Pune News: कृषी क्षेत्रात गावशिवारापासून ते ग्लोबल मार्केटपर्यंत होत असलेल्या घडामोडींची माहिती देत शेतकऱ्यांना प्रगतीची दारे उघडून देणाऱ्या ‘अॅग्रोवन’चा विसावा वर्धापन दिन उद्या (ता. २०) साजरा होत आहे. या द्विदशकपूर्ती निमित्ताने पुण्यात शाश्वत शेती परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
या परिषदेचे अध्यक्षस्थान केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ भूषविणार आहेत. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे प्रमुख पाहुणे आहेत. या वेळी ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष प्रतापराव पवार उपस्थित राहणार आहेत. परिषदेचा समारोप ‘यशदा’चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे. राज्यात शाश्वत शेतीत दीपस्तंभासमान काम करीत असलेल्या निवडक शेतकऱ्यांचा या वेळी गौरव करण्यात येणार आहे.
पुण्याच्या बाणेर रस्त्यावरील महाराष्ट्र शासनाच्या ‘यशदा’ या प्रशिक्षण संस्थेच्या मुख्य सभागृहात उद्या (ता. २०) सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच या वेळेत ही परिषद होईल. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक शाश्वत शेतीच्या संकल्पनेला महत्त्व प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांना जमिनीची सुपीकता आणि नाविन्यपूर्ण बाजार विक्री व्यवस्था या संकल्पनांचा अंगिकार करावा लागणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या या विषयाच्या विविध पैलूंवर या परिषदेत चर्चा होणार आहे. शेती, माती आणि बाजार या तीन मुद्यांवरती ही चर्चा केंद्रित असेल.
या परिषदेत प्रयोगशील शेतकरी, शास्त्रज्ञ, उद्योजक, धोरणकर्ते, सरकारी अधिकारी, कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्यांतील वरिष्ठ अधिकारी, जैविक निविष्ठा क्षेत्रातील जाणकार, शेतीमाल पणन विषयातील तज्ज्ञ, कोरडवाहू शेतीचे अभ्यासक सहभागी होणार आहेत. या परिषदेला प्रवेश निःशुल्क असणार आहे.
शाश्वत शेतीवर सकस विचारमंथन
‘अॅग्रोवन’च्या शाश्वत शेती परिषदेत दोन सत्रांत गटचर्चा होणार आहे. त्यात तज्ज्ञ, जाणकार, उद्योजकांसोबतच शाश्वत शेतीमध्ये यशस्वी प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनुभवकथन ऐकायला मिळणार आहे.
शेती-मातीचे शाश्वत संवर्धन
या सत्रात पर्यावरणपूरक नैसर्गिक शेतीचे मॉडेल विकसित करणारे यवतमाळ येथील प्रयोगशील शेतकरी सुभाष शर्मा, ‘कॅन बायोसिस’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक संदीपा कानिटकर, गेल्या २५ वर्षांपासून विना नांगरणी आणि शून्य मशागत तंत्राचा अवलंब करणारे कोल्हापूर येथील प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर आणि देवगाव (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे वीस एकरांमध्ये शून्य मशागत तंत्राने शेती करणारे प्रयोगशील शेतकरी दीपक जोशी हे मान्यवर सहभागी होतील.
बाजाराच्या दाही दिशा
या सत्रात रासायनिक अवशेषमुक्त (रेसिड्यू फ्री) पद्धतीने शेती करणारे निघोज (जि. अहिल्यानगर) येथील प्रयोगशील युवा शेतकरी राहुल रसाळ, कंदर (जि. सोलापूर) येथील प्रयोगशील केळी उत्पादक व निर्यातदार किरण डोके, हेल्दी फूड बॅंकेच्या संस्थापक व मुख्य समन्वयक प्रतिभा कोलते आणि काळवाडी (जि. पुणे) येथील प्रयोगशील शेतकरी व डेक्कन व्हॅली फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष अजय बेलेकर यांचा सहभाग असेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.