Politics Agrowon
ॲग्रो विशेष

India Politics : चुनावी जुमल्यांत मूळ समस्या दुर्लक्षितच

Article by Dr. Santosh Dakhare : आगामी लोकसभेच्या निवडणुकीत हॅटट्रिकच्या तयारीत असलेल्या भाजप चारशे पार करणार की फक्त बहुमत घेणार की विरोधक म्हणतात तसा ‘अबकी बार भाजप तडीपार’ होणार, यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.

Team Agrowon

डॉ. संतोष डाखरे ८२७५२९१५९६

India Election Condition : ‘अबकी बार चारसौ पार’ असा नारा देऊन अठराव्या लोकसभेची निवडणूक या नाऱ्याभोवतीच कशी केंद्रित राहील, याची पुरेपूर तजवीज विद्यमान केंद्र सरकारने केली आहे. ५४३ लोकसभा जागांपैकी ४०० म्हणजे ७५ टक्के जागा जिंकण्याचे हे गणित आहे. याचा दुसरा अर्थ भाजप सोडून अन्यविरोधी पक्षांना (काँग्रेससह) उर्वरित २५ टक्के जाग्यांवरच समाधान मानावे लागू शकते.

या लोकसभेत सत्ताधारी पक्षाला खरच चारशेचा आकडा गाठता येईल का, हा खरा प्रश्‍न आहे. सत्ताधारी जेव्हा आत्मविश्‍वासाने चारशे पारचा दावा करतात तेव्हा त्यामध्ये काही तथ्यही असू शकते. तेव्हाच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकट्या भाजपला ३७० च्या वर आणि एनडीएला चारशेच्या वर जागा मिळतील, असे छाती ठोकून सांगतात.

तेव्हा निश्‍चितच या दाव्याला पुष्टी प्राप्त होते. प्रत्येक प्रचार सभेतही श्रोत्यांकडून तसा जयजयकारही करून घेतला जातो. नुकत्याच झालेल्या संसदेच्या अधिवेशनातही मोदींनी ‘अबकी बार चारसौ पार’ असा नारा दिला होता. त्यास भाजपच्या सर्व खासदारांनी मागून दुजोराही दिला होता.

मुळात ही एक स्ट्रॅटेजी आहे. प्रत्येक निवडणुकीत मतदारांना आकर्षित करणारी एखादी टॅगलाइन राजकीय पक्षांना हवी असते. अशी एखादी टॅगलाइन मिळाली, की तिचा प्रचार आणि प्रसार जोमाने होतो. सर्वत्र तिचीच हवा आणि चर्चा असते आणि अन्य प्रश्‍न मग आपोआपच बाजूला सारले जातात.

शास्त्रींच्या काळात ‘जय जवान, जय किसान’ इंदिराजींच्या काळात ‘गरिबी हटाव’ अटलजींच्या काळात ‘इंडिया शायनिंग’ या अशाच काही घोषणा होत्या. केजरीवाल सुद्धा पहिल्या टर्ममध्ये ‘पाच साल केजरीवाल’ अशी टॅगलाइन घेऊन आले होते. तर दुसऱ्या टर्ममध्ये ‘कहो दिल से केजरीवाल फिरसे’ असा नारा त्यांनी दिला होता. आणि लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले होते.

मोदी सरकारनेही यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या टॅगलाइनचा कल्पकतेने वापर केल्याचे आपणास दिसून येईल. २०१४ मध्ये काला धन आणि भ्रष्टाचार या मुद्द्यावर लढविल्या गेलेल्या निवडणुकांमध्ये भारतीय बेरोजगारांना साद घालण्याकरिता ‘नही रहेगा कोई बेरोजगार, हर साल दो करोड रोजगार’ असा नारा बीजेपीने देऊन लक्ष वेधले होते.

प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा लाख असे आश्‍वासनही याच टर्ममध्ये देण्यात आले होते. (शेवटी हा चुनावी जुमला होता. अशी कबुली स्वतः पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दिली होती. हा भाग वेगळा.) दुसऱ्या टर्ममध्ये ‘फिर एक बार मोदी सरकार’ अशी टॅगलाइन वापरण्यात आली आणि आता ‘अबकी बार चारसौ पार’ असा नारा देऊन मतदारांना साद घातली जात आहे.

मुद्दा ‘अब की बार चारसौ पार’चा आहे. हे अचानक कुठून आलं. १९८४ च्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये एकट्या काँग्रेसने चारशेच्या वर जागा जिंकल्या होत्या. तेव्हापासून त्या आकड्यापर्यंत कोणालाही पोहोचता आले नाही. काँग्रेसच्या नावावर असलेला हा कीर्तिमान आपल्या नावावर करण्याचा भाजपचा प्रयत्न असू शकतो.

भाजपच्या या आत्मविश्‍वासामागे अनेक कारणे सुद्धा आहेत. बीजेपीला शह देऊ शकेल, असा विरोधी पक्ष वर्तमानात अस्तित्वात नाही. मोठा गाजावाजा करून तयार झालेली इंडिया आघाडीमध्ये एकवाक्यता नाही. विरोधक सैरभैर आहेत. पश्‍चिम बंगालमध्ये इंडियाचा

घटक पक्ष असलेली तृणमूल काँग्रेस लोकसभेला एकट्याने सामोरे जात आहे. बिहारमध्ये नितीश कुमार यांनी बीजेपीचा हात धरला आहे. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्रामधून काँग्रेसचे आजी-माजी आमदार, खासदार बीजेपीत प्रवेश करीत आहे. ८० जागा असणाऱ्या उत्तर प्रदेशात मागील वर्षी काँग्रेसला अपराजित असा अमेठीचा गडही राखता आला नाही.

या वर्षीही तीच परिस्थिती असून काँग्रेसने या राज्यात निवडणुकीपूर्वीच हार पत्करल्याचे चित्र आहे. राम मंदिराची उभारणी, सीएएची अधिसूचना, ८० कोटी नागरिकांना मोफत अन्नधान्य, समान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भातील हालचाली, साम-दाम-दंड-भेद या नीतीचा वापर करून विरोधी पक्षातील प्रभावी मात्र भ्रष्ट नेत्यांना पक्षप्रवेश देऊन पावन करण्याची नीती, या पार्श्‍वभूमीवर ‘अबकी बार चारसौ पार’चे स्वप्न सत्ताधारी पक्ष बघत असल्याचे चित्र आहे.

त्यादृष्टीने त्यांचे नियोजनही चालले आहे. भाजप नेहमीच इलेक्शन मोडमध्ये राहणारा पक्ष आहे. योजनांचा, उपक्रमांचा प्रचार आणि प्रसार जोरासोरात केल्या जात आहे. नव मतदारांना साद घालण्याकरिता ठिकठिकाणी मेळावे घेतल्या जात आहेत.

गावोगावी, बूथ लेवलपर्यंत करावयाची नियोजन तयार आहे. निवडणूक प्रभारी, बूथ प्रमुख नेमल्या गेले आहेत. प्रचार सभांना महिनाभरा पूर्वीपासूनच सुरुवात झाली आहे. वृत्तपत्रांद्वारे जाहिरातींचा भडिमार सुरू आहे. तर दुसरीकडे इंडियाची गाडी जागावाटपावरच अडून बसली आहे.

अबकी बार चारसौ पार या भाजपच्या आत्मविश्वासी घोषणेबद्दल दिल्ली विद्यापीठातील राजकीय विश्‍लेषक डॉ. विवेकानंद नरताम यांना विचारले असता ते म्हणाले, की चारशे पार अशक्य आहे, मात्र बीजेपी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत पंचवीस ते तीस जागा अधिक घेईल आणि एनडीएचा एकत्रित आकडा ३६०-३७० च्या घरात राहील.

असे मत त्यांनी व्यक्त केले. तब्बल ८० कोटी भारतीयांना दिले जाणारे मोफत धान्य आणि त्या अनुषंगाने या वर्गाला आपल्यासोबत जुळवून घेण्यात भाजपला बऱ्यापैकी यश आल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. सोबतच अनेक योजनांचे पैसे लाभार्थ्यांच्या थेट खात्यावर जमा होत असल्याने तिही एक जमेची बाजू ठरू शकते. असे मत त्यांनी व्यक्त केले.

मुळात निवडणुकांना आता बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे या बाजारात राजकीय पक्ष म्हणजे वस्तू आणि मतदार म्हणजे ग्राहक आहे. त्यामुळे आमची वस्तू कशी चांगली आणि सरस आहे, हे ग्राहकांना पटवून सांगण्याकरिता वाटेल ते केले जात आहे. निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या आकर्षक घोषणा हा त्याचाच एक भाग म्हणता येईल.

अशा घोषणांच्या आड बेरोजगारी, गरिबी, अल्पसंख्याकांवरील अत्याचार, महागाई, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी या समस्या आपसूकच लपल्या जातात. लोकसभेच्या निवडणुका आता तोंडावर आल्या असून हॅटट्रिकच्या तयारीत असलेल्या भाजप चारशे पार करणार की फक्त बहुमत घेणार की विरोधक म्हणतात तसा ‘अबकी बार भाजप तडीपार’ होणार, हे स्पष्ट होण्यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.

(लेखक राजकीय विश्‍लेषक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT