Pune News : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करताना राज्यातील शेतकऱ्यांनी अनेक भागांत शेतीमधील समस्या विचारात घेत मतदान केल्याचे दिसून येते. मतपेटीचे बटण दाबताना शेतकऱ्यांनी हमीभाव, गावातील कामे, संपर्काला चांगला कोण असे विविध मुद्देदेखील डोळ्यासमोर ठेवले आहेत.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निवडणुका होत नाहीत...
नागपूरच्या काटोल भागातील कचारी सावंगा येथील कापूस उत्पादक शेतकरी अनंत भोयर हे शेतात न जाता आधी मतदान केंद्रावर गेले. मतदान केल्यानंतर ते पुन्हा शेतात आले व कापूस वेचणीची कामे आटोपून गव्हासाठी शेत तयार करण्याच्या कामात दिवसभर मग्न होते. ते म्हणाले, “शेती आणि पर्यावरणविषयक जागरूक असलेल्या पक्षाला मी मतदान केले.
दुर्देवाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निवडणुका होताना दिसत नाहीत. पैसे वाटप, मारहाण, दारूच्या पार्ट्या अशा विविध घटना पाहून व ऐकून आम्ही शेतकरी व्यथित होतो. त्यामुळे अनेकदा पक्षाऐवजी उमेदवाराचे चारित्र्य पाहून मतदान करण्याकडे कल वाढतो.”
मतदान करताना संभ्रमात नव्हतो...
बीडच्या गेवराई तालुक्यातील रुई गावचे कापूस उत्पादक शेतकरी सर्जेराव खारवडे यांनी यंदा जागरूकपणे मतदान केल्याचे सांगितले. “आम्हाला ‘अॅग्रोवन’च्या माध्यमातून कोणता पक्ष शेती आणि शेतकऱ्यांसाठी काम करीत असल्याचे कळत होते. त्यामुळे मतदान करताना मी संभ्रमात नव्हतो. लोकसभेप्रमाणेच यंदाही शेतकऱ्यांनी मतपेटीतून आपला राग काढला आहे हे मात्र नक्की,” असे श्री. खारवडे यांनी सांगितले. सकाळपासून गावात मतदानासाठी गर्दी असल्यामुळे श्री. खारवडे दुपारी मतदानाला गेले. त्यानंतर कापूस वेचणीच्या कामासाठी शेतात निघून गेले.
आमची थट्टा सुरू आहे...
धुळ्याच्या शिरुड गावात सहा एकर शेती असलेल्या निंबा त्र्यंबक मराठे हे सकाळी सात वाजताच मतदान केंद्रावर पोहोचले. “कष्टाने पिकवलेल्या शेतीमालाला भाव दिला जात नाही. आम्ही ओरडतो तरी कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे सकाळी मी रागाच्या भरात मतदान केंद्रात गेलो आणि माझा राग मतपेटीतून व्यक्त करून आलो आहे. बियाणे, खते, कीटकनाशकांचे भाव वाढले आहेत. मजुरी वाढली; मात्र कष्टाच्या मोबदल्यात शेतीमालाचे भाव वाढलेले नाहीत. आमची थट्टा सुरू आहे. त्यामुळे माझ्यासह बहुतेक शेतकऱ्यांनी रागातच मतदान केले आहे,” असे श्री. मराठे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी धावणारा माणूस पाहून मतदान...
कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील दूध उत्पादक पट्ट्यातील सावर्डे पाटणकर गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी सकाळी मतदानाला जाण्यापेक्षा आधी धारा काढण्यास प्राधान्य दिले. दूध काढून सोसायटीकडे दूध पोहोचवून शेतकरी लगबगीने मतदानाला गेले. गावातील शेतकरी सुरेश श्रावण मोरे म्हणाले, की सकाळी प्रथम मी १४ जनावरांची धार काढली. शे-सव्वाशे लिटर दूध आधी सोसायटीला पोहोचवले आणि नंतर मतदानाला गेलो. मतदान करताना मी पक्ष किंवा बाकीची काहीही माहिती पाहिली नाही. त्याऐवजी शेतकऱ्याच्या अडीअडचणीला धावून जाणारा माणूस कोण हे पाहून मतदान केले.
आपापल्या परीने मतदान...
पुण्याच्या मुळशी तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या धामणओहोळ येथील शेतकरी सुभाष नथू काळे शेतीच्या कामानिमित्ताने सकाळी शहरात आले होते. “गावात माझी चार एकर शेती आहे. दुपारनंतर मी लगबगीने गावाकडे गेलो आणि मतदान केले. आमच्या भागात गेल्या १५ वर्षांपासून तालुक्याबाहेरचा उमेदवार निवडून येतो. तो कामेही चांगली करतो. यंदा मात्र तालुक्याचा उमेदवार उभा होता. त्यामुळे तालुक्याबाहेरच्या माणसाला मत द्यायचे की आपल्या भागातील माणसाला, असा प्रश्न आमच्यापुढे होता. त्यामुळे ज्याने त्याने आपल्यापरीने मतदान केले,” अशी मनमोकळी प्रतिक्रिया श्री. काळे यांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.