Grape Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Farming : द्राक्ष बागेत कलम करताना घ्यावयाची काळजी

Team Agrowon

योगेश भगुरे

Vineyard Management : अलीकडे वातावरणातील बदल, ओलिताच्या पाण्याची उपलब्धता व दर्जा अशा अनेक कारणांमुळे स्वमुळावरील द्राक्ष बागेत दर्जेदार उत्पादन मिळण्यास मर्यादा येत आहे. अशा स्थितीत द्राक्ष पिकाची अभिवृद्धी छाट कलमांपेक्षाही कलमाद्वारे करण्याची गरज आहे. द्राक्ष बागेत करण्याच्या पद्धती व त्यातील पायऱ्यांची माहिती घेऊ.

खुंट (रूटस्टॉक) काडीची पूर्वतयारी व निवड

बागेत ज्या खुंटावर आपण कलम करणार आहोत, त्यावर कलम करण्याकरिता सरळ वाढणारी, सशक्त (८-१० मि.मी. जाड) आणि रसरशीत काडी निवडावी. अशी काडी असल्यास कलम यशस्वी होण्यास मदत होते.

अशी काडी मिळविण्यासाठी कलम करण्याच्या आधी १५ ते २० दिवस जोमदार वाढ असलेल्या ३ ते ४ काड्या सरळ बांबूला बांधून घ्याव्यात. अन्य काड्या काढून टाकाव्यात.

कलम करतेवेळी जमिनीत पुरेसा ओलावा असला पाहिजे. जमिनीत अपेक्षित ओलावा नसल्यास कलम करण्याच्या २ ते ३ दिवस आधी ठिबक सिंचनाद्वारे भरपूर पाणी द्यावे. असे केल्यास काडीमध्ये अन्नद्रव्ये व पाण्याचा प्रवाह पूर्ववत होईल. काडी रसरशीत होऊन कलम यशस्वी होण्यास मदत होईल.

कलम करण्याचा योग्य कालावधी

कलम यशस्वी होण्यासाठी विशिष्ट वातावरणाची गरज असते. हवेतील आर्द्रता व तापमानाचा कलमाच्या यशावर परिणाम होतो. हवेतील आर्द्रता ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आणि तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असे वातावरण कलम बांधण्यासाठी योग्य मानले जाते. ही वातावरण स्थिती असलेल्या काळात कलम करावे. सर्वसाधारणपणे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ही परिस्थिती राज्यात दिसून येते. या कालावधीपर्यंत मातृवेलीवरील काडीदेखील परिपक्व झालेली असते. त्यासाठीच ऑगस्ट - सप्टेंबरमधील कालावधी कलम करण्यास योग्य मानला जातो.

कलम करण्याची पद्धत

कलम यशस्वी होण्यासाठी कलम करणाऱ्या कामगाराची कुशलता अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे कुशल व्यक्तीकडून कलम करून घ्यावे. कलम करताना खुंटाची तयार झालेली फूट बांबूपासून अलग करावी. जमिनीपासून दीड फूट उंचीवर आडवा काप घ्यावा. त्यानंतर फुटीवरील सर्व पाने व इतर फुटी काढून घ्याव्यात. कोणतेही कलम १०० टक्के यशस्वी होण्याची खात्री देता येत नसल्याने एका खुंटावरील दोन फुटींवर एकाच वेळी कलम करून घेणे फायदेशीर ठरते. कापलेल्या खुंट काडीच्या वरच्या बाजूस धारदार चाकूने चार ते पाच सें.मी.पर्यंत उभी खाच घ्यावी. कलम करण्यासाठी खुंट काडीच्या (फुटीच्या) जाडीची कलम काडी निवडावी. कलम काडी परिपक्व आणि कमीत कमी दोन डोळ्यांची असावी. अशी निवडलेली काडी कार्बेन्डाझिम* १ ते २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या द्रावणात २ ते ३ तास बुडवून ठेवावी. त्यानंतर खुंट काडीला जुळणारी कलम काडी निवडून कॅम्बियमला इजा न करता धारदार चाकूच्या साह्याने पाचरीसारखा आकार तयार करावा. ही काडी कलम करण्यास वापरण्यापूर्वी ज्या ठिकाणी काप घेतलेला असतो, तो भाग ६-बीए* (१५-२० पीपीएम) या द्रावणात बुडवून घ्यावा. त्यानंतर खुंटावर घेतलेल्या उभ्या खाचेमध्ये कलम काडीचा पाचरीसारखा आकार व्यवस्थित बसवून त्यावर पॉलिथिन पट्टी घट्ट बांधावी. कलम काडी व खुंट काडीची साल एकमेकांना योग्य पद्धतीने जुळेल, याची दक्षता घ्यावी.

कलम काडीची निवड

कलम करण्यापूर्वी कलम काडीची निवड करणे जास्त महत्त्वाचे असते. कलम करण्यात वापरण्यात येणारी कलम काडी ही विशेषतः रोगमुक्त, सतत जास्त व दर्जेदार उत्पादन देणाऱ्या वेलीवरून घ्यावी. यामुळे भविष्यात उत्पादनात घट येण्याची समस्या उद्‍भवणार नाही.

ज्या वेलीवरून कलम काडी काढली आहे, ती काडी पूर्णपणे परिपक्व असावी. अन्यथा, कलम सुरुवातीला यशस्वी झाल्यासारखे दिसले तरी काही दिवसांमध्येच कलम जळून जाईल.

काडी जर पूर्णपणे परिपक्व झाली असल्यास बाहेरून पूर्ण खाकी रंगाची दिसेल. अशा काडीचा काप घेतल्यानंतर आतील पीथ हे पूर्णपणे तपकिरी रंगाचे दिसेल. अशा प्रकारच्या काडीमध्ये आवश्‍यक ते अन्नद्रव्य साठलेले असते. हेच अन्नद्रव्य कलम केल्यानंतर डोळे फुटून ३ ते ४ पाने अवस्था होईपर्यंत उपयोगी ठरते. तेव्हा कलम करण्याकरिता बागेतून फक्त पूर्णपणे परिपक्व झालेली काडी वापरावी.

ज्या द्राक्ष बागेत पानगळ करण्यासाठी संजीवकांची फवारणी केलेली आहे, अशा बागेतून कलम काडी घेऊ नये.

कलम केल्यानंतर घ्यावयाची काळजी

कलम केल्यानंतर बागेत पुरेसा पाऊस नसल्यास ठिबकद्वारे पाणी द्यावे.

बागेत आर्द्रता कमी असल्यास कलम केल्यानंतर ६ व्या दिवसांपासून १५ दिवसांपर्यंत कलमांवर पाण्याची फवारणी करावी.

कलमांचे डोळे फुटत असताना बागेत उडद्या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता असते. तेव्हा कलम केल्याच्या सहा ते सातव्या दिवसानंतर शिफारशीत कीटकनाशकाची फवारणी करावी.

खुंटाला येणाऱ्या फुटी वेळोवेळी काढून घ्याव्यात.

कलम फुटल्यानंतर दोन सशक्त फुटी ठेवून त्या बांबूला बांधून घ्याव्यात. इतर फुटी काढून टाकाव्यात.

कलम जोडावर गुंडाळलेले प्लॅस्टिक पेपर वेळीच योग्य प्रकारे काढून घ्यावे.

अशाप्रकारे द्राक्ष बागेत कलम करण्यासाठी योग्य खुंट व कलम काडी निवडून, कुशल मजुरांद्वारे योग्य वेळ साधून कलम करावे. त्यामुळे कलमांच्या यशाचे प्रमाण वाढेल. कलमांची जोमदार वाढ होऊन भविष्यात दर्जेदार द्राक्ष उत्पादन मिळण्यास मदत होईल.

योगेश भगुरे, ९९२२४१४८७३

(सहायक प्राध्यापक, उद्यानविद्या विभाग, कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालय, नाशिक)

(* लेबल क्लेम आणि ‘एनआरसी’ची शिफारस)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT