Village Culture Agrowon
ॲग्रो विशेष

Village Culture : गाव, गोतावळा आणि गावकी

Agrowon Diwali Ank : पूर्वपश्‍चिम जाणारा कच्चा रस्ता गावाचे दोन भाग करतो. एक वरची आळी आणि एक खालची. खालच्या आळीचे उंबरे जास्त. वरच्या आळीच्या उशाला दुष्काळात खोदलेले व कडेने मातीचा बांध घातलेले तळे.

Team Agrowon

जयंत खाडे

डांबरी सडकेपासून एक कच्चा रस्ता गावात जातो. मैल दीड मैल अंतराच्या रस्त्यावर दोन्ही बाजूंना बहुतांशी करंज्याची झाडे आहेत. काही तुरळक वस्त्या आणि बाकी सगळी कोरडवाहू जमीन. एखाद्या ठिकाणी विहिरीच्या पाण्यावरील उसाचं नाहीतर हळदीचे हिरवे तळकट आणि वस्तीवर अपूर्वाईने जपलेली आंबा, लिंबू, जास्वंदीची झाडं. बाकी रानातल्या बांधानी निंब, करंज आणि बाभळी. पहिल्यांदा गावठाण लागते आणि पुढे दह्याबाचे देऊळ. देवळाच्या पाठीमागे एक मोठा, जुना पिंपळ आणि त्या भोवती ढासळलेला पार.

पुढे पूर्वपश्‍चिम जाणारा कच्चा रस्ता गावाचे दोन भाग करतो. एक वरची आळी आणि एक खालची. खालच्या आळीचे उंबरे जास्त. वरच्या आळीच्या उशाला दुष्काळात खोदलेले व कडेने मातीचा बांध घातलेले तळे. त्यात परतीचा पावसाचे पाणी जमते आणि मार्गशीर्षात आटते. तळ आटले की गावच्या तिन्ही आडांचे पाणी तळाला जाते. तळ्याच्या वर पिरवाडी, दहा एक उंबऱ्याची. एका कडेला पीराची समाधी, मोडकळीस आलेली.

पिराचा उरूस नव्याच्या पौर्णिमेला भरतो आणि सगळं गाव हरकून जातं. वाडीतून पुढे आमच्या माळाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर एक सार्वजनिक आड आणि त्या शेजारी जुना पिंपळ. खूप जुना आणि जवळचे नाते सांगणारा. आमचे सगळे पूर्वज यावर बसलेत असे वाटते. घरात तसा फक्त दादांचा फोटो आहे. बाकी कुणाला मी पाहिले नाही; पण दिसतात मला जाता येता ते या झाडावर. मजा आहे, एकदा म्हातारं होऊन अवतार संपला की नंतर बसा इथं गावाची, गोतावळ्याची गावकी बघत, अनंतकाळ!

गावात पाहण्यासारखं अथवा सांगण्यासारखं ठिकाण नाही. गावात येतानाचा दह्याबा, खालच्या आळीची अंबाबाई, पिरवाडीतली पिराची समाधी ही श्रद्धेची ठिकाणं. तर संतोषगिरी डोंगरावर बसलेला तो महाराजा, सगळा कर्ता करविता! नाहीतर इनामिन दोन महिने पाणी देणारं तळं, उन्हाळ्यात तळाला गेलेले पाणवठे, पायाची नखं कायमची घालवणारे, उखडलेले, कच्चे आणि फोफाट्याचे रस्ते, अर्धी कच्ची घरं आणि बहुतांशी खरीप हंगामाची शेती...

अशा गावाची कोणाला अपूर्वाई! पाहुण्यारावळ्याकडे जावे तर त्यांच्या गावात बारमाही वाहणारी नदी नाहीतर एखाद्या प्रकल्पाचा पाट पहिला की मग या गावाची खूप चीड येते. उगीच जागेपणी खालतीकडून पाट वाहत गेल्याचे स्वप्न पहायचं. मनातच त्यात उड्या मारीत आंघोळ करायची, जित्रापं धुवायची. पण पुढं हाच बिनपाण्याचा गाव आणि त्यातली काही गुणी, बापडी, पिचलेली तर काही आरबाट, खोडील माणसं मनात घर करून राहणार आहेत.

मधल्या रस्त्याला कमाल भैचे सायकल दुकान आहे. भै पंक्चर काढणे, औट काढणे अशी कामे करत दुकानाबाहेर बसलेले असतात. भाड्याने जाणाऱ्या सायकलीची नोंद कानात ठेवलेल्या पेनाने घेतात. भै सतत तोंडाने पान चघळतात आणि लक्षात येईल तसे तंबाखूची चिमूट बंडीच्या खिशातून काढून तोंडात टाकतात.

तसा भै कलाकार माणूस आहे. जत्रेत नाटकात काम करतात. एकदा नाटकात भै खुर्चीवर बसले आणि खुर्ची मोडली. तर भैनी खाली उतरून धोंड्याने ठोकून खुर्ची दुरुस्त केली आणि बसून पुढे नाटक सुरू केलं. नाटकात भै स्त्री पात्राच्या जवळ जाताच एक ओरडला, भाभी आल्यात बघायला.

रस्त्यावर बस थांब्यावर इमामुद्दिनचे हॉटेल आहे. चहा, शेव चिवडा, भजी तिथं मिळतात. इमामुद्दीन बराच तापट आहे, सारखा ओरडून बोलत असतो. त्याच्या कडे चहापेक्षा पाणी भरून चुळा भरायला लोक जास्त जातात, असे दिसतं. नाहीतर किती लोकांकडे हॉटेलात चहा प्यायची औकात आहे. दुपारी हॉटेलमध्ये कोण नसते पण लोकं आत जाऊन निदान पाणी पिऊन येतात. इमामुद्दिन आमच्या गोंदा तात्यांचा दोस्त आहे. हा चेटूक करतो असे पोरं म्हणतात.

म्हणजे बसमध्ये तो पैसे देत नाही पण मास्तर याला तिकीट देतात. कधी उगीच असली विद्या आपल्याला मिळाल्यावर आपण काय करायचे ते ठरवत बसायचे. म्हणजे हॉटेलात भजी खायची‌, मुंबईपर्यंत प्रवास करायचा, सिनेमा पाहायचा, आणखी काही काही! पण हा माणूस अशी विद्या असूनही भजी तळत का बसतो, पोरांना दिवसभर आडावरून पाणी भरायला का लावतो, हे समजत नाही.

गावात हाताच्या बोटावर मोजण्या इतके बांधीव वाडे आणि घरं. बाकी दगड मातीची, अर्धी कच्ची, काडाने शेकरलेली. जागोजागी गुळभेंडीचे डेरेदार वृक्ष. त्याची पिवळी फुले आणि भोवऱ्यासारखी फळे लहान पोरांना खेळायला पुरतात. बहुतांश लोकांची थोडीफार शेतजमीन. माणसं अठरा पगड जातीची, बैत्याचे व्यवहार करणारी. मोजूनमापून सण साजरा करणारी. ‘ऊठ जिवा लाग कामा’ हा मंत्र म्हणणारी.

संतांची, शिवकालीन मावळ्यांची नावं घेऊन बसलेली. बक्कळ पिकलं तरी न उधळणारी आणि नाही पिकलं तर पर्वा करणारी. ना पंचांग का मुहूर्त पाहणारी. केवळ रानातल्या म्हसोबाला पुजत शेतीकाम करणारी. कधी जास्तच पिचली तर मध्यरात्री उठून पायाला हाताचा तिठा मारून आभाळाकडे बघत बसणारी.

गावात एक मराठी शाळा सरकारी जागेत तर हायस्कूल खासगी आणि पडक्या वाड्यात. मराठी शाळेला मोठे पटांगण, बांधीव इमारत. पोरं शाळेत इमानदारीने येतात, वर्गात बसतात, गुरुजींनी शिकवले तेवढे शिकतात. दुपारच्या सुट्टीत हंगामानुसार बोरं, चिंचा, कैऱ्या विकतात. निकाल लागतात, तोंड पाहून पास-नापास होते, कोणाचा आक्षेप नसतो कारण नापास झाले तरी सातवी नापास, आठवी नापास अशी पदवी मिळतेच. एकच गुरुजी बापाला आणि पोराला लाभतो आणि ते गुरुजी बापाच्या गुणावरून पोराची लायकी ठरवितात.

(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT