Turmeric Market  Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Market : हळदीसाठी प्रसिद्ध रिसोडची बाजारपेठ यंदा दरांमध्ये उच्चांकी वाढ

Team Agrowon

गोपाल हागे

Turmeric Crop : वाशीम जिल्हा हळद पिकासाठी प्रसिद्ध आहेच. पण जिल्ह्यातील रिसोड येथील हळदीची बाजारपेठही नावारूपाला आली आहे. चांगले दर देण्यासह चोख व्यवहार, एकाच दिवसात मोजमाप व अन्य सुविधा देत बाजार समितीने विश्‍वासार्हता मिळवली आहे. यंदा तर हळदीच्या दरांनी उच्चांक गाठल्याने शेतकऱ्यांतही उत्साहाचे वातावरण आहे.

वाशीम जिल्हा हळद पिकासाठी विशेषत्वाने ओळखला जातो. दरवर्षी १० हजार हेक्टरपर्यंत या पिकाची लागवड असते. जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीदेखील हळदीसाठी नावारूपाला आली बाजारपेठ आहे. तिची १९५३ मध्ये स्थापना झाली. आजवर येथे प्रामुख्याने सोयाबीनची अधिक उलाढाल व्हायची. सन २०१८-१९ पासून येथे हळद बाजाराला सुरुवात झाली. तेव्हापासून सातत्याने उलाढाल वाढत आहे. यापूर्वी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हिंगोली, वसमत व अन्य बाजारांमध्ये हळद न्यावी लागायची. मात्र त्यांच्यासाठी रिसोडची बाजारपेठ सोयीची झाली आहे. यंदा हळदीच्या दरात तेजीचा काळ सुरू आहे. येथील बाजारात यंदा प्रति क्विंटल कमाल २० हजारांपर्यंत दर मिळाला.

गेल्या तीन- चार वर्षांमध्ये हे दर साडेपाच हजार ते साडेसहा हजारांच्या दरम्यान होते. यंदा १३ हजार ६५० रुपये सरासरी दरांपर्यंत मजल मारली आहे. अद्याप हळदीचे व्यवहार सुरू असून, पुढील काही दिवस ते कायम राहतील. संचालक व व्यापारी पुरुषोत्तम तोष्णीवाल म्हणाले, की मोजमापानंतर शेतकऱ्यांना तातडीने चुकारेही केले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल रिसोड बाजाराकडे अधिक आहे. येथील माल हिंगोली, वसमत, सांगली, इरोळ (तमिळनाडू), नांदेड आदी बाजारांत जातो. नेपाळ, बांगलादेश व अन्य देशांतही निर्यात होते. राज्याच्या विविध भागांत लागवड व उत्पादन कमी तसेच पावसातील नुकसानीमुळे यंदा दराने उसळी घेतली आहे.

रिसोड हळद बाजारपेठ- ठळक बाबी

-सुरुवातीला दर गुरुवारी खरेदी-विक्री व्हायची. शेतकऱ्यांची मागणी वाढल्यानंतर सोमवार व गुरुवार असे आठवड्यातील दोन दिवस व्यवहार. त्यात हिंगोली, सेनगाव, पान कन्हेरगाव, वसमत, सांगली आदी बाजारांतील व्यापारी सहभागी. या स्पर्धेमुळे मालाला अधिकाधिक दर मिळतो.
-माल ठेवण्यासाठी सुसज्ज शेड्‍स. ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे, फिल्टरयुक्त पिण्याचे पाणी आदी सुविधा.
-मालाची त्याच दिवशी खरेदी-विक्री प्रक्रिया व मोजमाप. त्यासाठी आधुनिक इलेक्ट्रॉनिक वजनकाटे.
-हळदीची आवक वाशीम जिल्ह्यासह बुलडाणा जिल्ह्यातील लोणार, मेहकर, लगतच्या मराठवाड्यातून सेलू, मंठा, जिंतूर, जालना या भागांतूनही.
-बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात ९९ गावे. यापैकी बहुतांश गावात हळद उत्पादन.
-बहुसंख्य शेतकरी सेलम वाणाचे उत्पादन घेतात.
-सुपर, गया, मिनी तसेच पावडर असा दर्जा पाहून व्यापाऱ्यांकडून खरेदी.
-हळकुंड स्वरूपाची पॉलिश केलेली हळद विक्रीस.



बाजार समितीतील आवक (क्विंटल) व दर रु. (प्रति क्विंटल)
(प्रातिनिधिक)

वर्ष आवक सरासरी दर
२०१९-२० ४७, २२५ ५६९७
२०२०-२१ ९७, ६०५ ५४३०
२०२१-२२ १,१३, ०३० ६७५०
२०२२-२३ १,६३, ७६७ ६२५०
२०२३ ते आत्तातापर्यंत १,०१२२५ १३,६५०

यंदाची हळद स्थिती

शिरपूर जैन (जि. वाशीम) येथील हळद उत्पादक डॉ. गजानन ढवळे म्हणाले, की मागील तीन चार वर्षे हळदीला प्रति क्विंटल पाच ते आठ हजारांदरम्यान दर होता. यंदा तो तेजीत असल्याची अनेक कारणे आहेत. यंदा सुमारे ३० टक्के लागवड कमी झाली. गेल्या हंगामातील काढणीवेळी सतत पाऊस होता.
बेण्यालाही फटका बसला. मजुरी, निविष्ठांचे दर वाढले. जमा- खर्चाचे गणित जुळत नव्हते. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी पर्यायी पिके निवडली. मी यंदा पाच एकरांत हळद लागवड केली. परंतु
अन्यत्र ती कमी दिसते. त्यामुळे उत्पादन कमी होण्याची चिन्हे आहेत. जागतिक बाजारातही हळदीला मागणी असल्याने दर जास्त मिळू आहेत. दक्षिणेकडील उत्पादन होणाऱ्या राज्यांत पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे तेथील लागवड घटली. देशात एकूणच यंदा हळद उत्पादनात मोठया घटीची चिन्हे आहेत. त्यामुळे दर आणखी किती वाढेल याचा अंदाज बांधणे कठीण आहे.

यंदा मिळाला विक्रमी दर
भर जहागीर (ता. रिसोड) येथील हळद उत्पादक शंकर चोपडे म्हणाले, की आमच्या परिसरात
वीस वर्षांपासून हळदीचे पीक असून, प्रत्येक जण लागवड करतो. माझ्याकडे दरवर्षी चार ते सहा एकरांदरम्यान त्याचे क्षेत्र असते. या पिकात आता लागवडीपासून काढणीपर्यंतचे यांत्रिकीकरण झाल्याने
मेहनत कमी झाली आहे. अन्य पिकांच्या तुलनेत या पिकातून दरवर्षी चांगला पैसा मिळतो असा अनुभव आहे. एकरी किमान ५० हजारांपर्यंत निश्‍चितच मिळकत राहते. दर अधिक मिळाल्यास त्यात
वाढ होते. या वर्षी माझ्या हळदीला विक्रमी साडेपंधरा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. मागील दहा ते पंधरा वर्षांत प्रथमच हळद इतक्या उच्चांकी दराने विकली. पूर्वी आम्ही हिंगोली मार्केटला हळद न्यायचो. आता रिसोडलाच त्याचा बाजार भरत असल्याने सोयीचे झालेले आहे. येथे एकाच दिवसात मोजमाप, इलेक्ट्रॉनिक्स काट्यांमुळे चोख वजन होते.


संपर्क ः विजय देशमुख, ९४०४३४७४८४
(सचिव, रिसोड बाजार समिती)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Cotton Anudan : २६ सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सोयाबीन, कापूस अनुदान जमा होणार; कृषिमंत्री मुंडेंनी दिली माहिती

Agriculture Power Bill : कृषी वीज बिले दुरूस्त करा अन्यथा आंदोलन, इरिगेशन फेडरेशनकडून इशारा

Agriculture Management : पुरातही पिके वाचविणारी ‘एसआरटी’ पद्धत

Agriculture Import Export : आयात-निर्यातीत हवी समयसूचकता

PM Kisan Scheme : पी.एम.किसान योजना; अठराव्या हप्त्यास शेतकरी मुकणार, तेरा हजार खाती आधार लिंकविना

SCROLL FOR NEXT