Fruit Waxing Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Waxing: ‘वॅक्सिंग’साठी मेणाचे प्रकार

Food Storage Wax: फळे आणि भाज्यांच्या दीर्घकाळ साठवणीसाठी त्यावर मेणाचा थर (वॅक्सिंग) दिला जातो. त्याच्या विविध पद्धतींची माहिती आपण मागील लेखात पाहिली. या लेखामध्ये उपयुक्ततेच्या आधारावर वॅक्सिंगसाठी वापरले जाणारे मेणाचे प्रकार पाहू.

Team Agrowon

डॉ. विक्रम कड, डॉ. गणेश शेळके, डॉ. सुदामा काकडे

Agriculture Tips:

साठवणुकीसाठी वापरायचे मेण

काढणीनंतर फळे ताबडतोब बाजारामध्ये विक्रीसाठी न पाठवता काही काळ साठवायचे असल्यास त्यांचा ताजेपणा टिकविण्यासाठी मेणाचा वापर केला जातो. ही प्रक्रिया शीतगृहात किंवा नियंत्रित वातावरणात दीर्घकालीन साठवणीसाठी उपयुक्त ठरते.

कार्यप्रणाली

संरक्षणात्मक थर : फळांच्या पृष्ठभागावर मेण एक पातळ संरक्षणात्मक थर तयार करते. त्यामुळे त्याचे बाह्य घटकांपासून संरक्षण होण्यास मदत होते.

आर्द्रता टिकवून ठेवणे : फळांमधील पाण्याचे बाष्पीभवन कमी होते, त्यामुळे ते कोरडे पडत नाहीत.

ऑक्सिजन प्रवेश कमी करणे : मेणाच्या थरामुळे ऑक्सिजनशी संपर्क कमी होऊन फळाची श्‍वसन क्रिया मंदावते. त्यामुळे फळे दीर्घकाळ ताजी राहतात.

पिकण्याची गती कमी करणे : मेणामुळे इथिलीन वायूचा प्रभाव कमी होतो, परिणामी पिकण्याची क्रिया मंदावते.

उदाहरण

सफरचंद, नासपाती (पीअर), आंबा ही फळे दीर्घकाळ टिकतात. लवकर खराब होत नाही.

संत्रे आणि मोसंबीसारख्या रसदार फळांच्या सालीला मेणामुळे संरक्षण मिळते आणि रस टिकून राहतो.

साठवणुकीसाठी मेणाचे प्रकार

नैसर्गिक मेण : मधमाशीच्या पोळ्यापासून मिळवलेले मेण (Beeswax), कॅरनौबा मेण (Carnauba Wax), शेलॅक मेण (Shellac Wax)

कृत्रिम मेण : खाद्य दर्जाचे पॅराफिन मेण, इमल्सिफाइड मेण

ताबडतोब विक्रीसाठी वापरण्यात येणारे (पॅकआउट) मेण

काढणीनंतर जेव्हा फळे ताबडतोब विक्रीसाठी पाठवायची असतात, त्या वेळी त्यांच्या बाह्य स्वरूपात सुधारणा करण्यासाठी पॅकआउट मेण वापरले जाते. मेणामुळे फळांतील ओलावा आणि सौंदर्य टिकून राहते. त्यांची चमक आणि आकर्षकता वाढून चांगला दर मिळण्यास मदत होते. सुपर मार्केट, निर्यात व मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी वापरल्या जाणाऱ्या फळांसाठी प्राधान्याने वापर होतो.

उदाहरण : सफरचंद, नाशपाती, संत्री चमकविण्यासाठी मेणाचा वापर केला जातो.

मर्यादा

पॅकआउट मेणाचा मुख्य उद्देश केवळ फळांना आकर्षक देणे हा आहे. त्याचा ती दीर्घकाळ टिकण्यास फारसा फायदा होत नाही.

यासाठी वापरले जाणारे मेण अन्नसुरक्षित (फूड ग्रेड) असलेले वापरणे गरजेचे असते, अन्यथा ते आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते.

पॅकआउट मेणाचे प्रकार

नैसर्गिक मेण : मधमाशीच्या पोळ्यापासून मेण, कॅरनौबा मेण, शेलॅक मेण

कृत्रिम मेण : फूड-ग्रेड पॅराफिन मेण, इमल्सिफाइड मेण, पॉलिथिलीन मेण

धुके विरोधी मेण

थंड वातावरणात किंवा उच्च आर्द्रतेच्या ठिकाणी साठवलेल्या फळांवर ओलावा जमा होऊन त्यांचे नुकसान होते. विशेषतः कोल्ड स्टोअरेजमध्ये साठवलेल्या आणि रेफ्रिजरेशनमधून बाहेर काढल्यानंतर ओलसर होणाऱ्या फळांसाठी धुके विरोधी (अँटी-फॉग) मेणाचे आवरण करणे फायदेशीर ठरते.

उपयोग : थंड वातावरणात साठवलेल्या फळांच्या पृष्ठभागावर ओलावा जमा होऊन फळांच्या रंगावर परिणाम होतो. ती गडद रंगाची होतात. ओलाव्यामुळे फळे खराब होण्याचे प्रमाण वाढू शकते. ते टाळण्यासाठी धुके विरोधी मेण वापरले जाते.

कार्यप्रणाली (काम) : हे मेण फळांच्या पृष्ठभागावर एक अदृश्य, जलरोधक थर तयार करतात. हवेतील आर्द्रतेमुळे तयार होणारा ओलावा फळांच्या पृष्ठभागावर जमा होण्यास प्रतिबंध करते. त्यामुळे नैसर्गिक चमकदारपणा टिकून राहतो. अन्नसुरक्षित आणि जैवविघटनशील घटकांपासून तयार केल्यामुळे मानवी आरोग्यासाठी सुरक्षित असते.

उदाहरण

द्राक्षे – रेफ्रिजरेशनमुळे ओलसर थेंब तयार होण्याची शक्यता जास्त असते.

चेरी – ताजेपणा आणि चमक कायम ठेवण्यासाठी.

स्ट्रॉबेरी – पृष्ठभाग स्वच्छ आणि ताजातवाना होतो.

सफरचंद – दीर्घकाळ टिकणे व गडदपणा टाळणे.

केळी – कोल्ड स्टोरेजमधून बाहेर काढल्यानंतर साठलेले ओलसरपणा रोखण्यासाठी.

अँटी-फॉग मेण लावण्याची प्रक्रिया

धूळ व घाण काढून टाकण्यासाठी स्वच्छ पाण्याने धुणे आणि कोरडे करावीत.

अन्नसुरक्षित अँटी-फॉग मेण गरम करून किंवा द्रव स्वरूपात तयार करून घ्यावे.

मेण फळांवर समान थरामध्ये फवारावे किंवा फळे अलगद द्रवरूप मेणामध्ये बुडवून काढावीत.

वॅक्सिंग केल्यानंतर फळे हवेशीर ठिकाणी वाळवावीत. त्यानंतर ती शीतगृहामध्ये ठेवता येतात.

फायदे

i. ओलावा जमा होण्यास प्रतिबंध करते.

ii. फळांचे आकर्षकता आणि ताजेपणा टिकवून ठेवते.

iii. वाहतूक आणि साठवणीसाठी उपयुक्त.

iv. नैसर्गिक चव आणि गुणवत्तेमध्ये बदल करत नाही.

धुके विरोधी (अँटी-फॉग) मेणाचे प्रकार

नैसर्गिक मेण : मधमाशीच्या पोळ्यापासून मेण, कॅरनौबा मेण, शेलॅक मेण

कृत्रिम मेण : इमल्सिफाइड मेण, पॉलिथिलीन मेण, सिलिकॉन आधारित मेण

सूक्ष्मजीवांची वाढ थांबवणारे बायोसाइड मेण

बायोसाइड मेण (Biocide Wax) या मेणामध्ये बुरशीनाशकाचे आणि जिवाणूनाशकाचेही गुणधर्म अंतर्भूत केलेले असतात. त्याचा थर फळांच्या आणि भाज्यांच्या पृष्ठभागावर दिल्यानंतर त्यावर बुरशी, जिवाणू किंवा अन्य सूक्ष्मजीव वाढू शकत नाहीत.

उपयोग : बुरशी व जिवाणूंच्या प्रादुर्भावामुळे खराब होणाऱ्या शेतीमालावर प्रामुख्याने या प्रकारच्या मेणाचा थर दिला जातो. त्यामुळे जैविक प्रादुर्भावापासून बचावासोबत ताजेपणा दीर्घकाळ टिकण्यास मदत होते. गरम व दमट हवामानात फळे टिकविण्यासाठी उपयुक्त.

सिंथेटिक अँटी- मायक्रोबियल मेणामध्ये बुरशीनाशक मिश्रण केलेले असल्यामुळे फळांवर बुरशीची वाढ रोखते. आंबा, केळी, संत्री, मोसंबी, लिंबू आणि पपईसारख्या उष्ण कटिबंधीय फळांवर बायोगॅस मेण (Biogass Wax) वापरले जाते. तसेच सफरचंद, द्राक्षे, टोमॅटो आणि बटाटे यासारख्या फळे व भाज्यांसाठीही फायद्याचे ठरते.

संभाव्य तोटे आणि जोखीम

काही प्रकारच्या बायोसाइड मेणामध्ये कृत्रिम रसायने असतात. त्यांचे प्रमाण शिफारशीप्रमाणे अत्यंत काटेकोरपणे ठरवलेले असले पाहिजे, अन्यथा ते आरोग्यास अपायकारक ठरू शकतात. अधिक वापरामुळे फळांची चव आणि पोतावरही परिणाम होऊ शकतो.

मेणामुळे आतील फळाचे संरक्षण होत असले तरी फळाच्या पृष्ठभागावर जंतू किंवा रसायनांचे अवशेष राहू शकतात. अशी फळे नीट स्वच्छ धुऊनच खाणे गरजेचे असते.

बायोसाइड मेणाचे प्रकार

नैसर्गिक मेण : मधमाशीच्या पोळ्यापासून मेण, कॅरनौबा मेण, शेलॅक मेण

कृत्रिम मेण : बायोगॅस मेण, पॉलीथिलीन मेण, इमल्सिफाइड बायोसाइड मेण, कृत्रिम अँटी-मायक्रोबियल मेण.

हाय शाइन मेण

फळांच्या पृष्ठभागावर या मेणाचा एक चमकदार व एकसंध थर दिला जातो. त्यामुळे ती अधिक चमकदार, ताजीतवानी दिसतात. हे मेण ओलावा टिकवून ठेवत असल्यामुळे दिखाऊपणासोबतच फळांच्या टिकाऊपणातही वाढ करते.

विशेषतः सुपरमार्केट आणि निर्यातीसाठीच्या फळांसाठी (उदा. सफरचंद, नाशपाती, संत्री, द्राक्षे इ.) हाय शाइन मेण मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

अतिरिक्त फायदे

हवेतील आर्द्रतेपासून संरक्षण मिळते.

फळांच्या सालीवर एक सुरक्षात्मक थर तयार होत असल्याने बुरशी व बाह्य संसर्गापासून बचाव होतो.

आकर्षकता वाढवते.

हाय शाइन मेणचे प्रकार

नैसर्गिक मेण : मधमाशीच्या पोळ्यापासून मेण, कॅरनौबा मेण, शेलॅक मेण

कृत्रिम मेण : फूड-ग्रेड पॅराफिन मेण, इमल्सिफाइड मेण, पॉलिथिलीन मेण, पॉलिमरिक हाय शाइन मेण

 मिश्रित हाय शाईन मेण (Blended High Shine Wax) : यात नैसर्गिक (Beeswax, Carnauba) आणि कृत्रिम (Paraffin, Polymeric) मेणांचे मिश्रण केलेले असते.

- डॉ. विक्रम कड, ०७५८८०२४६९७

कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabinet Meeting : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पंतप्रधान धन धान्य योजनेला मान्यता; २४ हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार

Crop Insurance Delay: विमा कंपनीकडे थकला १०० कोटींचा परतावा

Lumpy Skin Disease: ‘लम्पी’ची लक्षणे आढळलेल्या १०० जनावरांवर उपचार सुरू

Harnbari Dam: द्वारकाधीश कारखान्याकडून हरणबारी धरणाचे जलपूजन

Landslide Risk: दोन गावांतील ८०० जीव दरडीच्या छायेत

SCROLL FOR NEXT