- ज्योती आधाट/तुपे
Women Self Reliance : स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यांसाठीही जगता यायला हवं. कारण दुसऱ्यांसाठी जगताना आपल्या मनाला एक प्रकारचे समाधान मिळत असते. इतरांच्या आनंदात आपला आनंद मानणारी अनेक जण पळायला मिळतात. पण अशी माणसे खूप कमी वेळा एकत्र येतात. असाच एक परिवार आहे. सहसंवेदना महिला सक्षमीकरण (Women Empowerment) परिवार. या परिवारामार्फत होतकरू विद्यार्थिनींचा, युवतींचा, विधवा महिलांचा, गरजू महिलांचा शोध घेतला जातो.
अशा महिलांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्या स्वावलंबनासाठी त्यांना एक सकारात्मक साथ सुरुवातीला दिली जाते. त्यांचे मनोधैर्य वाढवले जाते नंतर त्यांना शिलाई मशीन, पिको मशीन अथवा इतर उपयोगी वस्तू दिल्या जातात, की ज्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह भागवला जाईल. हे सगळं करताना सर्व महिलांचा स्वाभिमान जपला जातो. त्यांचे नाव, फोटो ग्रुप सोडून इतर कुठेही शेअर केले जात नाहीत.
कारण त्यांचा निरागस विश्वास आपल्याकडे खूप आशेने पाहत असतो. आज थोडी उणीव असेल त्यांच्याकडे पण त्या लाचार नसतात. काहीतरी चांगले करण्याची धमक, जिद्द त्यांच्यात पाहायला मिळते. प्रत्येकीकडे एक वेगळे कौशल्य आहे. त्या कौशल्याचा उपयोग त्या स्वतःच्या जीवनात करताना दिसतात.
जाणावया दुर्बलांचे दुःख आणि वेदना
तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना...
विधवांचे प्रश्न वेगळे आणि सधवा महिलांचे प्रश्न वेगळे असतात. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी महिलांसाठी समुपदेशन कार्यक्रमही या परिवारामार्फत घेतले जातात. तसेच त्यांना कामे मिळावीत म्हणून कापडी पिशव्या शिवण्याचा एक लघुउद्योगही चालू आहे. यामुळे पर्यावरण रक्षणाचा संदेशही आपोआप दिला जातो आणि महिलांना रोजगारही मिळतो.
या परिवारामार्फत दरमहा प्रत्येक व्यक्ती २०० रुपये एका सदस्याकडे जमा करते. जमा झालेल्या रकमेतून होतकरू मुलींना शिक्षणासाठी, त्यांच्यातील कला गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी एक वर्षभर किंवा त्यांची गरज ओळखून अधिक काळही दत्तक घेतले जाते. गरजू महिलांना वस्तुरूपात मदत केली जाते.
या परिवारातील सदस्य संवेदनशीलतेच्या धाग्याने गुंफले गेले आहेत. मी मदत करत आहे, अशी भावना किंवा मीपणा कुणाच्या मनात नसतो. ज्यांना मदत करायची त्यांच्यासाठी सर्वानुमते निर्णय घेतला जातो. मदतही सर्वांकडून जाते. त्यामुळे अहंकार ही भावना आपोआप दूर राहते. एकत्रितपणे निर्णय, एकत्रितपणे सर्व कामे करताना मिळणारा आनंद हा खूप वेगळा असतो. दडपणविरहित सर्व काही चालू असते.
संक्रांतींच्या दरम्यान वाण म्हणून या महिलांनी बनवलेल्या पिशव्या परिवारातील सर्व मैत्रिणी एकमेकींना देतात. आणि या विधवा महिलांनाही मोठ्या सन्मानाने वाण दिला जातो. त्यावेळी या भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप मोठा असतो. त्याची तुलना कशातही करता येणार नाही.
आरोग्यावर, वाचनावर, शिक्षणावर तसेच अनेक महत्त्वपूर्ण घटकांवर परिवारात महिला युवती संवादामार्फत चर्चा घडवून आणली जाते. यातून अनेकींना प्रेरणा मिळते. मुली व महिलांचे आरोग्य, शिक्षण आणि स्वावलंबन यावर या परिवारात अधिक भर दिला जातो. प्रत्यक्ष भेटीतून अनेकांच्या समस्या या परिवारामार्फत सोडवल्या जातात.
जीवनाच्या प्रत्येक वळणावर एक सुखद थांबा असतो. फक्त तेव्हा थोडं त्या थांब्यावर विसावता यायला हवं. प्रत्येकीनं ठरवलं तर आज प्रत्येक स्त्री सन्मानानं आणि धाडसानं जीवन जगू शकते. सतत धाव धाव धावताना थोडा विसावा घेऊन आपल्यासोबत इतर मैत्रिणींनाही घेऊन जाता यायला हवं. एकट्यानं शर्यत जगण्यात मजा नसते हे आपल्याला उबुंटु शिकवते. उबुंटुची गोष्ट आपल्या माहितीच आहे. आफ्रिकेतील ‘झुलू’ भाषेतील शब्द ‘उबुंटू’ या शब्दाचा अर्थ ‘‘I am beacuse We are.’’ म्हणजेच ‘‘मी आहे कारण आम्ही आहोत.’
’ शांतीदूत नेल्सन मंडेला यांच्यामुळे जगाला कळलेला एक सुंदर शब्द. आफ्रिकेतील ही गोष्ट आहे. गोष्ट छोटी पण यातून महानत्व शिकायला मिळालं. अन्नासाठी होणारी स्पर्धा आणि धडपड त्यांना पाहायची होती. स्पर्धेमध्ये ठरावीक अंतरावर पाटी ठेवली मुले जमा झाली आणि स्पर्धेला सुरुवात झाली. घडले ते अनपेक्षितच अन्न मिळवण्याच्या स्पर्धेसाठी न धावता त्या सर्व मुलांनी एकमेकांचे हात धरले व ती मुले एकत्र त्या फळाच्या पाटीजवळ पोहोचले व मोठ्याने ओरडले ‘उबुंटू’ व मिळून फळे खाल्ली.
या छोट्या मुलांनी जगण्याची एक मोठी रीतच जगाला शिकवली. ‘मी’ च्या ऐवजी ‘आम्ही’ या संकल्पनेवर या छोट्यांनी मोठा भर दिला आणि खरोखरच सध्या आपल्याला I पेक्षा We ची गरज जास्त आहे. आणि या उबुंटु प्रमाणेच या सहसंवेदना परिवारात प्रत्येक कृती, उपक्रम केले जातात. उद्देश एकच जीवन जगताना सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जायचं. एकट्याने पुढे जाण्यात मजा नाही.
सहसंवेदना महिला सक्षमीकरण परिवारातील प्रत्येक व्यक्ती तितक्याच जबाबदारीने वागणारी आणि निःस्वार्थ भाव जपणारी आहे. चला तर मग आपलाही असाच एखादा परिवार बनवुया आणि सर्वांसोबत देशाची प्रगती करुयात
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.