Parbhani News : यंदाच्या (२०२४) रब्बी हंगामात महाबीजकडून परभणी जिल्ह्यात एकूण १० हजार ६०१ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात येणार असून आजवर ८ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. हरभरा, ज्वारी, गहू पिकांचे मिळून ७ हजार १४२ क्विंटल बियाणे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आले आहे, अशी माहिती महाबीजच्या सूत्रांनी दिली.
यंदाच्या रब्बी हंगामात परभणी जिल्ह्यात कृषी विभागाकडून आलेल्या मागणीनुसार महाबीजकडून बियाणे पुरवठा करण्यात येत आहे. यंदा हरभरा पिकांच्या फुले विक्रम, फुले विक्रांत, पीडकेव्ही कनक, पीडीकेव्ही कांचन, विजय, दिग्विजय, जाकी ९२१८ या वाणांचे मिळून ७ हजार ६०० क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला.
त्यात अनुदानावरील ४ हजार ८५९ क्विंटल बियाणे आहे. रब्बी ज्वारीच्या परभणी शक्ती, फुले सुचित्रा, परभणी मोती, परभणी सुपर मोती, मालदांडी या वाणांच्या २ हजार ३५ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे.
त्यात सुमारे १ हजार ६८३ क्विंटल बियाणे अनुदानावर तसेच मिनीकिट योजना, प्रात्यक्षिकासाठी आहे. मागणीनुसार ज्वारीच्या बियाण्यांचा पुरवठा करण्यात येईल. ग्रामबीजोत्पादन कार्यक्रमात गव्हाच्या लोक-१, जी.डब्लू ४९६, एमएसीएस ६२२२, एचआय १५४४ या वाणांचे ६०० क्विंटल बियाणे पुरवठ्याचा लक्ष्यांक आहे.
असे आहे अनुदान
हरभरा पिकाच्या दहा वर्षांतील आतील (नवीन वाण) वाणांच्या बियाण्यांसाठी प्रतिक्विंटल २ हजार रुपये तर दहा वर्षांवरील वाणांच्या (जुने वाण) बियाण्यासाठी प्रतिक्विंटल १ हजार ५०० रुपये अनुदान आहे. ज्वारीच्या १० वर्षांवरील वाणांच्या बियाण्यांसाठी प्रतिक्विंटल १ हजार ५०० रुपये तर दहा वर्षांआतील वाणांच्या बियाण्यांसाठी प्रतिक्विंटल ३ हजार रुपये अनुदान आहे. गव्हाच्या बियाण्याला प्रतिक्विंटल ८०० रुपये अनुदान आहे. कृषी विभागाकडून परमिट प्राप्त शेतकऱ्यांना अनुदानावरील बियाणे खरेदी करता येईल.
ज्वारी बियाणे मिनीकिट
पौष्टीक तृणधान्य अभियानअंतर्गत मिनीकिट योजनेत ज्वारीच्या परभणी सुपर मोती, फुले सुचित्रा या वाणांचे प्रत्येकी ४ किलो वजनाच्या बियाणे पिशव्यांचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात येणार आहे. त्यासाठी १ हजार १८४ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा कृषी विभागाच्या मागणीनुसार करण्यात आला असल्याचे महाबीजच्या सूत्रांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.