mahagai Agrowon
ॲग्रो विशेष

Pakistan crisis: पाकिस्तानचा प्रवास अण्वस्त्रांकडून थेट अन्न-वस्त्रांकडे

Team Agrowon

डॉ. संतोष डाखरे

Pakistan Food Crisis : वर्तमानात पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटाचा (Economic Crisis) सामना करत आहे. देशात गरिबी आणि महागाईने (Inflation) उच्चांक गाठला आहे. बहुसंख्य लोकांना दोन वेळचे अन्नही दुरापास्त झाले आहे. पेट्रोल-डिझेल तीनशेच्या वर तर सिलिंडरचे दर दहा हजारावर गेले आहेत.

गहू, तांदूळ, खाद्यतेलाचे भाव (Edible Oil Rate) गगनाला भिडले असून साठाही संपण्याच्या मार्गावर आहे. रेशनच्या दुकानांसमोर लोकांच्या रांगाच-रांगा लागल्याचे चित्र आहे. देशातील मोठा भाग विजेअभावी अंधारात आहे. औषधांचा प्रचंड तुटवडा आहे.

देशाच्या तिजोरीतील विदेशी मुद्रा भांडार संपल्यात जमा आहे. पाकिस्तानच्या बंदरावर विदेशातून हजारो मालवाहू कंटेनर येऊन उभे आहेत. मात्र त्यातील माल (वस्तू) सोडविण्याकरीताही पाकिस्तानकडे पैसा नाही.

जागतिक बँकेच्या अहवालानुसार वर्तमानात या देशांवर ६० ट्रिलियन कर्ज आहे. पाकिस्तानची लोकसंख्या २२ कोटींच्या घरात असून आज प्रत्येक पाकिस्तानी व्यक्तीच्या डोक्यावर २ लाख ७२ हजार ७२६ रुपयांचे कर्ज आहे.

आगामी काळात आपल्या या शेजारी राष्ट्रात भूकबळीची संख्याही वाढू शकते. इतकी दयनीय अवस्था झाली आहे. ‘एशियन लाईटच्या’ अहवालानुसार निर्मितीपासूनच पाकिस्तान हा भारताचा द्वेष करत आला आहे.

आतंकवादाचे समर्थन आणि भारतासोबत युद्ध करण्यातच सारी शक्ती पाकिस्तानने खर्ची घातली आणि दीर्घकालीन आर्थिक विकासावर प्रचंड दुर्लक्ष केले. परिणामतः देश आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत गेला.

दिवाळखोरीच्या वाटेवर असलेल्या पाकिस्तानची सारी मदार आता एखाद्या बेल-आऊट पॅकेजवर आहे. याकरिता पाकिस्तानने ‘आंतरराष्ट्रीय मुद्रा कोशा’कडे हात पसरले आहेत. आंतरराष्ट्रीय मुद्रा कोश (आयएमएफ) जगभरातील गरजू राष्ट्रांना स्वस्त दरात कर्ज देत असते.

१९४४ मध्ये या कोशाची स्थापना झाली होती. पाकिस्तान १९५० पासून याचा सदस्य बनला. १९० सदस्य देशांची मिळून ही संस्था बनली आहे. प्रत्येक सदस्य राष्ट्र आपआपल्या कुवतीप्रमाणे या कोषात योगदान देत असतो. श्रीमंत राष्ट्रांकडून अधिक निधी घेतला जातो.

सध्या पाकिस्तानची पूर्ण मदार या संस्थेवर आहे. यापूर्वी पाकिस्तानने चोवीस वेळा या संस्थेकडून कर्ज घेतले आहे. मात्र, या वेळेला आयएमएफने अनेक कठोर नियम लावले आहेत. जे मान्य करणे पाकिस्तानला शक्य नसतानाही पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ त्यास तयार झाले आहे.

यापूर्वी सत्तेवर आलेल्या प्रत्येकच पाकिस्तानी सरकारने या संस्थेकडून मदत प्राप्त केली आहे. १९५८ मध्ये सर्वप्रथम पाकिस्तानने अडीच कोटी अमेरिकन डॉलरची मदत प्राप्त केली होती. ती परंपरा आजतागायत कायम आहे.

चीन, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात हे चीनचे खास मित्र मानले जातात. मात्र, पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटात सापडला असताना या मित्र राष्ट्रांकडून पाकिस्तानला तत्काळ मदत प्राप्त होताना दिसून येत नाही. सौदी अरब पाकिस्तानला मदत करतील असे वक्तव्य पाकच्या अर्थमंत्र्यांकडून वारंवार येत आहेत.

परंतु अशी कुठलीही मदत अद्यापपर्यंत पाकिस्तानला प्राप्त झाली नाही. पाकिस्तान सध्या आयएमएफसोबत चर्चा करीत असल्याने आधी पाकिस्तानने ही चर्चा संपवावी नंतर आम्ही विचार करू, असे मित्र राष्ट्रांकडून सांगण्यात आले आहे. याचे कारण सुद्धा तसेच आहे.

आयएमएफच्या परवानगीशिवाय कोणताही देश इतर गरजू राष्ट्रांना मदत करू शकत नाही, असा अलिखित नियमच सध्या अस्तित्वात आहे. तरीसुद्धा सौदीचे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी पाकिस्तानची बुडती आर्थिक नौका पैलतीरी लावण्याकरिता मदतीची घोषणा केली आहे.

याअंतर्गत पाकिस्तानातील वर्तमान गुंतवणूक एक अरब डॉलरवरून दहा अरब डॉलरपर्यंत वाढवण्याची तयारी त्यांनी दाखविली आहे. यासोबतच पाकिस्तानवर यापूर्वीचे असलेले ४.३ अरब डॉलरचे कर्ज फेडण्याची तारीखही वाढवून दिली आहे. सौदी पाकिस्तानवर इतका मेहेरबान असण्याचे कारण म्हणजे सुन्नीबहुल देश सौदी आणि शियाबहुल देश इराण यांच्यामध्ये अरब राष्ट्रावर वर्चस्वासाठी सतत चढाओढ सुरू असते. हे दोन्ही देश एकमेकांचे कट्टर वैरी आहे.

पाकिस्तान हा इस्लामिक राष्ट्रांमध्ये एकमेव अण्वस्त्र संपन्न देश असल्याने प्रसंगी पाकिस्तान आपल्याला परमाणू शस्त्रांची मदत करू शकतो, असा विश्वास सौदीला आहे. आज घडीला सौदीमध्ये पाकिस्तानचे ६३ हजार सैनिक तैनात आहेत. सौदी सैन्यांना पाकिस्तान प्रशिक्षणही देत असतो.

आर्थिक संकटांची कारणे

वर्तमान स्थितीत पाकिस्तानवर जे आर्थिक संकट ओढवले आहे त्याचे कारण पाकिस्तानचा अदूरदर्शीपणा आणि चुकीच्या योजना यामध्ये दडले आहे. आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य आणि गैरविकासात्मक योजनांच्या अंमलबजावणीमुळे पाकिस्तान या दुर्गतीला पोहोचला आहे.

‘ग्वादर-काश्घर’ रेल्वेलाईन उपक्रमावर पाकिस्तानने अवास्तव खर्च केला. यासाठी बाहेरून कर्ज उभारण्यात आले. ‘चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर’ (सीपीईसी) ही आणखी एक योजना. ‘पाकिस्तानी-चिनी, भाई-भाईचा’ साक्षात्कार झालेल्या पाकिस्तानवर या योजनेमुळे विदेशी कर्जाचा बोजा वाढला.

या एका योजनेमुळे पाकिस्तानवर ७० बिलियन अमेरिकी डॉलरचे कर्ज झाले. ही योजना अजूनही पूर्णत्वास गेली नाही. २०१९-२० या एका वर्षात चीनच्या तीन अब्ज डॉलरच्या कर्जावर पाकिस्तानने तब्बल १२० दशलक्ष डॉलर इतके व्याज चीनला दिले आहे. मुद्दल अजूनही बाकीच आहे. या एका उदाहरणावरून पाकिस्तानवरील विदेशी कर्जाची स्थिती लक्षात येते.

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयांमध्ये सतत होत असलेल्या घसरणीमुळे पाकिस्तानवर विदेशी कर्जाचा बोजा वाढला. ‘आंतरराष्ट्रीय वित्तीय रेटिंग एजन्सी’ने पाकिस्तानची रँकिंग कमी दाखवल्याने पाकिस्तानातील विदेशी गुंतवणूक थांबली.

अनेक राष्ट्रांनी पाकिस्तानला मदत देणे थांबविले. कर्ज-परतफेड, पुन्हा कर्ज या दुष्टचक्रात पाकिस्तान रुतून बसला आहे. पाकिस्तानची निर्यात कमी आणि आयात अधिक आहे. त्यातच कोविड संकटात पाकिस्तानची निर्यातपण थांबली होती.

डाळ, गहू, खाद्यतेल, साखर यासह अन्य महत्त्वपूर्ण खाद्यवस्तूंची आयात पाकिस्तान करीत असतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात पाकिस्तानला विदेशी मुद्रेचा वापर करावा लागतो. अशातच मागील काही वर्षात विजेचे दर प्रचंड वाढल्याने सामान्य नागरिकांवर खर्चाचा दबाव वाढला आहे.

पाकिस्तानातील राजकीय नेत्यांचे आणि श्रीमंतांचे विलासी जीवन हे सुद्धा एक कारण यामागे आहे. पाकिस्तानातील अनेक राजकारणी आणि श्रीमंत आजही नवाबी मानसिकतेत वावरतात. त्यांच्यासाठी महागड्या आणि लक्झरी वस्तूंच्या आयातीकरिता पाकिस्तानला मोठा खर्च करावा लागतो.

पाकिस्तानामध्ये दरवर्षी विशेष लोकांना कर प्रणालीमध्ये सूट देण्यात येते. ही सूट तब्बल १७ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी असते. पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईस जाण्याचे हे प्रमुख कारण मानले जाते. भरीसभर रशिया आणि युक्रेन युद्ध या देशातील महागाई वाढवण्यास कारणीभूत ठरले आहे.

अशातच २०२२ मध्ये जून ते ऑक्टोबर या दरम्यान झालेल्या महापुराने या देशातील साडे तीन कोटी लोक प्रभावित झाले होते तर तीस बिलियन डॉलरचे नुकसान झाले होते. यासह इतरही अनेक कारणांमुळे पाकिस्तान भिकेस लागला आहे.

विदेशी मदतीच्या बळावर पाकिस्तान या संकटातून तरुणही जाईल, मात्र चुकीची आर्थिक धोरणे आणि भारत द्वेषामुळे आपण या थराला येऊन पोहोचलो, हे सत्य पाकिस्तानने स्वीकारणे त्यांच्या हिताचे ठरणार आहे.

डॉ. संतोष डाखरे ८२७५२९१५९६ (लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

Rain Update : सावंतवाडी, मडूरामध्ये १०७ मिलिमीटर पाऊस

Agrowon Exhibition 2024 : सांगलीत आजपासून ‘ॲग्रोवन’चे कृषी प्रदर्शन

Soybean Rate : भविष्यात सोयाबीनलाही मिळेल दरातील तेजीची झळाळी

Weather Forecast : राज्यात वादळी पावसाचा अंदाज कायम

SCROLL FOR NEXT