Maharashtra Assembly Election Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात चुरशीने मतदान

Vidhansabha Election 2024 :राज्यातील प्रमुख दोन पक्षांच्या फुटीनंतर आणि पाच वर्षांत दोन सरकार पाहिल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघांत चुरशीने मतदान झाले.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : राज्यातील प्रमुख दोन पक्षांच्या फुटीनंतर आणि पाच वर्षांत दोन सरकार पाहिल्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी २८८ मतदारसंघांत चुरशीने मतदान झाले. राज्यात ठिकठिकाणी पैसेवाटप आणि हाणामारीमुळे मतदान प्रक्रियेला हिंसाचाराचे गालबोट लागले. राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ६१.४ टक्के मतदान झाले होते. या निवडणुकीत मात्र मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिली. रात्री आठपर्यंत मतदारांच्या मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती.

राज्यात ग्रामीण भागात सकाळपासून मतदानाचा वेग होता, तर शहरी भागात प्रथमपासून मतदानाची टक्केवारी कमी राहिली. नेहमीप्रमाणे ग्रामीण भागात मतांचा टक्का वाढला तर शहरी भागातील मतदानाचा टक्का कमी राहिला. या वेळी सहा प्रमुख पक्षांसह १५८ पक्ष रिंगणात असल्याने ४ हजार १३६ उमेदवार रिंगणात असल्याने अत्यंत चुरशीने मतदान झाले.

या निवडणुकीत २ हजार ८६ अपक्ष उमेदवार नशीब आजमावत आहेत. मतदानादरम्यान राज्यांत बहुतांश मतदारसंघांत हिंसक घटना घडल्या असून, बीड जिल्ह्यात एका अपक्ष उमेदवाराचा हृदयविकाराने मृत्यू झाला. काही ठिकाणी ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने आले.

भाजप नेते विनोद तावडे यांच्या विरार येथील प्रकरणानंतर रात्री उशिरा राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या बिटकॉइनच्या बदल्यात रोकड मागत असल्याच्या ऑडिओ क्लिप भाजपने सोशल मीडियात व्हायरल केल्या. मात्र याविरोधात कायदेशीर कारवाई करू. मानहानीचा गुन्हा दाखल करू, असे दोन्ही नेत्यांनी सांगितले.

सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली. ग्रामीण भागात थंडीचा कडाका असतानाही मतदारांनी उत्साहाने मतदान केले. शहरी भागात सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र मतदानाचा टक्का वाढला नाही. शासकीय सुट्टी असल्याने काही ठिकाणी दुपारनंतर मतदारांनी केंद्रांवर जाणे पसंत केले.

लोकसभा निवडणुकीत शहरी मतदान केंद्रांमध्ये सुविधांचा अभाव समोर आल्यानंतर विधानसभा निवडणुकीत ती कसर भरून काढण्यात आली. उन्हापासून संरक्षण होण्यासाठी मंडप घालण्यात आले होते. तर काही ठिकाणी मतदारांवर फुलांची उधळण करत स्वागत केले जात होते. एका बाजूला हे चित्र असताना राज्यात बहुतांश ठिकाणी वादावादी आणि मारामारीचे चित्र पाहायला मिळाले.

बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात शरद पवार गटाचे युवक सरचिटणीस माधव जाधव यांना धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. तर नाशिकमधील नांदगाव मतदारसंघात छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांनी जिवे मारण्याची धमकी दिली.

इंदापूर, बारामती, कोल्हापूर, कागल, अकोला, मुंबईतील वरळी, सायन कोळीवाडा, दिडोशी येथे वादावादीचे प्रसंग घडले. दुपारी तीनपर्यंत ४५ टक्के मतदान राज्यातील २८८ मतदार संघांमध्ये दुपारी तीनपर्यंत ४५.५३ टक्के मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यात दुपारी तीनपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडल्याने तेथे प्रथमपासून मतदानाचा वेग होता.

तसेच जेथे जोरदार चुरस आहे तेथेही मतदानाचा वेग पाहायला मिळाला. गडचिरोलीत ६९.६३ टक्के मतदान झाले. सायंकाळी पाचपर्यंत मुंबई शहरात सर्वांत कमी म्हणजे ४९.७ टक्के मतदान झाले. तर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गोंदिया, जालना, परभणी, कोल्हापूर, वर्धा, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, लातूर, हिंगोली, नंदुरबार, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांत दुपारी तीनपर्यंत ५०, तर पाच वाजेपर्यंत ६० टक्क्यांपर्यंत मतदान झाले.

दुपारनंतर मतदानाला वेग आला असून, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे आणि अन्य शहरी भागांत मात्र मतदानाचा वेग काहीसा कमी होता. दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबई शहरात ३९.३४, मुंबई उपनगरांमध्ये ४०.८९, पुणे ४१.७०, तर ठाण्यात ३८.९४ टक्के मतदान झाले होते. मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभेच्या दहा मतदारसंघांत सायंकाळी ५ वाजेपर्यंत अंदाजे ४९.७ टक्के मतदान झाले.

दरम्यान, मतदान केंद्रांवर शेवटच्या काही तासांमध्ये गर्दी होत असते, त्यामुळे सहा वाजेपर्यंत जे मतदार रांगेत असतील त्यांना मतदानाचा हक्क बजावता येईल, असे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुपारपासून मुंबईतील विविध भागांतील शिवसेना शाखांना भेटी देत मतदानाचा आढावा घेतला. लोकसभा निवडणुकीवेळीही आढावा घेताना त्यांना त्रुटी आढळल्याने या वेळी त्यांनी दुपारपासूनच मुंबई पिंजून काढली.

सायंकाळी पाच वाजेपर्यंतची राज्यातील मतदान टक्केवारी गडचिरोली ६९.६३ भंडारा ६५.८८ जालना ६४.१७ कोल्हापूर ६७.९७ गोंदिया ६५.०९ चंद्रपूर ६४.४८ सातारा ६४.१६ नंदुरबार ६३.७२ सांगली ६३.२८ वर्धा ६३.५० बुलडाणा ६२.८४ परभणी ६२.७३ सिंधुदुर्ग ६२.०६ हिंगोली ६१.१८ अहिल्यानगर ६१.९५ लातूर ६१.४३ यवतमाळ ६१.२२ रायगड ६१.०१

छत्रपती संभाजीनगर ६०.८३ बीड ६०.६२ रत्नागिरी ६०.३५ पालघर ५९.३१ नाशिक ५९.८५ धुळे ५९.७५ अमरावती ५८.४८ धाराशिव ५८.५९ वाशीम ५७.४२ सोलापूर ५७.०९ जळगाव ५४.६९ पुणे ५४.०९ नांदेड ५५.८८ अकोला ५६.१६ नागपूर ५६.०६ मुंबई उपनगर ५१.७६ ठाणे ४९.७६ मुंबई शहर ४९.०७

दृष्टिक्षेपात...

राज्यात पैसेवाटपाचे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे व्हिडिओ व्हायरल.

बीडमध्ये अपक्ष उमेदवाराचा मृत्यू.

परळीतील एका मतदान केंद्रावर धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या समर्थकाला मारहाण.

वर्ध्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नीलेश कराळे यांना मारहाण.

सायन कोळीवाड्यात प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांची पोलिसांसोबत बाचाबाची.

अंबादास दानवे यांची संजय शिरसाठ यांना शिवीगाळ.

अकोल्यात मनसे उमेदवाराचा भाजपला, तर सोलापुरात अचानक काँग्रेसच्या खासदार शिंदे यांचा अपक्षाला पाठिंबा.

लक्ष्यवेधी लढती

बारामती अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार

शिर्डी राधाकृष्ण विखे पाटील विरुद्ध प्रभावती घोगरे

नांदगाव सुहास कांदे विरुद्ध समीर भुजबळ

अहेरी धर्मराव अत्राम विरुद्ध भाग्यश्री अत्राम

वरळी आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवरा

कोपरी पाचपाखाडी एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे

माहीम अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Price : बेळगाव जिल्ह्यात ऊसदर कमी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Mosambi Crop Disease : अति पाऊस, हवामान बदलामुळे मोसंबीवर रोगाचा प्रकोप

Marathwada Assembly Election : मराठवाड्याच्या तीन जिल्ह्यांतील ४३१ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद

Maharashtra Assembly Election 2024 Voting : राज्यात ६५ टक्के मतदान; सर्वाधिक कोल्हापूर तर सर्वात कमी मुंबईत

Vidarbha Voter Turnout : पश्चिम विदर्भात मतदानाचा टक्का वाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT