Satara News : गेल्या काही महिन्यांपासून धोम डावा कालव्यांतर्गत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्यातच कालव्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाने त्यातून होणारी पाण्याची गळती थांबत नसल्याचेही दिसते. त्यामुळे कालव्यातून आवर्तन सुरू झाले, तरी शेवटच्या क्षेत्रापर्यंत पाणी पोहोचतच नसल्याची स्थिती निर्माण होते.
मागील महिन्यात ओझर्डे येथील कालवा फुटीच्या प्रकारामुळे पाण्यावाचून शेतकऱ्यांची फार मोठी गैरसोय झाली. आता विभागाच्या भुईंज, शिवथर आणि सातारारोड सब डिव्हिजनअंतर्गत असणाऱ्या ह्या कॅनॉलची ठिकठिकाणी झालेली पडझड, वाढलेली झाडे, ढासळलेले जुने दगडी बांधकाम तसेच या दरम्यान येत्या दोन वर्षांमध्ये झालेले निकृष्ट बांधकाम याकडे प्रशासनाने काणाडोळा केला आहे.
नाकर्तेपणाची कारणे
मोठ्या पुढाऱ्यांकडून ज्या ठेकेदारांना काम दिले जात आहे, ते ठेकेदार मनमानी पद्धतीने कॅनॉलची तकलादू डागडुजी करून, निघून जात आहेत. पुढाऱ्यांचा वरदहस्त असणारा संबंधित ठेकेदार असल्याने विभागातील कर्मचारी संबंधित ठिकाणी कसल्याही प्रकारचे लक्ष देत नाहीत.
दरम्यान, धोम- पाटबंधारे विभागाची कर्मचारी संख्याही अपुरी आहे. निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला कामाचा अनुभव म्हणून पुन्हा पदभार दिला जातो आणि हा कर्मचारी मनाला येईल तेव्हा कामावर हजर होतो, असाही प्रकार पाहायला मिळत आहे.
मायनरकडेही लक्ष देण्याची गरज
भुईंज, शिवथर, सातारारोड या दरम्यान काळंगवाडीच्या (ता. वाई) हद्दीतून कॅनॉल सुरू झाल्यापासून काही ठिकाणी डोंगराच्या कडेने उंचवट्यावरून गेला आहे. त्याची काळंगवाडी ते शिवथरच्या हद्दीपर्यंत बारा किलोमीटरची लांबी आहे. कॅनॉलवर डोंगर कपारीतून येणाऱ्या ओघळावरून पाणी पुढे जाण्यासाठी मोठमोठे पूल बांधलेले आहेत;
परंतु ते जीर्ण झाले आहेत. त्यामुळे त्यातूनही मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू असतेच. त्यातच पाण्याची मागणी असलेल्या मायनरच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी जात नसल्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होते. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून या कॅनॉलच्या मायनर बुजवून शेती केली असून, याकडेही संबंधित विभागाने जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे.
मला येथील गळतीची कसली कल्पना नव्हती. मी समक्ष आल्यावर पाहणी करून तसा अहवाल माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देतो. माझ्याकडे तीन ठिकाणचा पदभार असल्यामुळे मला प्रत्येक ठिकाणी पोचणे शक्य होत नाही.पंढरीनाथ पिसाळ, प्रभारी, भुईंज, शिवथर, सातारारोड, शाखा अभियंता
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.