Sugarcane Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Production Technique: आडसाली ऊस उत्पादनवाढीचे तंत्र

Sugarcane Farming: आडसाली ऊस लागवड करताना शास्त्रशुद्ध आणि रोगमुक्त बेण्यांची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. जमिनीचा प्रकार, पाणी व्यवस्थापनाची क्षमता, साखर कारखान्याचा तोडणी कालावधी पाहून ऊस बेणे निवड करणे आवश्यक आहे.

Team Agrowon

डॉ. समाधान सुरवसे, डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. अशोक कडलग

Sugarcane Crop Management: उसाचे बेणे रसरशीत, सशक्त, लांब कांडी, रोग आणि कीडमुक्त असावे. बेण्यावरील डोळ्यांची वाढ पूर्ण झालेली व डोळे फुगीर असावेत, डोळे निस्तेज व काळपट नसावेत. बेणे ८ ते १० महिने वयाचे असावे. खोडवा ऊस बेण्यासाठी वापरू नये. लांब अंतरावरून बेणे आणावयाचे असल्यास किंवा बेणे लागण करण्यास उशीर झाल्यास ५०० ग्रॅम चुना २०० लिटर पाण्यामध्ये विरघळून त्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटे ऊस बेणे बुडवून लागवड केली असता उगवण चांगली होते.

जातीची वैशिष्ट्ये

को. ८६०३२ : मध्यम उशिरा तयार होणारी, जास्त फुटवे, खोडवा चांगला, काणी रोगास मध्यम प्रतिकार, चांगले ऊस आणि साखर उत्पादन, जैविक अजैविक ताणाला चांगली तोंड देऊ शकते, पक्व कांड्यांना भेगा पडतात.

व्ही.एस.आय. ०८००५ : पाण्याचा ताण सहन करते, खोडवा चांगला येतो, काणी, तांबेरा रोगास मध्यम प्रतिकारक, दशी पडत नाही, तुरा येण्याचे प्रमाण कमी

को.एम.०२६५ : क्षारपड, चोपण जमिनीत चांगली येते, जास्त उत्पादन, खोडवा चांगला, रंगाने हिरवा, रोग, किडीस मध्यम प्रतिकारक.

को.व्ही.एस.आय. ९८०५ : उंच सरळ वाढते, पाचट सहज निघते, खोल काळ्या जमिनीत सुरुवातीला वाढ कमी नंतर वाढते, गवताळ रोगास कमी बळी पडते.

पी.डी एन. १५०१२ : जास्त उत्पादन आणि साखर उतारा, खोडवा चांगला, काणी, तांबेरा रोग प्रतिकारक.

पी.डी.एन. १३००७ : पाण्याचा ताण सहन करते, चांगले उत्पादन व साखर उतारा, क्षारपड जमिनीत चांगले उत्पादन. खोडवा चांगला, लाल कुज, काणी, मर, तांबेरा रोगांना प्रतिकार.

Chart

कोरडी लागण

मध्यम ते भारी, क्षारपड, चोपण जमिनीमध्ये कोरडी लागण करावी. सरीमध्ये लागवडीच्या वेळी शेणखत, रासायनिक खत मिसळावे. बळी नांगराच्या साह्याने २ ते ३ इंच खोल चळी घ्यावी.

योग्य अंतरावर टिपऱ्या लावून २ ते ३ इंच खोल मातीने झाकून घ्यावी. पहिल्या दोन ते तीन पाण्याच्या पाळ्यांच्या वेळी पाणी हलके द्यावे म्हणजे कांड्या उघड्या पडणार नाहीत.

उगवण १५ ते २० दिवसात पूर्ण होते, लवकर उगवणीने कोंब जोमदार येतो, उगवण ८५ टक्क्यांपेक्षा जास्त होते, हेक्टरी ऊस संख्या ४० ते ४५ हजार राखण्यास मदत होते, उत्पादनात वाढ होते.

ओली लागण

हलक्या जमिनीत ओली लागण करावी. मध्यम भारी जमिनीत ओली लागण करणे चुकीचे आहे.

मध्यम ते भारी जमिनीमध्ये ओली लागण केल्यास बेणे खोलवर जाते. उगवण ३० ते ३५ दिवसांपर्यंत उशिरा होते, उगवण एकसारखी होत नाही. उशिरा उगवणीने येणारा कोंब नाजूक येतो. खत, पाणी, मशागतीस ऊस योग्य प्रतिसाद देत नाही. हेक्टरी उसांची संख्या ४० ते ४५ हजार राखता येत नाही.

दोन डोळा टिपरीचा वापर

दोन डोळा पद्धतीने टिपरी करून लागवड केली असता अपेक्षेप्रमाणे उगवण होऊन सुरुवातीपासूनच फुटवे संख्या नियंत्रित करण्यासाठी मदत होते. ऊस चांगला पोसतो, वजन वाढून जास्त उत्पादन मिळते.

धारदार कोयत्याने लाकडी ठोकळ्यावर कांडीवरील डोळ्याच्या खालचा भाग १/३ व वरचा भाग २/३ इतका राहील अशा प्रकारे टिपऱ्या कराव्यात.

रासायनिक बेणे प्रक्रिया ः १०० लिटर पाण्यात १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम, ३६ ग्रॅम इमिडाक्लोप्रिड मिसळून द्रावण तयार करावे. यामध्ये ऊस बेणे १० ते १५ मिनिटे बुडवावे. त्यानंतर ३० मिनिटांनी १०० लिटर पाण्यात १ लिटर ॲसिटोबॅक्टर मिसळून या द्रावणात ३० मिनिटे बेणेप्रक्रिया करावी.

Chart

नांग्या भरणे

बेणे जास्त वयाचे असल्यास, लागण करताना खाली दबले गेले असल्यास, कांड्या पाण्याबरोबर वाहून जाऊन उघड्या पडल्या असल्यास उगवण आणि उसाच्या संख्येवर परिणाम होतो.

नांग्या भरण्यासाठी पाण्याचे पाट, कटाच्या शेजारी जास्त टिपरी लावून त्याचा वापर नांग्या भरण्यासाठी करावा किंवा लागणी अगोदर १५ दिवस प्लॅस्टिकच्या पिशवीत एक डोळा पद्धतीने रोपे तयार करावीत. रोप १ ते १. ५ महिन्याचे झाल्यावर त्याचा नांग्या भरण्यासाठी वापर करावा. नांग्या भरण्याचे काम एक महिन्यात पूर्ण करावे.

लागण केल्यापासून पहिल्या सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत तणनियंत्रण, नांग्या भरणे, बाळभरणी, मोठी बांधणी, फुटव्यांचे नियंत्रण, पाचट काढणे, पाचटाचे आच्छादन करावे.

Chart

बाळ बांधणी

बाळबांधणी लागणीनंतर ४५ ते ६० दिवसामध्ये करावी. दातेरी कोळपे चालवून माती हलकी करावी त्यामुळे माती भुसभुशीत होऊन अन्नघटकांचे शोषण वाढते, पिकाची वाढ चांगली होते.

मोठी भरणी

ऊस लागवडीनंतर १२० दिवसांनी मोठी भरणी करावी. यामुळे फुटवे नियंत्रण होते. मोठ्या भरणीमुळे मुळांभोवती मातीचा आधार मिळतो. त्यामुळे ऊस लोळत नाही.

गंधक आणि सिलिकॉन अन्नद्रव्यांचा वापर : लागवडीच्या वेळी प्रति एकरी २४ किलो मूलद्रवी गंधक तसेच सिलिकॉनसाठी १६० किलो सिलिकॉन बगॅस राख आणि १ लिटर सिलिकॉन उपलब्ध करून देणारे जिवाणू संवर्धक लागणीच्या वेळी वापरावे.

Chart

फुटव्यांचे नियंत्रण

एकरी ऊस संख्या (४० ते ४५ हजार) नियंत्रित ठेवण्यासाठी, जाडी वाढविण्यासाठी मोठ्या बांधणीच्या वेळी आणि ७ ते ८ महिन्यांनी तीन पानांवरील लहान फुटवे काढून टाकावेत.

मोठ्या बांधणीनंतर पावसाळ्याच्या सुरुवातीला वाळलेले पाचट काढून सरीत टाकावे. ऊस वय ६ महिने असताना एकदा आणि ८ महिने असताना दुसऱ्या वेळी पाचट नको असलेले ऊस काढावेत.

पाचट आच्छादनामुळे तणांचे नियंत्रण होते, पाचट कमी झाल्यामुळे ऊस तुटल्यावर खोडव्यात पाचट व्यवस्थित बसते. हवा खेळती राहते. रोग व किडींचे नियंत्रण होते. हिरवे पान काढू नये, अन्यथा ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता असते. सरीतील अंतरानुसार १० फूट अंतरात पुढील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे फुटवे ठेवावेत.

- डॉ. समाधान सुरवसे, ९८६०८७७०४९

- डॉ. अभिनंदन पाटील, ९७३७२७५८२१

(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु., पुणे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

SCROLL FOR NEXT