Soybean Market Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Market : सोयाबीनच्या ‘शेतीमाल तारण’ला ओलाव्याची अडचण

Team Agrowon

Latur News : लातूर : पुढील काळात वाढणाऱ्या भावाचा फायदा शेतकऱ्यांना करून देण्यासोबत त्यांच्या तातडीच्या आर्थिक गरजा भागविण्याच्या हेतूने महाराष्ट्र कृषी पणन मंडळाने सुरू केलेल्या शेतीमाल तारण योजनेला जिल्ह्यात प्रत्यक्षात सुरुवात झालेली नाही. सोयाबीनमध्ये ओलावा जास्त असल्याने योजनेत अजून सोयाबीनची साठवणूक करण्यास बाजार समित्यांनी सुरुवात केलेली नाही. दुसरीकडे बाजारात सोयबीनची रोजची आवक २१ हजार क्विंटलच्या पुढे गेली असून, सोयाबीनचा सरासरी तीन हजार चारशे रुपये क्विंटलचा भाव मिळत आहे.

जिल्ह्यात अनेक वर्षांपासून शेतीमाल तारण योजनेतून सोयाबीनची साठवणूक केली जाते. बाजार समित्यांच्या माध्यमातून कृषी पणन मंडळाची ही योजना राबवण्यात येते. पिकांच्या काढणीनंतर मोठ्या प्रमाणात शेतीमालाची आवक बाजारात होते. यामुळे बाजारात शेतीमालाचे भाव घसरतात. आवक कमी झाल्यानंतर ते वाढतात. नेहमीच्या या परंपरेत वाढणाऱ्या भावाचा फायदा व्यापाऱ्यांना होतो. हा फायदा शेतकऱ्यांना करून देण्यासोबत त्यांच्या तातडीच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी शेतीमाल तारण योजना शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. या योजनेत साठवलेल्या सोयाबीनला चालू बाजारभावानुसार आलेल्या किमतीच्या ७५ टक्के कर्ज दरसाल दरशेकडा सहा टक्के व्याजदराने सहा महिने कालावधीसाठी देण्यात येते. यामुळे कर्जातून शेतकऱ्यांना त्यांच्या तातडीच्या आर्थिक गरजा भागवता येतात व सहा महिन्यांत वाढलेल्या भावाचा फायदाही त्यांना मिळतो. यामुळे अनेक शेतकरी योजनेचा फायदा घेताना दिसत आहे.

यंदा बाजार समित्यांनी योजनेचा प्रारंभ करून ठेवला असून प्रत्यक्षात साठवणुकीला सुरुवात केलेली नाही. सोयाबीनमध्ये हवा (आर्द्रता) जास्त असून त्याचा वजनावर परिणाम होतो. त्यामुळे योजना सुरू केली तरी अजून सोयाबीनची साठवणूक सुरू केली नसल्याचे लातूर बाजार समितीचे सचिव अरविंद पाटील यांनी सांगितले. भावातील चढ-उताराचा योजनेला फटका लातूर बाजार समितीकडून सन २०२१ - २०२२ वर्षात ४७३ शेतकऱ्यांना २९ हजार २२९ क्विंटल सोयाबीनच्या तारणावर पाच कोटी ४९ लाख ८६ हजार २८० रुपये, सन २०२२ - २०२३ या वर्षात ३१५ शेतकऱ्यांना २२ हजार ४२३ क्विंटल सोयाबीनच्या तारणावर चार कोटी ४७ लाख ३४ हजार ११२ रुपये तर सन २०२३ - २०२४ मध्ये १९९ शेतकऱ्यांनी साठविलेल्या १४ हजार ४६२ क्विंटल सोयाबीनच्या तारणावर तीन कोटी १२ लाख ७० हजार ३३९ रुपये कर्ज देण्यात आले होते. तीन वर्षांत बाजारात सोयाबीनच्या भावात चढउतार झाली. त्याचा फटका योजनेला बसला असून, योजनेत सोयाबीन तारण ठेवणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या दरवर्षी कमी होताना दिसत आहे.

बाजारभावावर कर्ज अन् हमीभावाशी तुलना

शेतीमाल तारण योजनेत कर्ज देताना चालू बाजारभावावर देण्यात येते. मात्र शेतकऱ्यांना योजनेत शेतीमाल तारण ठेवल्यामुळे फायदा झाल्याचे दाखवताना बाजार समित्यांकडून प्रत्यक्षात शेतीमाल विक्रीच्या वेळी असलेल्या हमीभावाची तुलना केली जाते. यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना योजनेत मालाची साठवणूक केल्यामुळे नफा होतो. लातूर बाजार समितीनेही हमीभावासोबत तुलना करून शेतकऱ्यांना सन २०२१ - २०२३ मध्ये शेतकऱ्यांना ७१ लाख ५७ हजार तर २०२२ - २०२३ मध्ये ७१ लाख ३८ हजार रुपये फायदा झाल्याचा दावा केला आहे. दरम्यान सोयाबीनचे भाव वाढत नसल्याने काही शेतकरी केवळ सुरक्षित साठवणूक करण्यासाठी व कमी व्याजदराच्या कर्जाचा लाभ घेण्यासाठीच योजनेत सहभागी होत असल्याचे चित्र आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MSP Rabbi 2025 : तेलबिया पिकांसाठी भावांतरचा पर्याय तर कडधान्याची खरेदी वाढवा; कृषी मूल्य व किंमत आयोगाची शिफारस

Crop Loan : पीककर्जासाठी सीबिल धोरण बदला

Tractor Market : येवल्यात १५० वर ट्रॅक्टरची खरेदी

Orange Crop Damage : संत्रा नुकसानग्रस्तांसाठी १३४ कोटींची मागणी

Soybean Market : नांदेड जिल्ह्यात १७ ठिकाणी सोयाबीन खरेदी केंद्र

SCROLL FOR NEXT