Woman Impowerment Agrowon
ॲग्रो विशेष

Woman Impowerment : महालक्ष्मी समूहाच्या घोंगडीचा राज्यभर लौकिक

Team Agrowon

कृष्णा जोमेगावकर

Ghongdi Production : कुंटूर (ता. नायगाव, जि. नांदेड) येथील महालक्ष्मी महिला स्वयंसाह्यता समूहाच्या महिलांनी एकत्र येत लोकरीपासून घोंगडी निर्मितीला सुरुवात केली. घोंगडीसह या महिला आसनपट्या, मफलर, जॅकेट, टॉवेलपट्टी तयार करून विक्री करतात. या गटाला ‘उमेद'कडून राज्यभरातील बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

नायगाव तालुक्यातील कुंटूर हे बाजारपेठेचे गाव. या गावात १,२७८ कुटुंबांपैकी धनगर समाजाची १२० कुटुंबे आहेत. या समाजाचा मुख्य व्यवसाय मेंढी, शेळीपालन आणि शेती हा आहे. या १२० कुटुंबाकडे सुमारे चार हजार मेंढ्या आहेत. या मेंढ्यांपासून मिळणाऱ्या लोकरीपासून महिला पारंपरिक पद्धतीने घोंगडी बनविण्याचे काम करतात. या महिलांनी पूरक उद्योगाच्या दृष्टीने २०१० मध्ये महिला बचत गटाची स्थापना केली. दरमहा बचत देखील सुरू केली. या गटाला पहिल्यांदा अंगणवाडीमध्ये खाऊ वाटपाचे काम मिळाले होते.

स्वयंसाह्यता समूहाची स्थापना ः
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत गावातील समूह संसाधन व्यक्ती रेखा अनिल कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली २ मे २०१९ रोजी अकरा महिलांनी एकत्र येत महालक्ष्मी स्वयंसाह्यता समूहाची नोंदणी केली. या समूहाचे महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये खाते उघडण्यात आले. या अभियानांतर्गत महिलांनी दर महिन्याला शंभर रुपये बचत करण्यास सुरुवात केली.

उमेद अभियानातून महिलांना बैठक अहवाल, बचत नोंदवही, रोख पुस्तिका, वैयक्तिक पासबुक, समूहाचे अहवाल आदी साहित्य देण्यात आले. समूहामध्ये म्हाळसाबाई भाऊराव वड्डे (अध्यक्षा), गंगाबाई धोंडीबा महादाळे (सचिव) आणि सदस्या म्हणून संगीता राजू महादाळे, शिवनंदा चांदू आंबटवाड, अहिल्याबाई माधव शेट्टे, चोउत्राबाई मल्लू संभाडे, अंजनाबाई नागोराव देवदे, कलावतीबाई माणिका देवदे, मोहणबाई आनंदा डोके, रुक्मीनबाई चंदर देवघरे आणि राधाबाई विठ्ठल बहिरे कार्यरत आहेत.

स्वयंसाह्यता समूहाची स्थापना झाल्यानंतर पहिल्या तीन महिन्यांत ‘उमेद'कडून पंधरा हजार रुपये खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यात आले. यानंतर २०२० मध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून पन्नास हजार रुपयांचे कर्ज गटाला मिळाले. यातून घोंगडी बनविण्यासाठी लागणारे साहित्य, लोकर, इतर कच्चा माल खरेदी करण्यात आला.

यामुळे घोंगडीच्या व्यवसायाला चालना मिळाली. घोंगडी विक्रीतून झालेल्या बचतीमधून समूहाने बँकेचे कर्ज परत केले, यामुळे पुन्हा बँकेने पन्नास हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले. यातून व्यवसायाला बळ मिळाल्याचे समूहाच्या सचिव गंगाबाई महादाळे यांनी सांगितले.


विविध प्रकारच्या घोंगडीची निर्मिती
समूहातील महिलांकडे असणाऱ्या मेंढ्यापासून वर्षांतून दोनवेळा लोकर उपलब्ध होते. त्यापासून विविध आकाराच्या घोंगड्यांची निर्मिती केली जाते. जसजशी मागणी वाढेल त्याप्रमाणे मेंढीपालन करणाऱ्यांच्याकडून लोकरीची खरेदी केली जाते. घोंगडी निर्मितीसाठी काळी लोकर, पांढरी लोकर आणि मिश्र रंगातील लोकर उपलब्ध होते.

या लोकरीला मारतळा (ता. लोहा) येथील केंद्रामधून स्वच्छ करून आणले जाते. यानंतर महिला पेळू बनविण्याचे काम करतात. पेळू बनविल्यानंतर विणकरांच्याकडून घोंगडी विणून घेतली जाते. एक घोंगडी बनविण्यासाठी तीन किलो लोकर, दीड किलो चिंचोक्याची खळ, दोनशे ग्रॅम वूलन आदी साहित्य लागते.

समूहाच्या माध्यमातून दर्जेदार घोंगड्यांची निर्मिती केली जाते. यात काळी, पांढरी, भुरकट पांढऱ्या रंगामध्ये घोंगडी उपलब्ध आहे. तीन फूट रुंद आणि दहा फूट लांब आकारामध्ये घोंगडी तयार केली जाते. घोंगडी निर्मितीसाठी वापरण्यात येणारे लोकर उच्च दर्जाची असल्याने चांगली मागणी असते. लोकरीपासून सिंगल आणि लांब आकाराची आसनपट्टी, मफलर, जॅकेट, टॉवेलपट्टी देखील तयार केली जाते.

समूहातील महिलांना दैनंदिन कामाचे वाटप करण्यात आले आहे. म्हाळसाबाई वड्डे आणि गंगाबाई महादाळे या विविध ठिकाणी घोंगडी विक्रीचे काम करतात. गटातील नऊ महिला मेंढीच्या लोकरीचा पेळू तयार करतात.

समूहातील सर्वच सदस्या वेगवेगळे काम करतात. यामुळे कामाचा ठरावीक मोबदला कोणी घेत नाही. मात्र उत्पादन खर्च वजा जाता शिल्लक नफा सर्व सदस्यांना वाटून दिला जातो. एक घोंगडी बनविण्यासाठी आठशे ते १५०० रुपयांपर्यंत उत्पादन खर्च येतो. रंगानुसार ही घोंगडी बाजारपेठेत दीड हजारांपासून ते तीन हजार रुपयांपर्यंत विकली जाते, असे गंगाबाई महादाळे सांगतात.

राज्यभर उत्पादनांना मागणी ः
महालक्ष्मी महिला स्वयंसाह्यता समूहाच्या महिलांनी बनविलेल्या विविध प्रकारच्या घोंगड्यांना महाराष्ट्राच्या अनेक भागांत मोठी मागणी असते. पांढऱ्या लोकरीपासून बनविलेल्या घोंगडीला तीन हजार रुपये दर मिळतो. काळ्या तसेच भुरकट पांढऱ्या रंगाच्या घोंगडीला दीड ते अडीच हजारांचा दर मिळतो. जॅकेट सहाशे रुपये, आसनपट्टी आकारानुसार दीडशे, दोनशे आणि चारशे रुपये, मफलर ३०० रुपये आणि टॉवेलपट्टीची २५० रुपये या प्रमाणे विक्री होते.

नांदेड जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या आठवडे बाजारात घोंगडी विक्री केली जाते.
वाशी, नवी मुंबई येथे महालक्ष्मी सरस प्रदर्शनात या समूहाने विविध उत्पादनांच्या विक्रीतून एक लाख ६० हजार रुपये, सिल्लोड प्रदर्शनात ८० हजार रुपये, मुंबईमधील मंत्रालयात ८५ हजार रुपये आणि माळेगाव (ता. लोहा) यात्रेत ९० हजार रुपयांची उलाढाल केल्याची माहिती अध्यक्षा म्हाळसाबाई वड्डे यांनी दिली.

‘उमेद’कडून मार्गदर्शन...
उमेद अभियानातून महिला समूहाची नोंदणी झाल्यानंतर समूह संसाधन व्यक्ती रेखा कांबळे यांनी महिलांना वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे. विविध स्तरांवर प्रशिक्षण, भेटी आदींच्या माध्यमातून महिलांना त्यांच्याकडे असलेल्या लोकरीपासून घोंगडी बनविण्यासाठी प्रोत्साहित केले.

तयार झालेल्या घोंगड्यांना विक्रीसाठी विविध प्रदर्शनांमध्ये विक्री स्टॉल उपलब्ध करून दिले जातात. हातमागावर बनविलेली घोंगडी, आसनपट्या, मफलर, टॉवेलपट्टी, जॅकेटची विक्री मुंबई, सिल्लोड, नांदेड आदी ठिकाणी बाजारपेठेतदेखील केली जाते.
----------------------------------------------------------------
संपर्क ः रेखा कांबळे (समूह संसाधन व्यक्ती), ९६३७५१६८३३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : लातूर जिल्ह्याला अतिवृष्टीची भरपाई मंजूर

Buffalo Conservation : वारणाच्या जातिवंत म्हैस संवर्धन, पैदास योजनेतून म्हशी वितरणास प्रारंभ

Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

Crop Insurance : विमा कंपनीला पीक नुकसानीच्या सव्वा लाख पूर्वसूचना

Crop Loan : खानदेशात पीककर्ज वितरणात राष्ट्रीय बँका मागे

SCROLL FOR NEXT