Dhan Kharedi : Agrowon
ॲग्रो विशेष

Dhan Kharedi : मुदत संपली, तरी भात खरेदी बाकी

Team Agrowon

Alibag News : खरिपात तयार झालेल्या धान्याची विक्री ३१ जानेवारीपर्यंतच करावी, अशी अट राज्य शासनाने घातली होती. या मुदतीत भाताची अपेक्षित विक्री होऊ न शकल्याने शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवण्यात आली;

परंतु अद्यापही पंधरा टक्के शेतकऱ्यांना धान्य विकता आलेले नाही. बुधवारी मुदत संपल्‍याने धान्याची कशी विक्री करावी, या विवंचनेत भात उत्पादक शेतकरी (Rice Producer farmers) पडले आहेत.

आधारभूत खरेदी योजनेंतर्गत या वर्षी शासनाने दिलेला इष्टांक पूर्ण झालेला नाही. आतापर्यंत फक्त ५ लाख २६ हजार क्विंटल भाताची विक्री शेतकऱ्यांना करता आली आहे. गतवर्षीपेक्षा ही सरासरी कमी आहे.

यापूर्वी खरीप हंगामातील धान्याची एप्रिल महिन्यापर्यंत हमीभावाने शेतकऱ्यांना विक्री करता येत होती. सवडीप्रमाणे मळणी केलेल्या धान्याची खरेदी-विक्री केंद्रांवर उशिरापर्यंत आवक सुरू असायची;

मात्र, मार्केटिंग फेडरेशनच्या नव्या नियमांची कल्पना नसलेले शेतकरी आता अडचणीत सापडले आहेत. यामुळे मुदत वाढवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

जिल्ह्यात भात खरेदीसाठी ३९ खरेदी केंद्रे १ डिसेंबर रोजी सुरू करण्याचे आदेश दिले होते. खरीप हंगामात भात ३१ जानेवारीपर्यंत विकण्याची मुदत दिली होती.

मात्र काही भात खरेदी-विक्री केंद्र उशिराने सुरू झाल्याने तसेच ऑनलाइन खरेदीची पूर्तता करण्यात येणाऱ्या अडचणींमुळे शेतकऱ्यांना वेळीच भाताची विक्री करता आलेली नाही.

मुदतवाढीची मागणी

हमी भावाने भाताची विक्री करता यावी, यासाठी दुसऱ्यांना मुदतवाढीची मागणी शेतकरी करीत आहे. या संदर्भातील पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. मुदतवाढ मिळाल्यास कमी झालेल्या भात खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये वाढ होईल.

याचा फायदा स्‍थानिक शेतकऱ्यांनाही होईल. याबाबत प्रस्ताव पाठवण्याची तयारी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने दाखवली आहे.

अल्पभूधारक शेतकरी वंचित

यंदाच्या खरिपासाठी राज्य शासनाने सर्वसाधारण भातपिकासाठी २०४० रुपये मोबदला जाहीर केला आहे. त्याचबरोबर प्रतिहेक्टरी १५ हजार बोनसही जाहीर केले; मात्र, जिल्ह्यात हेक्टरमध्ये भात पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण कमी आहे.

ज्यांच्याकडे एक हेक्टरपेक्षा जास्त लागवडीखाली क्षेत्र आहे, त्यांनाच याचा लाभ योग्य प्रमाणात मिळू शकतो. तर भाताची विक्री करूनही अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात क्षुल्लक रक्कम जमा होण्याची शक्यता आहे.

ऑनलाइनचा फटका

शेतकऱ्यांनी भात खरेदी-विक्री केंद्रावर जाऊन नाव नोंदणी न करणे, कागदपत्रांची पूर्तता न करणे, ई-भातपिकाची नोंदणी नसणे अशा अनेक कारणांमुळे आजही अनेक अल्पशिक्षित शेतकरी भाताची विक्री करू शकलेले नाहीत.

जिल्ह्यातील भात पिकाचे प्रमाण वाढूनही हमी भावात विकण्याचे प्रमाण वाढलेले नाही. ही सर्व प्रक्रिया लहान शेतकऱ्यांना न परवडणारी असल्याने ते भाग घेत नसल्याचे दिसून येत आहे.

काही दिवसांची मुदत वाढवून मिळेल अशी अपेक्षा आहे. मुदत वाढवून मिळाल्यास कमी असलेली सरासरी गाठण्यात यश येईल. आतापर्यंत जिल्ह्यात खरिपातील ५ लाख २६ हजार क्विंटल धान्याची खरेदी झाली आहे. मागील वर्षापेक्षा ही सरासरी थोड्या प्रमाणात कमी आहे.
के. टी ताटे, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, अधिकारी
हमी भावाने भात खरेदी-विक्री करण्याच्या प्रक्रियेत अनेक तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. ऑनलाईन पद्धत सर्वसामान्य शेतकऱ्यांना न समजणारी असते. मळणी आणि इतर कामासाठी वेळेत मजूर न मिळाल्याने खरेदी-विक्री केंद्रावर भात नेण्यास उशीर होतो. अशा कारणामुळे काही शेतकऱ्यांना विक्री करता आलेली नाही, नेहमीप्रमाणे मार्चपर्यंत खरेदी-विक्री सुरू ठेवावी, अशी अपेक्षा आहे.
शांताराम पाटील, प्रगतशील शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT