Cotton Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Pest Management : कापूस पिकात तुडतुड्यांचा प्रादुर्भाव वेळीच करूया नियंत्रण

Team Agrowon

डॉ. बाबासाहेब फंड, डॉ. शिवाजी ठुबे, डॉ. विश्लेष नगरारे, डॉ. जी. टी. बेहेरे, डॉ. वाय. जी. प्रसाद

Cotton Crop Insect infestation Management : महाराष्ट्रातील कापूस उत्पादक पट्ट्यात मागील १०-१५ दिवसांपासून सततचा पाऊस आहे. हवामान ढगाळ आहे. वातावरणात वाढलेली आर्द्रता, सूर्यप्रकाशाचा अभाव आदी बाबीही आहेत. त्यामुळे सध्या रोपावस्था ते शाकीय वाढीच्या दरम्यान (पेरणीपासून ४० दिवसांपर्यंत) असलेल्या कपाशी पिकात तुडतुडे या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

सुरुवातीच्या शाकीय वाढीच्या अवस्थेतील पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट येऊन नये यासाठी प्रादुर्भाव वेळेत रोखणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे. तुडतुडे ही कीड पोपटी रंगाची व त्रिकोणी आकाराची असून पंखांच्या मागील बाजूस गर्द काळे दोन ठिपके दिसतात. ही कीड तिरकस चालते (इंग्रजी झेड Z आकारासारखी).

पिल्ले आणि प्रौढ दोन्हीही कोवळ्या पानाच्या खालील बाजूस राहून रसशोषण करतात. त्यामुळे पाने खालच्या बाजूला वळलेली (वाकडे झालेले) दिसतात.

पानांच्या कडा सुरुवातीला पिवळसर बनतात. कालांतराने पिवळ्या रंगाचे लाल/तांबूस तपकिरी रंगात रूपांतर होऊन पीक लालसर झालेले दिसते.

वाढीच्या प्रारंभिक अवस्थेत आलेला लालसरपणा हा अनेकदा शेतकऱ्यांना लाल्या विकृतीबाबत संभ्रमित करतो. मॅग्नेशिअम अथवा नत्राच्या कमतरतेमुळे बोंड लागणे ते त्याचा विकास होणे या अवस्थेत (९० दिवसांपासून पुढे) लाल्या आणि तुडतुडे प्रादुर्भाव दिसून येतो. त्यामुळे सुरुवातीच्या काळात (६० दिवसांपेक्षा कमी) आलेला व नंतरचा लालसरपणा यातील फरक ओळखणे अत्यंत गरजेचे आहे.

अचूक निदान झाल्यास योग्य उपाययोजना करणे शक्य होते.

उपाययोजना

पीक ४० ते ४५ दिवसांचे झाल्यावर किडींच्या प्रादुर्भावाची पातळी जाणून घेण्यासाठी एकरी आठ याप्रमाणे पिवळे चिकट सापळे लावावेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी अर्क ५ टक्के (५० मिलि प्रति लिटर) किंवा अझाडिरेक्टीन (१.५ टक्के इसी) ५ मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. सोबत एक ग्रॅम धुण्याचा सोडा प्रति लिटर पाणी किंवा चांगल्या गुणवत्तेचे सरफॅक्टंट मिसळून वापरावे.

प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर  (२ किंवा त्यापेक्षा अधिक तुडतुडे प्रति पान) असेल तर ४५ ते ६० दिवसांदरम्यान फ्लोनिकामीड (५० डब्ल्यूजी) ०.४ ग्रॅम प्रति लिटर या कीटकनाशकाची फवारणी करावी.

आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास कपाशीच्या वाढीच्या अवस्थानुरूप गरजेनुसार सोबतच्या तक्त्यात दिल्याप्रमाणे शिफारस केलेल्या रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी.

अति प्रादुर्भावामुळे पानांना लालसरपणा आला असल्यास ती हिरवी होऊन पिकाची वाढ पुर्ववत होण्यासाठी १ टक्के युरिया (१० ग्रॅम प्रति लिटर पाणी) अथवा २ टक्के डीएपी (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) अथवा १ टक्के मॅग्नेशिअम सल्फेट (१० ग्रॅम प्रति लिटर पाणी) याप्रमाणे फवारणी करावी.

महत्त्वाच्या टिप्स

*डिटर्जंटसाठी पर्यायी योग्य सरफॅक्टंटचा वापर करता येऊ शकतो. डिटर्जंटचे प्रमाण शिफारशीपेक्षा अधिक घेतल्यास पिकाच्या पानांना नुकसान पोचू शकते. या लेखात कपाशीव्यतिरिक्त अन्य पिकात हा वापर सुचविलेला नाही.

लागवडीनंतर ६० दिवसांपर्यंत रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळावी. कारण बीटी कपाशीच्या बियाण्याला संबंधित कंपन्यांकडून निओनिकोटीनोईड गटातील कीटकनाशकांची (इमिडाक्लोप्रिड अथवा थायामेथोक्झाम पैकी एकाची) बीज प्रक्रिया केलेली असते. त्यामुळे पिकास ३५ ते ४० दिवसांपर्यंत सर्व रसशोषक किडींपासून (मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी) संरक्षण मिळते.

सुरुवातीच्या काळात कीटकनाशकांचा वापर टाळल्याने मित्रकिटकांची वाढ होण्यास मदत होते. -रासायनिक कीटकनाशकांचा सुरुवातीलाच केलेल्या अतिरेकी वापरामुळे मित्रकिटकांना हानी पोचून रसशोषक किडींचा उद्रेक होऊ शकतो.

इमिडाक्लोप्रिड आणि थायामेथोक्झाम  या कीटकनाशकांची फवारणी पीक वाढीच्या ९० दिवसांपर्यंत करू नये. कारण बियाण्याला याच कीटकनाशकांची बीजप्रक्रिया केलेली असते. त्यामुळे पुन्हा लवकर वापर केल्यास किडींमध्ये प्रतिकारक क्षमता वाढीस लागते. परिणामकारक नियंत्रण मिळत नाही.

सिंथेटिक पायरेथ्रॉइडस गटातील कीटकनाशकांचा (उदा. सायपरमेथ्रीन, लॅॅम्बडा सायहॅलोथ्रीन, फेनवलरेट) कापूस हंगामाच्या सुरुवातीच्या १०० ते १२० दिवसांपर्यंत वापरू नये. अन्यथा रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढीस लागतो.

लेबल क्लेम तपासूनच कीडनाशकांचा वापर करावा. केवळ शिफारस केलेली मात्राच वापरावी.

एकाच वेळी एकापेक्षा अधिक कीटकनाशकांचे मिश्रण करून फवारू नये. फवारणी करतेवेळी हातमोजे, चष्मा, संरक्षक कपडे आदींचा वापर करावा.

बाबासाहेब फंड, ७५८८७५६८९५

(लेखक डॉ. प्रसाद केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर येथे संचालक व अन्य लेखक शास्त्रज्ञ आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT