Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : गाळप हंगाम अर्धा संपला; धुराडी मार्चपर्यंत चालणार

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Sugar production : कोल्हापूर, पुणे ः देशातील साखर उत्पादनात जानेवारीअखेरही महाराष्ट्रच आघाडीवर आहे. ऊस गाळपात अग्रक्रम राखलेल्या महाराष्ट्राने ६७६ लाख टनांचे गाळप केले. सरासरी ९.६० टक्के उताऱ्यासह ६५ लाख टनांचे साखर उत्पादन केले. देशात ५१७ कारखान्यांमधून १९२८ लाख टन ऊस गाळप झाले.

सरासरी ९.७१ टक्के उताऱ्यासह १८७ लाख टनांचे नवे साखर उत्पादन झाले. राज्याचा यंदाचा हंगाम उशिरा सुरू झाल्याने हंगाम मार्चअखेर ते एप्रिल मध्यापर्यंत चालण्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ व ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशननेही या अंदाजाला पुष्टी दिली आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्‍या माहितीनुसार दुसऱ्या क्रमांकावरील उत्तर प्रदेशमधील ऊसगाळप ५७४ लाख टन झाले असून त्यातून सरासरी १०.५ टक्के उताऱ्यासह ५७.६५ लाख टन साखर उत्पादन झाले. उत्तर प्रदेशातील गाळप हंगाम एप्रिलअखेर ते मे मध्यापर्यंत चालण्याचा अंदाज आहे. तृतीय क्रमांकावरील कर्नाटकने ३७७ लाख टन ऊस गाळप केले. सरासरी ९.७५ टक्के उताऱ्यासह जवळपास ३७ लाख टन साखर उत्पादन झाले.

उर्वरित सर्व राज्यांतील होणारे ऊस गाळप, सरासरी साखर उतारा आणि होणारे नवे साखर उत्पादन लक्षात घेता यंदाच्या वर्षीच्या हंगामाअखेर देश पातळीवरील नवे साखर उत्पादन ३१४ लाख टनांचे होणे अपेक्षित आहे. परतीचा पाऊस तसेच इथेनॉल निर्मितीकडे वळणाऱ्या साखरेवरील आणलेले निर्बंध यामुळे नव्या साखर उत्पादनात वाढ होताना दिसत आहे.

अगदी सुरुवातीच्या अंदाजानुसार राज्याची एकूण ऊस उपलब्धता यंदा ११०० ते १२०० लाख टनांच्या आसपास वर्तवली गेली होती. परंतु, ऐन पावसाळ्यात पावसाचे खंड वाढले. त्यामुळे ऊस टंचाईच्या भीतीने साखर कारखान्यांची झोप उडाली होती. मात्र, अवकाळी पावसाने काही जिल्ह्यांत उसाचे चांगले पोषण झाले. यामुळे निराशाजनक चित्र बदलले आहे.

राज्यात आधीच्या अंदाजानुसार ८५ ते ८८ लाख टन साखर तयार होईल, असे गृहीत धरले होते. परंतु, कारखान्यांमधील गाळपाचे नियोजन बघता एकूण साखर उत्पादन ९० ते ९५ लाख टनांपर्यंत राहू शकते, असे साखर उद्योगातून सांगण्यात आले.

अपेक्षित साखर उत्पादन गतवर्षीच्या ३३१ लाख टन उत्पादनाच्या तुलनेत १७ लाख टनाने कमी असले तरी देशातील साखर उत्पादनाचा ताळेबंद पाहता वर्षअखेर ७५ ते ८० लाख टन साखर शिल्लक राहणे अपेक्षित आहे आणि हीच नेमकी बाब आम्ही राष्ट्रीय सहकारी साखर महासंघातर्फे केंद्र शासनातील संबंधित मंत्रालयाच्या नजरेस आणली आहे.

आणखी किमान १५ लाख टन साखरेचा इथेनॉल निर्मितीकडे वापर करण्यास परवानगी देण्याची विनंती केली आहे. जेणेकरून कारखान्यात तयार होऊन पडून असलेल्या बी हेवी मळीचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर होऊन आसवनींसमोरील आर्थिक समस्येवर तोडगा निघू शकेल.
- जयप्रकाश दांडेगावकर, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष

महाराष्ट्रातही अवकाळी पावसाने उसाच्या उत्पादनात वाढ होत आहे. याशिवाय नोंदणी नसलेल्या उसाचीही अनपेक्षित उपलब्धता आहे. यामुळे अंतिम टप्प्यात साखरेचे उत्पादन वाढेल. काही ठिकाणी हंगाम उशिरा सुरू झाला. अनेक ठिकाणी मजूर टंचाईही आहे. यामुळे फेब्रुवारीत हंगाम संपेल, अशी शक्यता सध्या तरी नाही. राज्यातील हंगाम मार्चअखेरपर्यंत सुरू राहील, असा आमचा नवा अंदाज आहे.
- भगत पाटील, अध्यक्ष, ऑल इंडिया शुगर ट्रेड क्रॉप कमिटी

राज्यात अजूनही ५० ते ६० दिवसांपर्यंत चांगला ऊसपुरवठा राहू शकतो. त्यामुळे आणखी किमान ३०० लाख टनांच्या आसपास ऊस गाळप होण्याची चिन्हे आहेत.
- बी. बी. ठोंबरे, अध्यक्ष, विस्मा

अशी आहे राज्यातील ऊस गाळपाची स्थिती
विभाग...सहकारी कारखाने...खासगी कारखाने...आतापर्यंतचे गाळप...तयार झालेली साखर
कोल्हापूर...२६...१४...१५०.२९...१६४.४९
पुणे...१८...१३...१३७.४२...१३४.७५
सोलापूर...१९...३१...१४४.१७...१२६.६३
अहमदनगर...१६...११...८४.८...७८.०६
छत्रपती संभाजीनगर...१३...९...६२.५९...५१.३७
नांदेड...१०...१९...७४.६...७०.८२
अमरावती...१...३...५.९८...३.३२
नागपूर...०...४...२.११...०.८६
(गाळपाची २९ जानेवारीअखेरची स्थिती. ऊस गाळप लाख टनांत. साखर उत्पादन लाख क्विंटलमध्ये)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

Fruit Crop Insurance : आंबा, काजू उत्पादकांना तातडीने विमा मिळावा

Soybean Cotton Subsidy : लातूरला १५१, तर धाराशिवला १४१ कोटींचे वाटप

SCROLL FOR NEXT