Monsoon Diet
Monsoon Diet Agrowon
ॲग्रो विशेष

पावसाळ्यात असा घ्या आहार

शुभांगी वाटाणे

आपल्या शरीरावर ऋतूनुसार होणाऱ्या वातावरणातील बदलांचा (Climate Change) नक्कीच परिणाम होत असतो. आता नुकताच पावसाळा (Monsoon) सुरू झाला आहे. या वेळी वातावरणातील सूर्याची उष्णता (Heat) कमी होते आणि पाण्याचा अंश वाढत जातो. हवेत थंडावा वाढतो. या कालावधीत शरीरातील वात वाढतो आणि पित्त जमा होण्यास सुरुवात होते. पचनशक्ती आणि प्रतिकार शक्तीही कमी होते. सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण असल्याने आजाराचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात पचनक्रिया मंद होत असल्यामुळे अन्नाचे पचन योग्य प्रकारे होत नाही. यासाठी पावसाळ्यात पचनास हलका, ताजा आणि गरम आहार (Monsoon Diet) घेण्यास प्राधान्य द्यावे.

धान्य व कडधान्य -

पावसाळ्यात धान्याच्या लाह्या खाव्यात. लाह्या पचनास हलक्या असतात. म्हणूनच श्रावणात येणाऱ्या नागपंचमीला लाह्यांचा प्रसाद खाल्ला जातो. कडधान्यामध्ये मूग डाळ ही पचायला हलकी असल्यामुळे पावसाळ्यात मूगडाळीचे वरण, खिचडी असे पदार्थ आहारात घ्यावेत.

फळे - पावसाळ्यात जास्त पिकलेली फळे खाऊ नये. पावसाळ्यात आंबा, फणस, खाणे टाळावे, कारण यामुळे अपचन होऊन जुलाब, अतिसार होण्याची जास्त शक्यता असते.

तसेच सर्व फळे स्वच्छ धुवून खावीत

जांभूळ, पपई आणि मक्याचे कणीस खाणे या काळात चांगले.

भाजीपाला - पावसाळ्यात पालेभाज्या कमी प्रमाणात खाव्यात. पावसाळ्यात पालेभाज्यांच्या जुडीमध्ये माती व सूक्ष्मजीव असू शकतात. व्यवस्थित स्वच्छ धुवून, काळजीपूर्वक खाव्यात.

पावसाळ्यात फळभाज्यांचे आहारात जास्त समावेश असावा. उदा. भेंडी, कारले, पडवळ, दुधी भोपळा इ.

भाज्यांचे गरम सूप आहारात घ्यावे.

मांसाहार - पावसाळ्यात आपली पचनशक्ती मंदावलेली असते. मांसाहार पचायला जड असतो. त्यामुळे पावसाळ्यात मांसाहारी पदार्थ उदा. मांस मटण, मासे खाणे टाळावे. शिवाय हा मासे आणि जलचर प्राण्यांचा प्रजाजनाचा काळ असतो. शेळ्या मेंढ्या, कोंबडी यांना पावसाळ्यात आजार होण्याची शक्यता जास्त असते म्हणूनच परंपरेप्रमाणे श्रावण महिन्यात मांसाहार टाळतात.

पाणी

पावसाळ्यामध्ये पाणी दूषित झालेले असते, त्यामुळे निर्जंतुकीकरणासाठी पाणी गाळून, उकळून प्यावे. स्वयंपाकासाठी वापरावे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पावसाळ्यात पाणी गाळून किंवा तुरटी फिरवून वापरावे. अस्वच्छ पाणी पिण्यामुळे अतिसार, टायफॉईड, जुलाब होण्याची शक्यता असते.

काय टाळावे?

- पावसाळ्यात तळलेले पदार्थ खाणे टाळावे, कारण ते पचनास जड असतात व पित्त वाढवितात.

- पावसाळ्यात जास्तीचा आहार घेणे टाळावे

- पावसाळ्यात बाहेरचे उघड्यावरील भेळ, पाणीपुरी सारखे पदार्थ खाणे टाळावे

पावसाळ्यात थंड पदार्थ खाणे टाळावे

- पावसाळ्यात वैद्यकीयदृष्ट्या शरीरातील मोकळ्या जागांमध्ये पाणी साठण्याची भीती असते. म्हणूनच जड पदार्थ, विशेषत: मीठ जास्त असलेले पदार्थ, सॉफ्ट ड्रिंक, थंड पेये, चायनीज पदार्थ खाऊ नयेत.

काय खावे?

गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, ओट्स यांपासून भाजून बनविलेले पदार्थ पावसाळ्यात नक्की उपयोगाचे पडतात. त्यामुळेच पोळी, भाकरी, थालीपीठ, पराठे जास्त खावेत. नाचणी, शिंगाडा, हातसडीचा तांदूळ यांचाही आहारात वापर करता येईल.

प्रतिकारशक्ती व पचनसंस्थेची ताकद वाढविणारे अन्नपदार्थ पावसाळ्यात उपयुक्त.

गरम वरण-भातावर पिळलेले लिंबू किंवा मोरावळा हे ‘क’ जीवनसत्त्व मिळवून देते. त्यामुळे प्रतिकार यंत्रणा मजबूत होते.

परंपरागत आल्याचा चहा किंवा दुधात सुंठ-हळद घालून घेणे हेदेखील प्रतिकारशक्ती वाढविण्यात उपयुक्त ठरते.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पावसाळ्यात मुले कमी खातात. खरेतर कमी खायलाही हवे, म्हणजे पोटावर अत्याचार होणार नाहीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Healthy Ambadi : आरोग्यदायी पौष्टिक अंबाडी

Market Price Kolhapur : कोथिंबिरीची पेंढी ४० रुपयांना, लोणच्याच्या आंब्यांना मागणी

Rural Development : पंचायत राज रचनेतून ग्राम विकासाला चालना

Mango Festival Kolhapur : कोल्हापुरात आंबा महोत्सव, कृषी पणन मंडळाकडून आयोजन

Grape Farming : शेवडीची दुष्काळावर मात द्राक्षात तयार केली ओळख

SCROLL FOR NEXT