Unseasonal Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain Update : पश्चिम महाराष्ट्रात 'अवकाळी'ची दमदार 'बॅटिंग'; बारामतीत घराचे पत्रे उडाले, पुणे-अहमदनगरला ‘यलो अ‍ॅलर्ट’,

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्याच्या हवामानात बदल झाल्याने शनिवारी (ता.११) आणि रविवारी (ता.१२) पहाटे अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह पश्चिम महाराष्ट्रात दमदार बॅटींग केली. शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणांसह सांगली, सिंधुदुर्ग आणि पुण्यात पाऊस झाला. यामुळे विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडण्यासह घराच्या छपराचे पत्रे उडून जाण्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर नाशिकसह पुणे, नगर, सातारा, अकोला, जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत अवकाळीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे.

राज्यातील अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होत आहे. तर हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. यामुळे आज रविवारी राज्याच्या अनेक भागात अवकाळीसह गारपिटीची शक्यता असल्याने बळीराजा चिंतातूर झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात लाखोंचे नुकसान

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने सलग दुसऱ्या दिवशी हजेरी लावली. यावेळी इचलकरंजी, गडहिंग्लज, शिरोळ, चंदगड, भुदरगडसह कागलमध्ये दमदार पाऊस झाला. कागल तालुक्यातील नानीबाई चिखलीसह चंदगड मधील कोवाड तेऊरवाडी येथे पत्र्याचे शेड उडून पडल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. नानीबाई चिखलीत तीन घरांचे नुकसान झाल्याने दहा लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच तेऊरवाडी येथील ग्रामपंचायत इमारतीवरील पत्र्याचे शेड उडून पडल्याने शेजारील घराचे चार लाखांचे नुकसान झाले.

सिंधुदुर्ग इंटरनेटची सुविधा बंद

शनिवारी सिंधुदुर्गात ढगाळ वातावरण व उष्मा वाढलेल्याने जाणकरांकडून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. यानंतर सायंकाळी सावंतवाडी शहरासह तालुक्यात ढगांचा गडगडाटासह व विजांच्या लखलखाटासह पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरीकांची तारांबळ उडण्यासह वीज पुरवठा खंडीत झाला. तसेच तालुक्यातील काही भागात वीज खंडीत झाल्याने इंटरनेटची सुविधा बंद पडलेली होती.

पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उष्म्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासाही मिळाला आहे. मात्र ऐण टप्प्यात पाऊस झाल्याने हाताला येणारे आंबा, काजू, फणस पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नाशिकला ‘यलो अलर्ट’

हवामान विभागाने नाशिक जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ दिला असून शनिवार (ता. ११) आणि रविवारी (ता.१२) ला तालुक्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. विभागाने दिलेल्या अलर्टनुसार नाशिक जिल्ह्यातील कळवण, बागलाण, मालेगाव, सिन्नर, दिंडोरी तालुक्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून घरांसह कांदाचाळ आणि पिकांचे नुकसान झाले आहे. तर आज रविवारी (ता.१२) ला नाशिकसह राज्यभरात पूर्वमान्सून सरींची जोरदार बरसात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच आज ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याचे विभागाने सांगितले आहे.

सलग दुसऱ्या दिवशी पाऊस

पुणे जिल्ह्यातील विविध भागात सलग दुसऱ्या दिवशी शहरासह उपनगरांत अवकाळी झाला. जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव तालुक्यांत वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाटात पाऊस झाला. तर लोहगाव परिसरात ५९.८ मिमी पावसाची नोंद झाली असून ती हंगामातील सर्वाधिक आहे.

नगर जिल्ह्यात वीजपुरवठा ठप्प

नगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यामुळे वीज तारांवर, रोहित्रांवर झाडाच्या फांद्या तुटून पडल्याने वीजपुरवठा ठप्प झाला होता. तसेच भाजीपाला, कांदा आंबा व अन्य फळबागांचे नुकसान झाले आहे. याबरोबरच अकोले तालुक्यात राजूर-मोहंडुळवाडी शिवारातील एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. पंढरीनाथ जयवंत मुर्तडक असे ७४ वर्षीय मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

साताऱ्यात वादळात छप्पर उडून गेली

सातारा जिल्ह्यात दीड तास झालेल्या वादळी पावसाने हाहाकार केला. येथील ढेबेवाडी परिसरातील शाळा, दुकाने आणि घरावरील छप्पर वादळात उडून गेल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. तसेच विजेचे खांब उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला.

जालन्यात तीन जनावरे दगावली

मराठवाड्यातील विविध जिल्ह्यात देखील अवकाळीने हजेरी लावली. यावेळी जालन्याच्या श्रीधर जवळा येथे वीज पडून तीन जनावरे दगावली. तसेच छत्रपती संभाजीनगरमधील विविध गावात अवकाळी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

बारामती घरावरील पत्रे उडून गेले

राज्याच्या अनेक भागात दमदार हजेरी लावलेल्या अवकाळीने बारामती तालुक्यात देखील मोठे नुकसान केले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे येथील अनेक घरांवरील पत्रे उडून गेले. यामुळे अन्नधान्य भिजून मोठे नुकसान झाले. तसेच बारामती तालुक्यातील बाबुर्डी गावात विजेचा खांब पडल्याने गावातील वीज खंडित झाली.

घरांचे झालेल्या नुकसानीची माहिती पोलीस पाटील यांनी तहसीलदार गणेश शिंदे यांना दिली असून त्यांनी तलाठी सुरेश जगताप यांना नुकसानीचे पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर नुकसानग्रस्त घरांचे तात्काळ पंचनामे करून मदत मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल अशी माहिती बाबुर्डी गावचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे यांनी दिली आहे.

पावसाचा अलर्ट

यादरम्यान महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अवकाळीची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विभागाने पुणे, अहिल्यादेवी नगर, नाशिकला ‘यलो अॅलर्ट’ दिला असून नंदुरबार, जळगाव, बीड येथे पावसाच्या हलक्या सरींचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच ठाण्यासाठीही ‘यलो अॅलर्ट’ देण्यात आला असून मुंबईमध्येही पावसाच्या हलक्या सरी पडतील असे सांगण्यात आले आहे. यामुळे राज्यात होणाऱ्या चौथ्या टप्प्यातील मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. सोमवारी (ता.१३) नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभीजनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहिल्यादेवी नगर, शिर्डी, बीड या लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान पार पडणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT