Soybean Disease Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Disease : सोयाबीन पिकातील ‘टार्गेट स्पॉट रोग’

Team Agrowon

राहुल वडघुले

Target Spot Disease : सोयाबीन पिकामध्ये बुरशीजन्य, जिवाणूजन्य व विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. यामध्ये मुख्यत: फ्युझारियम मर, फायटोप्थोरा स्टेम रॉट, सेप्टोरिया स्पॉट, अॅन्थ्रॅक्नोज, जिवाणूजन्य करपा, भुरी, विषाणूजन्य मोझॅक या महत्त्वाच्या रोगांचा प्रादुर्भाव सर्व भागांत दिसून येतो. या रोगांच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी रोगांची ओळख आणि प्रादुर्भावाची लक्षणे माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून प्रभावी नियंत्रण करणे शक्य होईल. आजच्या लेखात सोयाबीन पिकातील टार्गेट स्पॉट या रोगाविषयी माहिती घेऊ. हा रोग प्रामुख्याने पाने तसेच खोड व शेंगांवर सुद्धा आढळतो. परंतु जास्त प्रादुर्भाव हा पानांवर होऊन पानगळ होते.

लक्षणे

रोगाची लक्षणे प्रामुख्याने पानांवर व खोडावर दिसतात. क्वचित वेळा शेंगावर देखील लक्षणे दिसून येतात.

सुरुवातीला जमिनीलगत असलेल्या पानांवर लक्षणे दिसतात.

या रोगामध्ये लालसर ते तपकिरी रंगाचे गोलाकार ठिपके पानांवर पडतात. हे ठिपके ७ ते १४ मिमी आकाराचे असतात. शक्यतो खालील पानांवर मोठे, तर वरील पानांवर लहान ठिपके असतात. या ठिपक्यांच्या बाजूने पिवळसर कडा दिसून येते. तर आतमध्ये वलये आणि मध्यभागी काळसर किंवा काही वेळा पांढरा ठिपका दिसतो. म्हणून या रोगाला ‘टार्गेट स्पॉट’ असे म्हणतात.

फांद्यांवर गोल किंवा लांबट गर्द तपकिरी ठिपके दिसतात. तर शेंगावर बारीक तपकिरी कडा असलेले ठिपके दिसतात. परंतु हे क्वचित दिसतात.

प्रादुर्भावग्रस्त झाडाची पानगळ होताना सुरुवातीला खालील पाने गळतात व नंतर वरील बाजूच्या पानांची गळ होते.

रोगाची माहिती

रोगाचे नाव : टार्गेट स्पॉट रोग

हा रोग बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो.

रोग निर्माण बुरशीचे शास्त्रीय नाव : कॉरनेस्पोरा कॅसिकोला (Corynespora casiicola)

बुरशीचे डिव्हिजन : Ascomycota

परजीवी प्रकार : नेक्रोट्रोफीक परजीव (Necrotrophic Parasite)

नुकसान : या रोगामुळे पिकाचे ४० टक्के पर्यंत नुकसान होऊ शकते.

यजमान पिके ः ही बुरशी जवळपास ५३० प्रकारच्या झाडांवर रोग निर्माण करते. यामध्ये सोयाबीन, कपाशी, काकडी, पपई, रबर, टोमॅटो, वाल इत्यादी अनेक पिकांचा समावेश होतो.

पोषक हवामान

या रोगासाठी २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमान, खूप जास्त आर्द्रता आणि पाने २० ते ४० तास ओलसर राहणे असे वातावरण या रोगासाठी अत्यंत पोषक असते. या रोगाच्या वाढीसाठी ओलसर पाने हे अतिशय महत्त्वाचे कारण आहे.

रोग कसा निर्माण होतो

या रोगाच्या बुरशीचे तंतू किंवा बीजाणू हे जमिनीत, झाडांच्या जुन्या अवशेषांवर, गवतावर किंवा सोयाबीनच्या बियाण्यांवर जिवंत राहतात. ते २ वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात. नंतर वारा, कीटक, पाणी यांच्यामार्फत त्यांचा यजमान पिकांवर प्रसार होतो. पोषक हवामान स्थिती तयार होताच मुख्य पिकावर रोगाची लागण होते. याला प्राथमिक लागण म्हणतात.

रोगाची लागण झाल्यानंतर ४ ते ५ दिवसांत रोगाची लक्षणे दिसू लागतात. रोगाच्या लक्षणांमधील ठिपक्यांवर अनेक बीजाणू (कोनिडिया) तयार होतात. हे बीजाणू हवेमार्फत इतर यजमान पिकांवर जाऊन रोगाचा प्रसार होतो. यालाच दुय्यम लागण असे म्हणतात.

नियंत्रणाचे उपाय

पीक फेरपालट करावी.

आधीचे पीक हे या रोगास बळी पडणारे नसावे.

लागवडीपूर्वी बियाण्यांस बीजप्रक्रिया अवश्य करावी.

लागवडीसाठी नवीन सुधारित लागवड पद्धतींचा अवलंब करावा.

पीक लागवडीमध्ये रोपांची जास्त दाटी नसावी. दाट लागवड असल्यास विरळणी करावी.

जास्त पावसामध्ये लागवड करणे टाळावे.

जमिनीवर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.

नियंत्रणासाठी शिफारस केलेल्या बुरशीनाशकांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करावा.

शिफारस केलेली बुरशीनाशके

टेब्यूकोनॅझोल (३८.३९ टक्के डब्ल्यू/डब्ल्यू एससी)

टेब्यूकोनॅझोल (१० टक्के) अधिक सल्फर (६५ टक्के डब्ल्यूजी)

कार्बेन्डाझिम (१२ टक्के) अधिक मॅन्कोझेब (६३ टक्के डब्ल्यूपी)

ॲझोक्सिस्ट्रॉबीन (१८.२ टक्के) अधिक डायफेनोकोनॅझोल (११.४ टक्के डब्ल्यू/डब्ल्यू एससी)

सूक्ष्मदर्शकाखाली काय दिसते?

या रोगाचे बीजाणू (कोनिडिया) सूक्ष्मदर्शकाखाली पाहू शकतो. या बीजाणूंचा तळाचा भाग गोलाकार असून, वरील भाग निमुळता होत जाऊन लांबट आकाराचा दिसतो. यामध्ये पेशीभित्तिका स्पष्टपणे दिसतात. तळाच्या भागावर एक काळसर भाग स्पष्टपणे दिसतो. हे बीजाणू सूक्ष्मदर्शकाखाली पारदर्शी दिसतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कापसात चढ उतार कायम; कापूस, सोयाबीन, आले तसेच काय आहेत केळीचे दर ?

Sugarcane Season 2024 : चोवीस लाख टनांवर ऊस गाळपाचा अंदाज

Maharashtra Rain Alert : राज्यात काही ठिकाणी मुसळधारेचा अंदाज; उद्यापासून राज्याच्या बहुतांशी भागात पावसाची उघडीप राहणार

Gharkul Yojana : ग्रामसभेला हवेत घरकुल लाभार्थी निवडीचे अधिकार

Onion Market : कांद्याला चांगला भाव तरिही शेतकऱ्यांच्या हातात पंधरा दिवसांनी पैसे

SCROLL FOR NEXT