Bhimashankar Forest Love Story: भीमाशंकरच्या घनदाट जंगलाकडे जाताना पढरवाडीच्या डोंगरात एक झोपडी लागते. सह्याद्रीपुत्र अमृताचे ते घर आहे. वरसूबाईच्या पर्वतरांगेत १९७२ च्या दुष्काळात अमृता व त्याचा शेतकरी बाप पंजाजी चौधरी उपाशी होते. सरकारनं दुष्काळात रस्त्याचं काम काढलं. तिकडे डोंगरातील पाच हजार लोकं कामासाठी जमली. त्यात अमृतासुद्धा होता. मात्र, बापाने दुष्काळात देह ठेवला. दुष्काळ सरल्यावर अमृताच्या कडेवर कधी कधी एक मुलगी दिसायची. तिचं नाव मंजा. पाकोळ्या डोळ्याची, गोऱ्यापान चेहऱ्याची नाजूक मंजा. तिची अमृता खूप काळजी घेई.
परक्या रानातील लोक अमृताला विचारात की, ‘‘तुझ्या कडेवर ही पोर कोणाची.’’ अमृता लाजून उत्तर देई.. ‘‘आहो, बायकु हाये ही माझी.’’ मिसुरडं न फुटलेल्या नवऱ्याच्या कडेवर बसलेल्या छोट्या बायकोला पाहून लोक हसायचे. ही गोष्ट आहे ५२ वर्षांपूर्वीची. त्यानंतर आता अमृता ७५ वर्षांचा व त्याची जीवनसाथी मंजा ६० वर्षांची झाली आहे. पण, दोघांचा संसार आजही भीमाशंकरच्या रानातल्या रंगीत शेकरू खारीसारखाच सुंदर दिसतो आहे.
डोंगराकाठच्या शेतीत अमृता दिवसभर कष्ट करतो. संध्याकाळी झोपडीत परत येतो. मंजाबाईला त्याला गरम गरम भाकर करून खाऊ घालते. अमृता वारकरी आहे. लहान असताना तो वाडीत धार्मिक नाट्य सादर करीत असे. तो कधी कृष्ण व्हायचा तर कधी राधा होऊन डोंगरवासियांचे मनोरंजन करायचा. आजही अमृताचे सारे शेतकरी चाहते आहेत.
अमृताच्या लग्नाची गोष्ट
त्यावेळी लहान वयात लग्न होत असत. अमृताला त्याच्या घोटावडे गावच्या मामाने आपली मुलगी म्हणजे मंजाबाई लग्न करून दिली. अमृता गरीब असल्याने मामाने मुलगी दिलीच पण भाच्याला संसारासाठी दहा जनावरे, दोन बैल, दागदागिने, पैसेसुद्धा दिले. लग्नानंतर दोघांनी डोंगराच्या कुशीत कष्टाने झोपडी बांधली. अमृता आणि मंजा यांचा जोडा छान जमला. दोघेही हाडाचे शेतकरी आणि विठोबाचे भक्त. दोघे अजूनही शेती काम आटोपून वारीला जातात. डोंगरातल्या झोपडीत दोघांचा संसार फुलला.
त्यांना तीन अपत्ये झाली. एक मुलगी आणि दोन मुले. पहिली मीनाबाई. ती आता डोंगरातल्या पिंपरी गावच्या कोकाटेंच्या शेतकरी घरात नांदते आहे. मुलगा पांडुरंग - तो आठवी शिकला. पांडुरंगाची कष्टावर श्रद्धा आणि तो कमालीचा प्रामाणिक. वाडीतल्या शाळा मास्तरला तो देव मानत असे. मात्र, मास्तर शाळेचे धान्य विकत असल्याचे कळताच पांडुरंगने थेट मास्तरला बडवले आणि कायमची शाळा सोडली. आता तो वायरमन बनला आहे. जमेल तेव्हा तो शेती करतो आणि साऱ्या परिवाराची जिवापलीकडे काळजी घेतो. अमृताचा दुसरा मुलगा श्रीरंग. तो शाळेपेक्षा शेतीत रमला असून शेतीत तो राबराब राबतो. पांडुरंग लोणावळ्यात आणि श्रीरंग शेतीत आहे.
लग्नानंतर अमृता आणि मंजाबाईने दारिद्र्याच्या चिवटपणे सामना केला. पण, दोघांनी शेतीत राबणं सोडलं नाही. आठवण येता दोघेही भीमाशंकरच्या रानात; तर कधी पंढरपूरला जात आणि कधी शंकरच्या तर कधी पांडुरंगाच्या चरणी लीन होत असत. कष्टाने डोंगराकाठी तयार केलेली शेती हळूहळू फुलत असताना एकदा मोठे संकट आले.
जेसीबीसमोर अमृता झाला आडवा
वनखात्याचे पथक जेसीबी घेऊन अचानक अमृताच्या झोपडीसमोर उभे राहिले. वनखात्याने अमृताची प्राणप्रिय झोपडी, शेतीचे बांध तोडण्याचा निर्णय घेतला होता. अमृतावर आभाळ कोसळले. तो तडक जेसीबीसमोर आडवा झाला. ‘‘साहेब, अहो... हे सारं रान आमच्याच बापजाद्यांचं होतं. आमच्या किती तरी पिढ्या या डोंगरात वाढल्या आणि गाडल्या गेल्या. आता तुम्ही या रानातून मला कायमचं हुसकावून उपाशी पाडणार का? त्यापेक्षा माझ्या देहावर तुमचा जेसीबी घाला.’’ अमृताचा तो अवतार पाहून वन कर्मचारी निघून गेले.
मात्र, अमृताच्या शेतात वनखात्याने आता मोठे बुरूज उभारुन हद्द निश्चित केली आहे. तरीही दोघांनी झोपडी, शेती सोडलेली नाही. जशी शेती सोडली नाही तशी माणुसकीसुद्धा या दोघांनी सोडलेली नाही. भीमाशंकरच्या रानात कधी पर्यटक, भाविक चुकतात आणि भरकटतात. अशावेळी अमृता-मंजाबाई त्यांच्या मदतीला धावून जातात. त्यांना झोपडीत नेत खाऊपिऊ घालतात.
संकट स्थितीतून बाहेर आलेल्या भाविकांचे आनंदी चेहरे पाहून अमृता-मंजाबाई खूश होतात. अमृता म्हणतात, ‘‘देवाजवळ आमचं लई मागणं नाही. फॉरेस्टवाल्यांनी ही झोपडी हिसकून घेऊ नये, ती कायम करावी, इतकंच तर आम्ही मागतोय. जगाचं सारं सुख आम्हाला या झोपडीनं दिलं आहे. येथेच या देहालाही शेवटचा विसावा मिळावा, इतकीच माफक इच्छा आहे बघा आमची!’
- श्रीरंग अमृता चौधरी ९१४५००९१२०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.