Sugarcane  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Production : सांगली जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात २७ हजार हेक्टरने घटीची शक्यता

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात यंदा अपुरा पाऊस आणि पाण्याची टंचाई याचा फटका ऊस लागवडीला बसला आहे. पुढील हंगामासाठी गाळपाला जाणाऱ्या उसाची लागवड १ लाख ८ हजार ८४९ हेक्टरवर झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा २७ हजार ३९ हेक्टरने उसाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे.

जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. तसेच दुष्काळी पट्ट्यातही परतीचा आणि मॉन्सूनोत्तरी पावसाने हजेरी लावली. यामुळे उसाच्या क्षेत्रात वाढ झाली होती. गतवर्षी १ लाख ३५ हजार ६८८ हेक्टरवर लागवड झाली होती. मात्र, यंदा उन्हाळी पाऊस झालाच नाही. तर मॉन्सूनच्या पावसाने उशिरा सुरुवात केली. परंतु ऊस लागवडीसाठी पुरेसा पाऊस झाला नसल्याने शेतकरी चांगल्या पावसाची प्रतीक्षा करत होते.

जुलैमध्ये पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिसाला मिळून शेतकरी ऊसलागवडीसाठी पुढे आले. त्यामुळे आडसाली हंगामात ३७ हजार २६३ हेक्टरवर उसाची लागवड झाली. त्यानंतर पावसाने दडी मारली. परिमाणी शेतकऱ्यांनी ऊस लागवड करण्याचे थांबवले. त्यातूनही उपलब्ध पाण्यावर ऊस लागवड केली. परंतु लागवडीस गती नव्हती.

दरम्यान, विहीर, कूपनलिकांच्या पाण्याच्या पातळीत घट होऊ लागली. जिल्ह्यातील उपसा सिंचन योजना सुरू झाल्या. परंतु कृष्णा नदी सातत्याने कोरडी पडत असल्याने आवर्तन सुरळीत चालवण्यासाठी अडचणी आल्या. त्यामुळे ऊसलागवड केली तर पाणी कसे उपलब्ध करायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडल्याने पूर्व हंगामातील ऊसलागवड करण्याबाबत शेतकऱ्यांनी धाडस केले नाही. त्यातच दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यात प्रामुख्याने सुरू हंगामातील उसाची लागवड केली जाते. सुरू हंगामातील ऊसलागवड अंतिम टप्प्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर ऊस पिकाची लागवड केली असून सध्या आडसाली हंगामातील ऊस पिकात भरणीची कामे पूर्ण झाली आहे. ऊस पीक वाढीच्या अवस्थेत आहे. परंतु पाणी कमी पडत असल्याने त्याचा परिणाम ऊस वाढीवर होत असल्याचे चित्र आहे. गतवर्षी १ लाख ३५ हजार ६८८ हेक्टरवर उसाची लागवड झाली होती. यंदाच्या हंगामात १ लाख ८ हजार ८४९ हेक्टवर झाली आहे. मात्र, अपुरा पाऊस, पावसाचा खंड आणि पाण्याची कमतरता याचा साऱ्या फटका ऊस लागवडीला बसला असून यंदा २७ हजार ३९ हेक्टरने उसाचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय ऊसलागवड (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका क्षेत्र

मिरज २०४०७

जत ५०२४.७

खानापूर ११५९३

वाळवा २२९८३

तासगाव ९९३९

शिराळा ८५२०

आटपाडी ११०४.९

कवठेमहांकाळ ३२०१

पलूस १०७४२

कडेगाव १५१३५

एकूण १०८६४९

हंगामनिहाय क्षेत्र

आडसाली ३७२६३.८

पूर्व हंगाम १८७५१.५

सुरू हंगाम १११४०

खोडवा ४१४९४.५

एकूण १०८६४९.८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT