India Politics : बदलते ‘कालचक्र’ ते हेच का!

Politics : बिहारात नितीशकुमारांनी आपल्या स्वभावानुसार पुन्हा पलटी मारत भाजपबरोबर सरकार स्थापन केले आहे. दुसरीकडे काँग्रेसच्या न्याययात्रेला आसामातील भाजप सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बदलते कालचक्र कदाचित हेच असावे!
India Politics
India PoliticsAgrowon

Change of India Politics : भारताच्या इतिहासात २२ जानेवारी २०२४ हा दिवस सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मोदींना कालचक्र बदलत असल्याचे जाणवले. नवीन कालचक्राची सुरुवात झाल्याबाबत ते व्यक्तही झाले.

‘‘रामलल्लाच्या मंदिराची निर्मिती हे सद्‍भाव, समन्वयाचे प्रतीक आहे. राम वाद नाही, समाधान आहे. राम अग्नी नाही, ऊर्जा आहे. राम फक्त आमचा नाही, सर्वांचा आहे. राम केवळ वर्तमान नाही, अनादि आहे...’’, मोदी अयोध्येत जेव्हा हे सांगत होते त्या वेळी आसाममध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधींना शंकरदेव महाराजांच्या मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला. इकडे राम सगळ्यांचाच म्हणताना स्वतःच्याच मंत्र्यांना अयोध्येत यायचे नाही, अशी तंबी देण्यात आली होती. त्यानंतर गेल्या आठवडाभरात ज्या राजकीय घडामोडी सुरू आहेत त्या खरेच कालचक्र बदलवणाऱ्या दिसतात; परंतु केवळ राजकीय! त्यात रामाच्या आदर्शातील अंश नाही, ही वस्तुस्थिती.

अयोध्येतील राममूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोदींसाठी लोकसभा निवडणुकांचे आगामी आकर्षण ठरावे, असेच नियोजन होते. इतर राजकीय पक्षांपेक्षा राममंदिर हा भाजपचा आस्थेचा विषय अधिक होता, हे नाकारता येत नाही. जे लोक बाजार न करता धर्म आणि देवावर श्रद्धा ठेवतात त्या प्रत्येकाच्या मनात रामनाम असते. परंतु रामराज्यातील अपेक्षित कृती मात्र या सोहळ्यात दिसून आली नाही.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी असो, वा मुरली मनोहर जोशी यांनी राम मंदिर व्हावे म्हणून मोठा संघर्ष केला. खरं तर त्यांना ‘याचि देही, याचि डोळा’ सोहळा अनुभवता आला असता. परंतु वयोमानामुळे ते येऊ शकणार नाहीत, असे आधीच सांगितले गेले. केंद्रीय मंत्रीही सोहळ्यापासून दूर होते. सात हजार निमंत्रकांमध्ये एकही दिग्गज मंत्री अयोध्येतील सोहळ्यास उपस्थित राहू नये, यालाच नव्या कालचक्राची सुरूवात म्हणायची का? अनेक मंत्र्यांना इच्छा असूनही सोहळ्याचे साक्षीदार होता आले नाही, याचे दु:ख आहे.

India Politics
India Politics : मोदीविरोधी मोहिमेतील वजाबाकीचे राजकारण!

आसामात संघर्षाची ठिणगी

एकीकडे अयोध्येत प्रभू श्रीरामाचा जयघोष सुरू असताना दुसरीकडे आसाममधील भाजपचेच सरकार कैकयीच्या भूमिकेत दिसले. राहुल गांधी यांनी १४ जानेवारीपासून ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सुरू केली. यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. परंतु आसाममध्ये यात्रा जाताच भाजपचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी जागोजागी अडथळे आणले. राहुल गांधींच्या यात्रेकडे लोकांनी पाठ फिरवली असे भाजप सांगत सुटली तरी हेमंता सरमा यांनी या यात्रेच्या प्रतिसाद आणि गर्दीकडे लक्ष वेधले आहे.

ही यात्रा शहरांमधून जाणार नाही, असा फतवाच काढला होता. यात्रेत प्रचंड गर्दी असल्याने जनजीवन विस्कळीत होईल; शाळा, रुग्णालयांना त्रास होईल, असे त्यांचे मत होते. आसाममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही रॅली आणि सभा शांततेने पार पाडल्या. परंतु राहुल यांची सभा, रॅली पेलवत नसेल तर लोकांकडून उत्सफूर्त प्रतिसाद मिळतो, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे चिडून मर्यादा पुरूषोत्तम श्रीरामाची मर्यादा गुंडाळत आसाममध्ये भाजपचे कार्यकर्ते न्याययात्रेवर तुटून पडले. अनेकांची डोकी फोडली. सरमा यांनी ठरविल्याप्रमाणे राहुल गांधींसह अन्य नेत्यांवर गुन्हे दाखल केले.

लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींना तुरुंगात डांबू, म्हणण्याइतपत मस्तवालपणा नेत्यांच्या अंगात आहे. तरीही रामराज्याची कल्पना करायची? स्वातंत्र्यपूर्व काळात दलितांना मंदिरात प्रवेश नाकारला जायचा. १९३०मध्ये नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या सत्याग्रहाची आठवण होते. ज्या दिवशी अयोध्येत राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत होती त्याच दिवशी आसाममधल्या बटाद्रावा येथील शंकरदेव महाराजांच्या मंदिरात राहुल यांना दर्शनापासून रोखले. मंदिर व्यवस्थापनाने गांधी यांना दहा दिवसांपूर्वीच मंदिरात येण्याचे निमंत्रण दिले होते.

परंतु मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याने पोलिसांनी त्यांना रोखले. याही काळात एखाद्याला मंदिर प्रवेशापासून रोखणे हे कालचक्र शंभर वर्षांपूर्वीच्या वातावरणात पुन्हा पोहचल्याचे उदाहरण आहे. आसाम-मेघालय सीमेवरील खासगी विद्यापीठात राहुल गांधींना निमंत्रण होते. ते विद्यार्थ्यांशी संवाद साधणार होते. परंतु हेमंता सरमा यांनी विद्यापीठावर दडपण आणले. विद्यार्थ्यांना भेटू देऊ न देण्याचे फर्मान सोडले. कार्यक्रम रद्द झाला. परंतु शेकडो विद्यार्थी राहुल गांधींना भेटायला गेले. रस्त्यावरच राहुल मास्तरांचा क्लास सुरू झाला आणि भाजपचे नेते पाहातच राहिले.

India Politics
Politics on Farmers : शेतकऱ्यांचे नवीन वर्ष कधी साजरे होणार?

‘इंडिया’त उरले कोण?

पंतप्रधान मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे लगेच कालचक्र बदलायला सुरुवात झाली. परंतु हे कालचक्र ‘इंडिया’ आघाडीचे सूप वाजवणारे दिसून येते. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेससोबत वाटाघाटी अशक्य असल्याने ‘एकला खेला होबे’चा संकल्प जाहीर केला. यामुळे ‘इंडिया’ला मोठा धक्का बसला. बंगालमध्ये काँग्रेस नावापुरतीच आहे. त्यांचे केवळ दोन खासदार आहेत; तर तृणमूल काँग्रेसचे बावीस. ममतादीदी काँग्रेसला दोनपेक्षा अधिक जागा द्यायला तयार नाहीत.

उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांनी काँग्रेसला अकरा जागा द्यायची तयारी दर्शविली; पण काँग्रेसकडून अद्याप होकार नाही. बिहारने सर्वांनाच धक्का दिला. ‘मी मृत्यू स्वीकारेन परंतु भाजपबरोबर जाणार नाही’, अशी शपथ घेणारे बिहारचे मुख्यमंत्री, संयुक्त जनता दलाचे नेते नितीशकुमारांनी ‘इंडिया’ला जोरात धक्का देत भाजपपुढे साष्टांग दंडवत घातला. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नितीशकुमारांसाठी भाजपची दारे कायम बंद असल्याचे जाहीररीत्या सांगितले होते.

राजकारणात दारे कुणासाठीच कायमची बंद नसतात, हे जनता दल (संयुक्त)-भाजप या नव्या युतीतून स्पष्ट होते. पलटी मारण्याची ही नितीशकुमारांची पाचवी वेळ. बिहारवर तेजस्वी यादव यांची मजबूत पकड आहे. नितीशकुमारांच्या या निर्णयाचा फटका राष्ट्रीय जनता दलाला बसेल, असे दिसत नाही. ‘इंडिया’तून महत्त्वाचे नेते बाहेर पडत असल्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आघाडीत किती तग धरतात, तेही पाहावे लागेल.

पंजाबमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात वाटाघाटी होणे अवघड दिसते. दुसरीकडे महाराष्ट्रात शिवसेनेच्या ठाकरे गटाला पाहिजे त्या प्रमाणात जागा मिळतील, असे चित्र नाही. ‘इंडिया’ आघाडीचे एकेक चाक निखळताना दिसत आहे. भाजप महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांना खुणावत आहे. तिकडे काँग्रेस भारत जोडो न्याययात्रेत व्यग्र आहे. काँग्रेस ‘इंडिया’तील सहयोगी पक्षांनाच न्याय देऊ शकत नाही, अशी टीका होत आहे. शेवटी काँग्रेसला ‘एकला चलो’शिवाय पर्याय नसेल. या सगळ्याच गोष्टी मोदींच्या पथ्यावर पडू शकतात. मोदींना बदलणारे जे कालचक्र दिसले, ते हेच असावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com