Turmeric Crop Management  Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Sowing : हळदीच्या क्षेत्रात दहा हजारांवर हेक्टरने घट

Turmeric Production : गतवर्षीच्या तुलनेत हळदीच्या क्षेत्रात १० हजार ९१० हेक्टरने घट झाली आहे. गतवर्षी जिल्ह्यात ३५ हजार ८१ हेक्टरवर हळद लागवड झाली होती.

माणिक रासवे

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात यंदा एकूण २४ हजार १७१ हेक्टरवर हळद लागवड झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत हळदीच्या क्षेत्रात १० हजार ९१० हेक्टरने घट झाली आहे. गतवर्षी जिल्ह्यात ३५ हजार ८१ हेक्टरवर हळद लागवड झाली होती.

कमी बाजारभाव तसेच गेल्या काही वर्षांत कीड, रोगांचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादकतेत घट येत आहे. वाढलेली मजुरी, यामुळे निव्वळ नफा कमी उरत आहे. त्यामुळे गेल्यात तीन वर्षांपासून जिल्ह्यातील हळदीचे क्षेत्र कमी होत आहे.

सततच्या दुष्काळी स्थितीमुळे ऊस, केळी या जास्त पाण्याची गरज असलेल्या पिकांचे उत्पादन घेणे शक्य होत नाही. त्या तुलनेत किफायतशीर उत्पादन मिळत असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक हळद पिकाकडे वळले. गादी वाफा (बेड) लागवड, ठिबक सिंचन पद्धती, विद्राव्य खते, सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापरामुळे उत्पादकतेत वाढ झाली.

गेल्या काही वर्षांत हळद लागवड ते काढणी, काढणीपश्‍चात कामांचे यांत्रिकीकरण झाले. त्यामुळे मजुरीवरील खर्च कमी झाला. परंतु गेल्या काही वर्षांपासून कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यात मागील दोन-तीन वर्षांत सततचा पाऊस, अतिवृष्टीमुळे पाणी साचून राहिल्याने कंदकुज, कंदसडीचे प्रमाण वाढले. त्यामुळे उत्पादकता कमी झाली आहे. निविष्ठा, इंधन, मजुरीच्या दरांत वाढ झाली.

बाजारभाव पाच ते सात हजार रुपयांच्या दरम्यान राहिले. नफा कमी मिळत असल्यामुळे हळदीच्या क्षेत्रात घट होत आहे. २०२० मध्ये ४१ हजार ५३८ हेक्टर हळद लागवड होती. २०२१ मध्ये हळदीच्या क्षेत्रात ४९ हजार ७६४ हेक्टरपर्यंत वाढ झाली. परंतु गतवर्षी हळदीच्या क्षेत्रात ३५ हजार ८१ हेक्टरपर्यंत, तर २०२३ मध्ये २४ हजार १७१ हेक्टरपर्यंत घट झाली.

यंदा जूनपर्यंत हळदीचे दर सहा हजारांपर्यंत होते. पावसाचे आगमन उशिरा झाले. त्यामुळे सिंचनासाठी पाणी नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना हळद लागवड करता आली नाही. अनेक शेतकऱ्यांनी हळदीचे क्षेत्र निम्म्यावर आणले तर अनेकांनी हळद लागवड बंद केली.

हिंगोली जिल्हा वर्षनिहाय हळद लागवड क्षेत्र (हेक्टर)

वर्ष...लागवड क्षेत्र

२०१९...३२५३४

२०२०...४१५३८

२०२१...४९७६४

२०२२...३५०८१

२०२३...२४१७१

तुलनात्मक हळद लागवड स्थिती (हेक्टरमध्ये)

तालुका...२०२१...२०२२...२०२३

हिंगोली...६४९२...५४०७...४७६९

कळमनुरी....७५७१...६५६८...३२२२

वसमत...१७६४६...१०६५१...६५०२

औंढा नागनाथ...१०७६०...७५८०...४९४६

सेनगाव...७२९५...४८७५...४७३२

यंदा अनेक शेतकऱ्यांकडे हळद लागवडीसाठी पाणी नव्हते. कमी बाजारभावामुळे हळद लागवड झाली नाही. त्यामुळे तालुक्यातील हळदीचे क्षेत्र घटले आहे.
- एस. बी. भिसे, तालुका कृषी अधिकारी, वसमत, जि. हिंगोली
हळद लागवड कालावधी १५ जूनपर्यंत असतो. यंदा पावसास उशीर झाल्यामुळे जूनअखेरपर्यंत लागवड झाली. कायिक वाढीचा कालावधी कमी झाला. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी राहील. त्यामुळे उत्पादकतेत घट येऊ शकते.
- अनिल ओळंबे, उद्यानविद्या विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर, जि. हिंगोली
दरवर्षी १५ एकर हळद लागवड करत असे. मागच्या चार वर्षांत मजुरी तसेच निविष्ठांचे दर वाढले. उत्पादकता कमी येत आहे. चार वर्षांत बाजारभाव कमी मिळाले. काढणीचा खर्च वाढल्याने परवडत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी यंदा हळद बंद केली आहे. मी यंदा फक्त ५ एकर लागवड केली आहे. पाणी कमी पडू लागले आहे. उत्पादन कमी येईल.
- संजय पिसोरे, माटेगाव, ता. वसमत, जि. हिंगोली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT