Drought Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Crisis : खर्चाला पैसा नाही, दावणीची जनावरं विकण्याची वेळ

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : दुष्काळ पाचवीला पुजलेला. उन्हामुळं शेतरान जळालेली. खरिपातून पैका हाती नाय, डोळ्यादेखत रब्बी जाऊ लागलाय... घरात कणभर दाणा नाही, पाण्यासाठी चहूदिशांना वणवण, तरीही पाणी नाही... दिवाळी तोंडावर आली... खर्चाला पैसा नाही.

दावणीची जनावरं विकण्याची वेळ आली आहे. दुष्काळाच्या चक्रात लेकराबाळांची उपासमार अन् जगण्याची कठोर परीक्षा आली आहे, अशा व्यथा जत तालुक्यातील कोळगिरी गावातील शेतकरी मांडत होते.

दुष्काळाचे ब्रॅंड ॲम्बेसिडर म्हणून असला जत तालुका. दुष्काळ मिटविण्यासाठी आजपर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी काहीच केले नाही. त्यामुळे स्वतःच जिद्दीने कष्ट करून शेती फुलवून दोन पैसे पदरात मिळतात. जत तालुक्यातील कोळगिरी गाव हे दुष्काळाच्या कचाट्यातून सुटलेले नाही. गेल्या चार वर्षांत या भागात पाऊस झाला, खरिपाचे पीक हाती पडलं, त्यातून दोन पैसे मिळाले. त्यामुळे घरात आनंदीआनंद होता.

रब्बीला परतीच्या पावसाची साथ मिळाल्यानं ज्वारी विकून घरखर्च आणि लेकराबाळांची दिवाळी झाली. यंदा मॉन्सूनपूर्व पाऊस झाला नाही, खरिपाचा पेरा थांबला, जे पेरलं ते उगवलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले. खरीप हंगामातील तुरीची वाढ खुंटली आहे. त्यातूनही रब्बीसाठी हात उसने पैसे घेऊन पेरा केला.

गणपती आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाने पिकांना उभारी मिळाली. पण त्यानंतर पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली. पैसा हाती नसल्याने कुटुंबाची आर्थिक वाताहत होऊ लागली आहे. यंदा दिवाळसणावर संक्रांत आली आहे. आता पुढं कसं जगायचं असा प्रश्‍न आ वासून निर्माण झाला आहे.

जत तालुक्याच्या पूर्व भागातील लोक ऊस तोडणीसाठी स्थलांतर होतात. परंतु गेल्या चार वर्षांत मुबलक पाऊस झाला. त्यामुळे ऊस तोडणीसाठी स्थलांतर थांबले होते. परंतु या वर्षी पावसाने दडी मारली, त्यामुळे हाताला काम नसल्याने अर्थचक्र थांबले आहे.

कोळगिरी गावातील सुमारे १५० ते २०० हून अधिक कुटुंब ऊस तोडणीसाठी स्थलांतर झाले आहेत. जत तालुक्याच्या पूर्व भागातील कुटुंबाच्या कुटुंब ऊस तोडणीसाठी पुन्हा स्थलांतर करू लागले आहेत.

तालुका वगळण्याने शेतकरी संतप्त

सांगली जिल्ह्यातील शिराळा, कडेगाव, खानापूर आणि मिरज या चार तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला. मात्र पिढ्यान् पिढ्या दुष्काळी असलेल्या जत, आटपाडी, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यांना दुष्काळाच्या यादीतून वगळण्यात आले.

कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या या तालुक्यांना दुष्काळी यादीतून वगळल्याने या तालुक्यातून शासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कायमस्वरूपी दुष्काळी असणाऱ्या या तालुक्यांना कोणत्या निकषानुसार यादीतून वगळले असा सवाल उपस्थित होत आहे.

कोळगिरी गावातील सुमारे ९५ टक्के शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांना विमा घेऊन संरक्षित केले. अग्रिमसाठी २५ टक्के भरपाई देण्याचे नियोजन शासनाने केले. त्यासाठी कृषी विभागाने सर्व्हेक्षणही केले आहे.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाई देण्याचे आदेश दिले होते. भरपाईची रक्कम मिळाली असली तर दिवाळीला पैसे मिळाले असते. परंतु अद्यापही अग्रिमची भरपाई मिळाली नाही. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.

तालुक्यातील महसूल मंडल संख्या ः ०६

 ऊस तोडणीसाठी होऊ लागले स्थलांतर

 जनावरांच्या पिण्यासाठी टँकर सुरूच नाहीत

 पाणी नसल्याने द्राक्ष, डाळिंब बागा धोक्यात

 चारा विकतही मिळेना

 कोळगिरी गाव

गावाचे भौगोलिक क्षेत्र १६७९ हेक्टर

लागवडीखालील क्षेत्र १५०७ हेक्टर

खरीप क्षेत्र ४१६

पेरणी झालेले क्षेत्र १७४

रब्बी क्षेत्र ११६४

पेरणी झालेले क्षेत्र ८९१

शेततळी १८

चाऱ्याचे दर

मका पेंडी १००० ते १२०० रूपये शेकडा

ओला चारा १० रुपये किलो

ज्वारी पेंडी २४०० रुपये शेकडा

कोणत्या मंडलात किती

दिवस पावसाचा खंड

मंडल पावसाचा खंड

माडग्याळ ३२

जत ३४

मुचंडी ३३

डफळापुर २५

कुंभारी ३७

तिकोंडी २५

जत तालुक्यात १ जून ते ३१ ऑक्टोबरअखेर झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

महिना सरासरी पर्जन्यमान पडलेला पाऊस

जून ९२.२४ ३७.९०

जुलै ७०.१३ .११२.१०

ऑगस्ट ८५.४२ १२.९०

सप्टेंबर १६८.७७ १७६.००

ऑक्टोबर ११४.२५ १२

शासनाने एक रुपयात खरीप हंगामातील विमा योजना जाहीर केली. या योजनेतून खरीप हंगामातील पिकांसाठी विमा घेतला. शासनाने दिवाळीपूर्वी २५ टक्के भरपाई देणार असे सांगितले. पण अजून २५ टक्के भरपाई अजूनही मिळालेली नाही.
- सदाशिव शिदरेड्डी, कोळगिरी, ता. जत
खरिपातून शाश्‍वत मिळणार उत्पन्न हाती आले नाही. रब्बी गेल्यात जमा आहे. पैसा कसा उभा करायचा असा प्रश्‍न आवासून पडला आहे. लावणीला तीन जनावर होती. चारा मिळत नसल्याने दोन जनावर विकली आता एक जनावर वरती प्रपंच सुरू आहे.
- भाऊसाहेब भोसले, कोळगिरी, ता. जत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT