Agriculture Ecosystem Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Ecosystem : जगाचा गोल शेतकरी आणि स्त्रीयांच्या हातांवर

अमर हबीब

एक अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो. तुलसीदास (Tulsidas) म्हणाले होते, ‘‘ढोल, गँवार, शुद्र, पशु, नारी, यह सब है ताडन के अधिकारी।’’

यात ते काय म्हणतात, ते आपण बाजूला ठेवू. आपल्याला ढोल, गँवार, शूद्र, पशू, नारी हे सर्व घटक सर्जक आहेत हे समजावे लागेल.

ढोल म्हणजे कलावंत, गँवार किंवा शूद्र म्हणजे शेतकरी (Farmer), पशू म्हणजे जनावरे (Animal), आणि नारी म्हणजे स्त्री (Women) हे सर्व घटक सर्जक आहेत.

सर्जक म्हणजे काय? सर्जक म्हणजे नव्या गोष्टीला जन्म देणारे शेतकरी एक दाणा पेरतो. त्यातून शंभर दाणे निर्माण होतात.

ते शंभर दाणे पेरले तर हजारो दाणे जन्म घेतात. ही प्रकिया सर्जनाची आहे. अशीच प्रक्रिया प्राण्यांत घडते आणि स्त्रियांत घडते. म्हणून तेही सर्जक.

जगाचा गोल कोणी तोलला आहे, असा एक सनातन प्रश्न आहे. शेषाच्या शिरावर पृथ्वीचा गोल आहे अशी कल्पना पुराणांत केली गेली. ती आता कालबाह्य झाली आहे.

औद्योगिक क्रांतीनंतर जेव्हा डावे मोठ्या प्रमाणात लिहू लागले होते, तेव्हा ते म्हणाले, ‘‘जगाचा गोल कामगारांच्या तळहातावर तोलला आहे.’’ खरेच कामगारांच्या तळहातांवर जगाचा गोल तोलला गेला आहे का?

जगाचा गोल कोणी तोलला आहे, याची कल्पना करायची असेल तर साधा प्रश्न आपल्या मनाला विचारा. कोण नष्ट झाले तर जग नष्ट होऊन जाईल? जेव्हा औद्योगिक कामगार अस्तित्वातच नव्हते तेव्हादेखील हे जग अस्तित्वात होते.

कामगार नसल्यामुळे जग नष्ट होत नाही. इतर घटकांचा विचार करून पाहा. डॉक्टर, वकील, शिक्षक, सरकारी कर्मचारी, राजकीय पुढारी इत्यादी. उत्तर मिळेल, ‘नाही’.

काही फारसा फरक पडणार नाही. पण विचार करा- एके दिवशी सगळे शेतकरी नष्ट झाले तर? काय खाणार? खायला अन्न आणणार कोठून? दगड, कोळसा किंवा लोखंड खाऊन पोट भरत नसते.

माणसाला जगण्यासाठी अन्नच खावे लागते व ते पिकवितो शेतकरीच. तुम्हांला किंवा मला शेतकरी झाल्याशिवाय मानवजात वाचवता येणार येणार नाही.

म्हणून पहिला घटक शेतकरी आहे. आणि जगातील सर्व स्त्रिया संपुष्टात आल्या तर? नवीन जनन होणार नाही व हळूहळू मानवजात नष्ट होऊन जाईल.

हे दोन घटक सर्वांत जास्त महत्त्वाचे आहेत. म्हणून मी म्हणतो की, जगाचा गोल दोन हातांवर तोलला आहे- एक शेतकऱ्यांचा आणि दुसरा हात स्त्रियांचा आहे.

लक्षात घ्या, हेच दोन घटक आज सर्वांत जास्त संकटात आहेत. शेतकरी आत्महत्या करतात आणि स्त्रियांची भ्रूणहत्या होत आहे. एकाच काळातील या घटना आहेत.

या दोन्ही घटकांत एकच साम्य आहे. दोघे सर्जक आहेत. कोणत्याही जाती-धर्माच्या संघटनेच्या नेत्याला विचारा, ‘‘तुझ्या जाती-धर्मात सर्वांत जास्त वाईट परिस्थिती कोणाची आहे?’’ एकसारखेच उत्तर मिळेल- ‘‘शेतकरी आणि स्त्री!’’ सगळ्याच जाती-धर्मांत जर शेतकरी आणि स्त्री समान संकटात असतील तर आपसांत का भांडत बसता? त्यांची परिस्थिती सुधारेल असे काही करा.

वर्णसंघर्ष खोटा आहे; फसवा आहे. आपल्या जाती-धर्माचा आडत्या जास्त भाव देत नसतो. शेतकऱ्यांचा गळा कापायला आणि स्त्रियांचा छळ करायला सगळेच टपलेले असतात.

वर्गसंघर्षदेखील खोटाच. ज्यांचे हितसंबंध शेतीत नाहीत ते सगळे एक होतात. कच्चा माल कारखानदाराला स्वस्त हवा असतोच. कामगारांनादेखील स्वस्त अन्नधान्य हवे असते. शेतकऱ्याला लुटायला ते कमी करीत नाहीत.

खरा संघर्ष आहे, सर्जक आणि भक्षक यांच्यात. सारी व्यवस्था सर्जकांना लुटायला बसली आहे. छळायला बसली आहे. त्याविरुद्ध ग्रामीण साहित्याने ‘एल्गार’ पुकारला पाहिजे. हीच काळाची गरज आहे.

‘इडा-पिडा टळो, बळीचे राज्य येवो!’

(बीड जिल्ह्यातील, अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर गावात 21 व 22 जानेवारी रोजी झालेल्या मृदगंध साहित्य संमेलनाचे संपादित अध्यक्षीय भाषण.)

सौजन्यः साप्ताहिक साधना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soymeal Export : भारतातून सोयापेंड निर्यात मागील ५ महिन्यात दुप्पट; तेलबिया पेंड निर्यात घटली

Sugar Ordinance : साखर अध्यादेश धोरणात्मक बदलात शेतकरी बेदखल, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे मागणी

Animal Care : जनावरे का होतात लठ्ठ?

PM Aasha Yojana : कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनाला चालना देणाऱ्या 'पीएम आशा योजने'ला केंद्राची मंजुरी

Soybean Cotton Anudan : सोयाबीन कापूस अनुदानाची कृषिमंत्री मुंडेंनी मिरवली शेखी; शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT