Pune News : गेल्या काही दिवसापासून राज्यात पडणाऱ्या अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात सध्या सुरू असणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे नुकसानीचे पंचनामे रखडले असून आता पुन्हा एकदा अवकाळीने विदर्भातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. मात्र मंगळवारी पडलेल्या पावसामुळे वाढत्या तापमानातून नागरीकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. नागपूर जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पावसासह गारपीट झाली. येथे जोरदार वादळाने झाडे उन्मळून पडली, होर्डिंग फाटले, तार तुटण्यासह टपऱ्या उडल्या आहेत. तर वीज पडल्याने भिवापूर आणि रामटेक तालुक्यात बैलाचा मृत्यू झाला आहे. चंद्रपूरमध्ये मालधक्यावर उतरलेल्या युरीया खताची प्रचंड नासाडी झाली आहे. भंडाऱ्यातील सातही तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने धान पिक जमिनदोस्त झाले आहे.
नागपूरला झोडपले
नागपूर वेधशाळेने वर्तवलेल्या अंदाजानुसार मंगळवारी (ता.०७) सायंकाळच्या सुमारात अवकाळी पावसाने गारपिटीसह नागपूर जिल्ह्यात थैमान घातले. येथे जिल्ह्यातील विविध भागात गारपीट झाली यामुळे भाजीपाल्यासह शेत पीकाचे मोठे नुकसान झाले. तसेच भिवापूर व रामटेक तालुक्यात वीज कोसळून तीन बैल ठार झाले. खातखेडा येथे देखील एक म्हैस मृत्युमुखी पडली असून एक बैल जखमी झाला. तसेच शहरात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली असून होर्डिंग फाटले आहेत. वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तार तुटल्याने काही भागातील विज पुरवठा खंडीत झाला होता.
तापमानात घसरण
मंगळवारी सायंकाळच्या सुमारात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागपूर शहराच्या तापमानात घसरण झाली. येथे पाऊस झाल्याने तापमानात किमान ४ अंशाने फरक पडला आहे. येथे सोमवारी तापमान ४२.६ अंशावर गेले होते. जे मंगळवारी ३८.१ अंशावर आले. तर शहरासह जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागपुरकरांना दिलासा मिळाला आहे.
चंद्रपूरात युरीया खत पाण्यात
चंद्रपूरात मंगळवारी दुपारी अचानक पडलेल्या पावसामुळे खरीप हंगामासाठी आणलेल्या युरीया खतावर पाणी पडले आहे. येथील मालधक्यावर उतरवलेले २६०० मेट्रिक टन युरीया खत पावसात भिजल्याने सर्व खत वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान अवकाळी पावसाने यवतमाळ, गोंदिया या जिल्ह्यांनादेखील झोडपून काढले आहे. विजांच्या कडकडाटात वादळीवाऱ्यासह पाऊस आणि गारांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. चंद्रपूरातील वरोरा तालुक्यातील काही गावांमध्ये गारांचा पाऊस झाल्याने उभी पिकं जमिनदोस्त झाली आहेत.
भंडाऱ्यातील सातही तालुक्यात अवकाळी पाऊस
तसेच मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाने भंडाऱ्यातील सातही तालुक्यात शेतीचे नुकसान झाले आहे. येथील हातातोंडाला आलेले धान पिक अवकाळी पावसाने जमिनदोस्त झाले आहे. यामुळे आधीच संकटात आलेल्या शेतकरी आणखीन आर्थिक संकटात सापडला आहे.
येथील मिरज बुद्रूक शिवारात राजू बुद्रे यांच्या शेतात आठ दिवसावर कापणीला आलेले धान पीक जमिनदोस्त झाले आहे. यावेळी शेतकरी राजू बुद्रे यांनी हे पीक काढता येईल किंवा ते विकता येईल याची शाश्वती नसून आता सरकार आणि प्रशासनाने माझ्या सह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.