Agriculture Land Agrowon
ॲग्रो विशेष

Land Dispute : गावकऱ्यांचा डाव

Agriculture Land : कधी कधी गावांमध्ये अशा काही घटना घडतात की त्यामध्ये एकट्या दुकट्या माणसाचा समावेश नसतो तर अनेकांचा या घटनेमागे हात असतो.

शेखर गायकवाड

Agriculture Land Issue : कधी कधी गावांमध्ये अशा काही घटना घडतात की त्यामध्ये एकट्या दुकट्या माणसाचा समावेश नसतो तर अनेकांचा या घटनेमागे हात असतो. आजची गोष्ट अशीच असून एका मोठ्या गावामध्ये सदानंद नावाच्या शेतकऱ्याने आपल्या सव्वाशे एकर जमिनीपैकी सुमारे ४० एकर जमीन १९५१ मध्ये गावामध्ये शाळा काढण्यासाठी म्हणून दान दिली. त्या काळामध्ये शाळा कमी होत्या आणि मुलांना किमान दहा ते पंधरा किलोमीटर शाळेमध्ये जाण्यासाठी पायी जावे लागत असे. सर्व गावकऱ्यांनी मिळून सदानंदला गळ घातली आणि या माळरान जमिनीत काही पिकत नाही. जर थोडी जमीन दिली तर गावातल्या मुलांचे कल्याण होईल, असे सांगून सदानंदला जमीन दान देण्याची विनंती केली.

सदानंदने सुद्धा गावकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन चाळीस एकर जमीन शाळेसाठी दान दिली. ही जमीन देताना एका मोठ्या शिक्षण संस्थेला देण्यात आली जेणेकरून शिक्षण संस्थेने गावामध्ये एक मोठे हायस्कूल काढावे. त्यानुसार संस्थेने दोन वर्षांमध्ये या जागेवर शाळेची सुंदर इमारत बांधली. सदानंदचा त्यानिमित्ताने गावासमोर नागरी सत्कार करण्यात आला. दरवर्षी १५ ऑगस्टला सदानंदला शाळेमध्ये बोलावले जाई आणि त्याच्याबद्दल चार चांगले शब्द गावकरी बोलत असत. शिक्षण संस्थेने या जागेवर मुलांना खेळण्यासाठी मैदान व शाळेची इमारत उभी केली. तब्बल ४०-५० वर्ष मैदान आणि शाळेची इमारत वगळता जवळजवळ २२ एकर जमीन तशीच पडीक पडली होती. पुढे गावकऱ्यांनी गावातल्या ग्रामदैवताच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. १९९० नंतर ग्रामदैवताची मोठी यात्रा भरू लागली होती.

आता गावामध्ये अनेक तरुण मंडळी झाली होती आणि वर्गणी सुद्धा जास्त गोळा होऊ लागली. गावातली अनेक मुले पुणे मुंबईला नोकरीला लागली आणि गावामध्ये पैसा खेळू लागला. दरवर्षी यात्रेसाठी लोक जमले की गावाच्या विकासाचे नवे नवे प्लॅन आखले जाऊ लागले. तालुक्यातली एक नंबरची यात्रा आपल्या गावात भरवायची असा काहींनी मनोदय व्यक्त केला. मध्येच एका सरपंचांनी २००० मध्ये ग्रामदैवताची मोठी यात्रा भरवताना पाळणे, तमाशा, खाण्याचे स्टॉल इत्यादी उभारून प्रचंड पैसा निर्माण करता येईल व त्याचा फायदा गावाला पण होईल आणि मंदिराच्या कडेने सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी सुद्धा होईल असा मनोदय व्यक्त केला. गावातल्या उपसरपंचाने शाळेची पडून राहिलेली २० एकर जमीन आपण दरवर्षी यात्रेला घेतली तर मोठी यात्रा भरवता येईल, असा विचार मांडला. अर्थातच शाळेच्या मुख्याध्यापकांनी आणि काही जुन्या जाणत्या माणसांनी याला विरोध केला. शाळेला जमीन दान दिलेल्या सदानंदचा मुलगा गुरुनाथ यांनी सुद्धा या प्रस्तावाला कडाडून विरोध केला.

माझ्या वडिलांनी ही जागा शाळेसाठी दान दिली आहे. तिचा बाजार करून तुम्हाला पैसे मिळवता येणार नाहीत, असे काहीतरी सांगण्याचा त्यांने प्रयत्न केला. परंतु गावकऱ्यांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून चार-पाच दिवसांचा प्रश्न असल्यामुळे शाळेने सहकार्य करावे. त्याच्या बदल्यात शाळेला या पैशातून रंग देऊ असे सांगितले. पहिल्या वर्षी अशा पद्धतीने देवाण-घेवाण करून शाळेच्या जागेवर यात्रा भरली. दहा वर्षांमध्ये या यात्रेने प्रचंड मोठे स्वरूप धारण केले. गुरुनाथ मात्र एकटाच या सगळ्या प्रकाराला विरोध करत होता. त्याने जिल्हाधिकाऱ्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांना अर्ज देऊन ज्या कामासाठी जमीन दान दिली आहे, त्यासाठी ही शाळा वापरत नसल्यामुळे आम्ही दान केलेली जमीन आम्हाला परत मिळावी अशी मागणी केली.

त्या उलट गावकऱ्यांनी सुद्धा गुरुनाथच्या विरोधात एक एक डाव टाकायला सुरुवात केली. ज्या मुख्याध्यापकांचा जागा देण्याला विरोध होता त्यांची सर्वप्रथम बदली करण्यात आली. दोन जुने शिक्षक जे शाळेच्या जागेवर यात्रा भरवायला विरोध करत होते त्यांच्या पण लांबच्या गावात बदल्या करण्यात आल्या. थोड्या दिवसांनी ग्रामदैवताला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला. काही दिवसातच गावामध्ये इंग्रजी माध्यमाची दुसरी शाळा काढण्याची टूम निघाली. ही शाळा सुरू झाल्यावर गावच्या हायस्कूलमधले विद्यार्थी कमी झाले. हळूहळू शाळेला अवकळा येऊ लागली. जिल्हा परिषद सदस्यांनी त्या शिक्षण संस्थेमध्ये जाऊन एवढे विद्यार्थी कमी झाले आहेत तर या हायस्कूलऐवजी आम्हाला तंत्र विद्यालय द्यावे, अशी मागणी केली. पुढच्या दहा वर्षांमध्ये गावातले हायस्कूल बंद झाले आणि तंत्र विद्यालय सुद्धा सुरू झाले नाही. हायस्कूल बंद झाल्यानंतर दान दिलेली जागा आता सार्वजनिक म्हणजे गावाच्या मालकीची झाली आहे आणि ती ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्यावी अशी अधिकृत मागणी गावकऱ्यांनी केली.

अशा पद्धतीने ३०-४० वर्षांमध्ये या गावात गुरुनाथच्या वडिलांची जमीन पण गेली होती आणि आता तिथे हायस्कूल पण

राहिले नव्हते. आपण एखादी गोष्ट ठरवली की ती ३०-४० वर्षांनंतर कोणत्या वळणावर

जाईल, हे आजकाल सांगणे प्रचंड अवघड झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Politics : जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र; ६ आमदार साखर कारखानदार

Maharashtra Cabinet : पश्चिम विदर्भात अकोला, बुलडाण्याला मंत्रिपदाची आस

Vijay Wadettiwar : महायुती जिंकली अभिनंदन! पण, नवे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते? यावर आमचे लक्ष असेल; वडेट्टीवार यांचा इशारा

Sweet Sorghum Ethanol : गोड ज्वारीच्या इथेनॉल खरेदी दराला केंद्र सरकारचा खोडा?

Onion Market : हंगाम बदल, कांदा चाळ अर्थकारणाला चालना मिळेना

SCROLL FOR NEXT