सुदर्शन सुतार
Solapur News : शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असणाऱ्या अधिकाऱ्यांची हल्ली वानवा दिसत असताना, पुणे विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी यांनी मात्र संवेदनशीलता दाखवत रात्री दहा वाजता फोनद्वारे मदत मागणाऱ्या शेतकऱ्याप्रती तत्परता दाखवली आणि ऐनवेळी केवळ एका प्रमाणपत्रामुळे अडलेली सुमारे तीन टन आंब्याची लंडनला निर्यात होऊ शकली. नाईकवाडी यांच्या मदतीने संबंधित शेतकऱ्याला सुखद अनुभव आलाच, पण त्याचे सुमारे पाच लाख रुपयांपर्यंतचे नुकसानही टळले.
या बाबत माहिती अशी, की कासेगाव (ता. पंढरपूर) येथील शेतकरी विशाल देशमुख हे द्राक्ष-आंबा बागायतदार आहेत. त्यांच्याकडे ३० एकरांवर केसर आंबा आहे. द्राक्षाची दरवर्षी ते निर्यात करतात. त्याशिवाय भाजीपाल्याचीही करतात, पण आंब्याची ते पहिल्यांदाच लंडनला निर्यात करणार होते.
त्यासाठीच्या सर्व कागदपत्रांसह तांत्रिक बाबी त्यांनी पडताळून घेतल्या होत्या. द्राक्षाप्रमाणेच त्याचीही निर्यात असेल, या हिशेबाने त्यांनी काम सुरू केले. ता. २६ रोजी पहाटे गोव्याहून लंडनला विमानाने त्यांचा आंबा जाणार होता, तसा संबंधित व्यापाऱ्यांशी करारही झालेला.
पण आदल्या दिवशी २५ रोजी तेही रात्री दहाच्या सुमारास निर्यातीसाठी सुमारे तीन टन आंबा टेम्पोत भरून उभा ठेवला असताना आणि पुढच्या काही वेळात तो गोव्याकडे पाठवला जाणार होता, पण ऐनवेळी फायटोसॅनिटरी प्रमाणपत्राअभावी त्यांची निर्यात होऊ शकणार नाही, असे त्यांना संबंधित यंत्रणेकडून सांगण्यात आले.
तेव्हा विशाल यांना धक्काच बसला, आता टेम्पोत भरलेला आंबा, त्याचा करार, याचा विचार करत ते बसले. त्यांनी काही स्थानिक कृषी अधिकाऱ्यांना फोन लावले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनाही माहिती दिली. पहाटेपर्यंत हा आंबा गोव्याला पोहोचणे आवश्यक होते.
पण आता त्यांना फक्त नुकसान समोर दिसत होते. शेवटी त्यांनी विभागीय कृषी सहसंचालक नाईकवाडी यांना फोन लावला. ‘‘फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र नसल्यामुळे कन्साइंडमेंट पाठवता येत नाही, मला आता फायटो सॅनिटरी प्रमाणपत्र हवे आहे, कृपया काही मदत करा...,’’ असा फोन केला. त्या वेळी रात्रीचे दहा ते साडेदहा वाजले असतील. त्यांनीही शांतपणे विशाल यांचे म्हणणे ऐकून घेतले.
तुम्ही काळजी करू नका, आपण प्रयत्न करू, असे उत्तर दिले. नाईकवाडी यांनीही त्याच वेळी रात्रीतूनच सर्व सूत्रे हलवली आणि पंढरपुरातील मंडळ कृषी अधिकारी आणि फायटोसॅनिटरी इन्स्पेक्टर असणाऱ्या जयश्री थोरात या महिला अधिकाऱ्याला मदत करण्याची विनंती केली.
तसेच रात्रीची वेळ असल्याने कृषी विभागाची गाडी आणि दोन सहकारीही त्यांच्यासोबत देऊन देशमुख यांच्या शेतावर पाठवले. विशेष म्हणजे खरात यांच्या घरीही लहान बाळ असताना आणि त्यांचे पतीही परगावी गेलेला असताना, त्यांनीही शेतकऱ्याच्या मदतीसाठी तत्परता दाखवली.
पुढच्या काही तासांत विशाल देशमुख यांच्या शेतातील आंब्याची तांत्रिक पाहणी, तपासणी यांसह सर्व पडताळणी पूर्ण करून ऑनलाइन पद्धतीने त्याची माहिती भरण्यात आली आणि काही वेळातच हे प्रमाणपत्र देशमुख यांना मिळाले. त्यानंतर आंब्याची गाडी गोव्याकडे रवाना झाली, पुढे ठरल्यानुसार विमानाने थेट लंडनकडे त्यांचा आंबा रवाना झाला.
आम्ही थोड्याशा केलेल्या प्रयत्नाचे चीज झाले. एका शेतकऱ्याचे नुकसान टळले, याहून दुसरे समाधान काय असू शकते.
- रफिक नाईकवाडी, विभागीय कृषी सहसंचालक, पुणे
कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी मला मोठा सुखद धक्का दिला. नाईकवाडी सर आणि त्यांच्या सर्व टीमने दाखवलेली तत्परता मला महत्त्वाची वाटते. या सहकार्यामुळे माझे लाखो रुपयांचे नुकसान टळले.
- विशाल देशमुख, आंबा उत्पादक, कासेगाव, ता. पंढरपूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.