तर उदगीरमधील २३८ पैकी ९० खांब उभे केले आहेत. उच्चदाब वाहिनीच्या लातूरमधील तुटलेल्या ४.२ पैकी ३.८, निलंगामधील ८.४४ पैकी ५.२, उदगीरमधील २४.६५ पैकी ८.५ किलोमीटर, लघुदाब वाहिनीच्या लातूरमधील ७.५ पैकी ६.२, निलंगामधील ११.३३ पैकी ७.२७ व उदगीरमधील ४६.२५ पैकी २५.४५ किलोमीटर लांबीच्या तारा पूर्ववत केल्या आहेत. लातूरमधील १७ रोहीत्रापैकी १३, निलंगामधील ७ पैकी २ तर उदगीरमधील १८ पैकी ४ रोहित्र पूर्ववत उभे केले आहेत.
धाराशिव जिल्ह्यातही मोठे नुकसान
जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा महावितरणला मोठा फटका बसून अंदाजे एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न यंत्रणेकडून सुरू आहेत. यात उच्चदाब वाहिनीचे धाराशिव विभागातील (धाराशिव, भूम, तेर, कळंब, वाशी व परंडा) वाकलेल्या व तुटलेल्या ४४६ पैकी २५१, तुळजापूर विभागातील (तुळजापूर, उमरगा व लोहारा) २१४ पैकी १३१ पोल उभे केले आहेत.
लघुदाब वीजवाहिनीचे धाराशिवमधील नऊशैपैकी ४४१, तर तुळजापूरमधील ४८५ पैकी २४६ खांब उभे केले आहे. उच्चदाब वाहिनीच्या धाराशिवमधील ६२.३५ पैकी ४३.४ तर तुळजापूरमधील १८.८२ पैकी १४.३३, लघुदाब वाहिनीच्या धाराशिवमधील १५३.६ पैकी १२९.१६ तर तुळजापूर विभागातील ५९.२६ पैकी ३९.७२ किलोमीटर लांबीच्या तुटलेल्या तारा पूर्ववत जोडल्या आहेत. धाराशिवमधील ५२ पैकी २८, तर तुळजापूर विभागातील ७३ पैकी ४५ रोहित्र पूर्ववत उभे केले आहेत.
अवकाळी पावसामुळे अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवण्यास मोठी अडचण निर्माण झाली असून, ग्रामीण भागाला याचा मोठा फटका बसला आहे. महावितरणने तातडीने कामे हाती घेतली असून, लातूर जिल्ह्यात ७० ते ७५ टक्के दुरुस्तीचे काम करून वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. इतर भागात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठ्याचा प्रयत्न आहे. अधिकारी व कर्मचारी तळपत्या उन्हाची तमा न बाळगता हिमतीने या कामात योगदान देत आहेत. कामात वादळी वारा व पावसाचा व्यत्यय येत आहे. ग्राहकांचे मोठे सहकार्य मिळत आहे.- मदन सांगळे, अधीक्षक अभियंता, लातूर मंडळ
अवकाळी पावसामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अखंडित वीजपुरवठा सुरू ठेवण्यात मोठी अडचण निर्माण झाली असून, शहरी भागासह ग्रामीण भागाला फटका बसला आहे. दुरुस्तीची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी एजन्सीची संख्या वाढवली असून, ७० टक्के दुरुस्तीचे काम पूर्ण करून वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. पाणीपुरवठा योजना व आरोग्य उपकेंद्रांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याला प्राधान्य देत आहोत. अधिकारी व कर्मचारी कडक उन्हात व सातत्याने येणाऱ्या अवकाळी पावसातही काम करत आहेत.- मकरंद आवळेकर, अधीक्षक अभियंता, धाराशिव मंडळ
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.