Seed Supply : बियाण्यांचा ७६ टक्के पुरवठा

Kharif Crop : राज्यात आतापर्यंत ७६ टक्के बियाण्यांचा पुरवठा झालेला आहे. मागणीच्या तुलनेत खते, बियाणे पुरेशी आहेत.
Kharif crop
Kharif cropAgrowon

Pune News : राज्यात आतापर्यंत ७६ टक्के बियाण्यांचा पुरवठा झालेला आहे. मागणीच्या तुलनेत खते, बियाणे पुरेशी आहेत. मात्र, पुरेसा पाऊस पडल्याशिवाय पेरा करू नका, असे आवाहन पुन्हा एकदा कृषी आयुक्तालयाने केले आहे.

चालू खरीप हंगामासाठी राज्याला अंदाजे १९.२१ लाख क्विंटल बियाणे गरज आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत सद्यःस्थितीत प्राथमिक अंदाजानुसार २१.७८ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.

त्यातील १४ लाख ६९ हजार ९९३ क्विंटल म्हणजेच ७६ टक्के बियाण्यांचा पुरवठादेखील झालेला आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्यांमध्ये खरिपासाठी आवश्यक बियाण्यांचा साठा आहे. शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज व ओल पाहून बियाण्यांचा पेरा करावा, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले.

Kharif crop
Seed, Fertilizer Selling : खते, बी-बियाणे खरेदीवेळी घ्या दक्षता

याशिवाय घाई न करता आवश्यकतेनुसार खतांची खरेदी करावी. राज्याला खरिपासाठी एकूण ४३.१३ लाख टन रासायनिक खते मिळावीत, असे नियोजन केले आहे. त्यापैकी आतापर्यंत १२.८१ लाख टन खतांची विक्री झाली आहे. सध्या राज्यात २८.५० लाख टन खतांचा साठा उपलब्ध आहे.

Kharif crop
Bogus Seed : यवतमाळला बोगस खतांच्या १९३ पिशव्या जप्त

कृषी आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, राज्यात एक रुपयात पीकविमा अर्थात ‘सर्व समावेशक पीक विमा’ योजना राबविण्यास शासनाने २३ जूनला मान्यता दिली आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल.

कृषी विभागाने २५ जूनपासून राज्यभरामध्ये कृषी संजीवनी सप्ताह सुरू केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लागवड तंत्रज्ञान, जमीन सुपीकता, रासायनिक खतांचा संतुलित वापर ,कृषी प्रक्रियेच्या विविध योजना, पौष्टिक आहार याची माहिती दिली जात आहे.

पाऊस २४ टक्के, तर पेरा दीड टक्क्यांवर

राज्यात आतापर्यंत सरासरीच्या २४.२ टक्के पाऊस झाला आहे. तर पेरण्या सरासरी क्षेत्राच्या १.६० टक्के झालेल्या आहेत, असे कृषी आयुक्तालयाने नमुद केले आहे. “पावसाचे आगमन एरवी सात जूनला होते.

मात्र, ११ जूनला मॉन्सून कोकणात आला. २४ जूनला राज्यभर मॉन्सून पसरला. २५ जूनअखेर राज्यात १७३ मिलिमीटर सरासरी पाऊस होत असतो. परंतु, यंदा आतापर्यंत ४१.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. २४ जूनअखेर राज्यात १५२.९७ लाख हेक्टरपैकी प्रत्यक्षात २.२६ लाख हेक्टरवर पेरा झाला आहे,” असे आयुक्तालयाने नमुद केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com